मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.
सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत.
पती आणि पत्नी मुख्य सचिव
सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलंय. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार, 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामध्ये सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.