मुंबई :  राज्यातील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्ष पूर्ण झालीत. ही दोन वर्षे महाराष्ट्राच्या विकासाची आणि विश्वासाची होती अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. बाळासाहेबांचा विचार आणि राज्याच्या विकासाचा ध्यास हाच आमचा श्वास असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये मुख्यमंत्री लिहीतात, “राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली.  राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच हे घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *