मुंबई : सारख्या बलाढ्य शहरात सर जे जे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहॆ परंतू रुग्णसेवा व देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवते आहॆ. त्यातूनही कार्यरत असलेले कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त होण्याचे प्रमाणही अधिक आहॆ.
करोनाच्या जागतीक महामारीत देखील कार्यरत कर्मचाऱ्यांनी जीवाजी बाजी लावून सर्व सामान्य जनतेची अहोरात्र केलेल्या रुग्णसेवेचा सार्थ अभिमान कर्मचाऱ्यांना आहॆ.
मात्र गेल्या नऊ दहा वर्षापासून असलेल्या रिक्त पदे भरली गेली नाहीत.सध्या १३५२ मंजूर खाटांच्या सर जे जे रुग्णालयात पुरेस्या कर्मचाऱ्याअभावी पुरेसी रुग्णसेवा देणे अशक्य झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रशासनास गेल्या कांही वर्ष्यापासून वारंवार निवेदने, चर्चा करून देखील प्रशासन भरतीबाबत वेळ काढू धोरण राबवित आहे ही खेदाची बाब आहॆ.
रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या पाहता तसेच कर्मचाऱ्याच्या रिक्त जागेवरील सरळ सेवेने भरती न झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देताना असह्य ताण सहन करावा लागत आहॆ. कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कामासाठी सुट्ट्या देखील घेता येत नाही यासर्व बाबीचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम सम्भवत आहे.
अत्यावश्यक रुग्णसेवा अखंडपणे सुरु ठेवण्याच्या जे जे रुग्णालयातील लौकिक परंपरेला बाधा निर्माण होत आहॆ तसेच अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी या रुग्णालयात चतुर्थ श्रेणी व इतरही अनुषंगिक कर्मचाऱ्यांची सरळसेवेने भरती होणे अत्यंत आवश्यक आहॆ. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सामान्य लोकांचा /जनतेचा दर्जेदार रुग्णसेवा देण्याबाबतचा शासनावरचा विश्वास उडेल अशी भीती जे जे रुग्णालयाचे सरचिटणीस सत्यवान सावंत यांनी व्यक्त केली आहॆ.
विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या कांही दिवसात कामगारांची रिक्त जागेवरील सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरु झाली नाही तर प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात रुग्णालय कर्मचारी पूर्वी स्थगित केलेले “काम बंद असहकार आंदोलन” दि. ३ जुलै २०२४ पासून करतील असा इशारा जे जे रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी दिला आहॆ. या असहकार बेमुदत संप आंदोलनाचे परिणाम रुग्णसेवा बाधित होण्यावर होईल व या सर्वांची जबाबदारी प्रशासनाची असेल असे संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे म्हणाले.
00000