मागील बारा वर्षातील जूनमधील सर्वाधिक गृहविक्री

 

 

मुंबई : जूनमध्ये मुंबईत ११ हजार ५६९ घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीतून राज्य सरकारला १००१ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळाला आहे. मे महिन्यात १२ हजार घरे विकली गेली होती. त्या तुलनेत जूनमध्ये घरविक्रीत काहीशी घट झाली आहे, असे असले तरी जूनमधील साडे अकरा हजारांची घरविक्री ही मागील बारा वर्षातील जूनमधील सर्वाधिक घरविक्री आहे.
करोनाच्या साथीनंतर हक्काच्या घरांची गरज निर्माण झाली आहे. त्यातून घरविक्रीत वाढ होत आहे. अशात मुंबईत सध्या मोठ्या संख्येने पुनर्विकास प्रकल्प सुरू असून त्या माध्यमातून मोठ्या संख्येने नवीन घरे उपलब्ध होत आहेत. याअनुषंगाने मागील दोन-तीन वर्षांत घरविक्री वाढती आहे. २०२४ मध्येही घरविक्रीत चांगली वाढ दिसत आहे. १० ते १४ हजारांच्या आसपास प्रत्येक महिन्यात घरविक्री झाली आहे. जानेवारीत १० हजार ९६७, फेब्रुवारीत १२ हजार ५६, एप्रिलमध्ये ११ हजार ६४८ आणि मे मध्ये १२ हजार घरांची विक्री झाली होती. तर २०२४ मधील सर्वाधिक घरविक्री ही मार्चमध्ये झाली होती. मार्चमध्ये १४ हजार १४९ घरांची विक्री झाली होती आणि त्यातून सर्वाधिक १ हजार १२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
जूनमध्येही घरविक्री समाधानकारक राहिली आहे. जूनमध्ये मुंबईत ११ हजार ५६९ घरांची विक्री झाली असून त्यातून १००१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आला आहे. पावसाळ्यात अर्थात जून-जुलैमध्ये घरविक्रीत घट होते. त्यामुळेच मागील १२ वर्षांचा विचार करता यंदा जूनमधील सर्वाधिक घरविक्री झाली आहे. जून २०१३ आणि जून २०१४ मध्ये ४ हजार ८०० घरांची विक्री झाली होती. तर जून २०१५ ते जून २०२२ पर्यंत घरविक्री ५ हजार ते १० हजारांच्या घरात होती. जून २०२३ मध्ये घरविक्रीने १० हजारांचा टप्पा पार केला; तर या वर्षी घरविक्री ११ हजारांच्या वर गेली आहे. जूनमध्ये पश्चिम आणि मध्य उपनगरातील घरांना अधिक मागणी होती. तर ५००- १००० चौ फुटांच्या घरांची सर्वाधिक विक्री झाली आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *