उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
मुंबई : आईची हत्या करून तिचे अवयव भाजून खाल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाचा मानसिक आणि मानसशास्त्रीय अहवाल तसेच त्याच्या वर्तनाबाबतचा प्रोबेशन अधिकाऱ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सुनील कुचकोरवी याला आईची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी २०२१ मध्ये कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल आहे. याशिवाय, सुनील यानेही शिक्षेविरोधात अपील दाखल केले आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, २८ ऑगस्ट २०१७ रोजी कोल्हापूर शहर येथील माकडवाला वसाहतीत आईसह राहणाऱ्या सुनील याने तिची निर्घृण हत्या केली. नंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तव्यावर भाजून खाल्ले. सुनील याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी झाली होती.