मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवडचे १६ नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची या १६ माजी नगरसेवकांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते.
लोकसभेतील यशानंतर आता शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या महिला नेत्या आणि माजी केंद्रिय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर कोल्हापुरातील अजित पवारांच्या पक्षातील नेतेही शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.