जळगांवचे आमचे पत्रकार मित्र श्री. श्रीकांत पुरुषोत्तम कुलकर्णी उर्फ एस. पी. कुलकर्णी हे निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. तेंव्हापासून एस पी हे झपाटल्यासारखे शिवसेनेसाठी कार्यरत होते. शिवसेनेच्या सभांना भरभरून प्रतिसाद मिळत असे. कमांडर दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, मधुकरराव सरपोतदार, ॲड. लीलाधर डाके, छगन भुजबळ, शरद आचार्य, सुभाष देसाई, सतीश प्रधान हे बारा नेते श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत पक्षाच्या प्रचार, प्रसारासाठी राज्यभर दौरे काढीत असत. अशावेळी शिवसैनिक सुद्धा झपाटल्यासारखे काम करीत. एस पी कुलकर्णी हे जळगांव येथे शिवसेनेची भूमिका अहमहमिकेने लोकांना पटवून देत असत. इतकेच नव्हे तर दत्ताजी साळवी हे जळगांव जिल्ह्यातील गावागावात जाणार आणि शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून गर्जना करणार अशा जाहिराती करुन प्रसंगी दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेत एस पी कुलकर्णी हे फड गाजवीत असत. त्यामुळे काही वेळा तर एसपींना दत्ताजी म्हणून ओळखले जाई. बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक सामना संभाजीनगर आवृत्ती सुरु केली तेंव्हा सुरुवातीचे दहा दिवस मी संभाजीनगर येथे वास्तव्यास राहिलो. जळगांव येथे संभाजीनगर आवृत्ती जाई आणि एसपी कुलकर्णी हे सामनाचे जळगांव प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. लातूर किल्लारी भूकंप झाला तेंव्हा आम्ही तिथे जाऊन विदारक चित्र/परिस्थिती पाहिली. आज श्रीकांत पुरुषोत्तम उर्फ एसपी कुलकर्णी हे आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत ‌ या अमृततुल्य मित्रास शतकी खेळी पूर्ण करण्यासाठी ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो अशी शिवचरणी प्रार्थना.

शुभेच्छा !

योगेश त्रिवेदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *