पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

 

ठाणे : ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटरच्या आत असलेल्या एकूण 40 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 9 ठिकाणी कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत पब्ज, बार, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकामे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. या सुचनेनुसार कालपासून कारवाई सुरू करण्यात आली होती. काल गुरूवारी 28 जून 2024 रोजी ठाणे शहरात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 31 पानटपऱ्या जप्त करुन हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 शेडवर कारवाई करण्यात आली होती. आज (29 जून 2024) नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभागसमिती या परिसरात दिव्यांगाना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची 8 दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या गोपालआश्रम व एंजल बार ॲण्ड रेस्टॉरंट या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडा परिसरातील शाळेपासून शंभर मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर तसेचअंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली
वागळे प्रभागसमिती कार्यक्षेत्रात शाळापरिसरात 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या, बार तसेच श्रीनगर येथील हवेली धमाल बार वर कारवाई करण्यात आली.
वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक, सूर संगीत बार ही अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यात आली.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच दुकानांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पान टपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली.
प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ1 चे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त महेश आहेर, अक्षय गुडदे, सचिन बोरसे, सोपान भाईक, लक्ष्मण गरुडकर, बाळू पिचड, प्रितम पाटील, भालचंद्र घुगे यांनी पोलीस बंदोस्तात करण्यात आली. सदरची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांनी नमूद केले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *