२९ जून २०२४ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे कारण या दिवशी टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी २० विश्वचषकावर भारताचे नाव कोरून इतिहास घडवला. यावेळची विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज देशात खेळली गेली. या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासूनच भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. अनेक दिग्गजांनी भारतालाच विजेतेपदासाठी पहिली पसंती दिली होती कारण भारत या स्पर्धेतील सर्वात ताकदवान संघ होता. क्रिकेटप्रेमींचीही हीच अपेक्षा होती मात्र क्रिकेटप्रेमिंच्या मनात कुठेतरी धाकधूक होती कारण गेल्या अनेक वर्षापासून भारत आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचा विजेता ठरला नाही. २०१३ साली भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली मात्र त्यानंतर भारताला कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही अर्थात प्रत्येक स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी करत उपांत्य किंवा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला मात्र विजेतेपद मिळवू शकला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही भारत अंतिम फेरीत पोहचला मात्र विजयी होऊ शकला नाही त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या मनात धाकधूक होती. क्रिकेटप्रेमिंच्या मनात धाकधूक असली तरी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मनात कोणताही किंतू परंतु नव्हता. यावेळी देशाला विश्वविजयी करायचेच अशी खूणगाठ त्यांनी बांधली. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत झालेला पराभव विसरून त्यांनी नव्याने सुरुवात केली. टी २० विश्वचषकासाठी कोणते खेळाडू हवेत याचा पक्का विचार रोहित शर्माच्या मनात होता. त्याने निवड समितीकडून त्याला हवे ते खेळाडू घेतले. संघात जडेजा, कुलदीप आणि अक्षर पटेल हे तीन फिरकी गोलंदाज घेतले. फिरकी गोलंदजांची संख्या अधिक असल्याने त्याच्यावर टीका झाली मात्र त्याने सांगितले की वेस्ट इंडिजच्या स्लो खेळपट्टीवर हेच खेळाडू उपयुक्त ठरतील. त्याने फिरकी गोलंदाजांवर विश्वास दाखवला. या फिरकी गोलंदाजांनीही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. या तिघांना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, हार्दिक पांड्या आणि अर्षादिप सिंग यांनी सुरेख साथ दिली. भारताची गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. ज्या ज्या वेळी सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत होते त्या त्या वेळी गोलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीतही दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना जसप्रीत बुमराहने धोकादायक क्लासेन ची विकेट काढली तर पुढच्याच षटकात हार्दिकने धोकादायक डेव्हिड मिलरला बाद केले. सूर्यकुमार यादवने मिलरचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडला. हाच झेल सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. तेथूनच सामना फिरला आणि भारताने विजय मिळवत इतिहास घडवला. केवळ गोलंदाजांनीच नव्हे तर फलंदाजांनीही संपूर्ण स्पर्धेत छान कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर अंतिम फेरीत विराट कोहलीने मॅच विनिंग खेळी केली. त्याला अक्षर पटेल, शिवम दुबेने चांगली साथ दिली. संपूर्ण स्पर्धेत अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी सुरेख अष्टपैलू खेळ केला. या स्पर्धेत भारताचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होते. एकूणच गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताने अप्रतिम कामगिरी करीत हे विश्वविजेेतेपद मिळवले. रोहित शर्माने संघाचे कर्णधारपद अतिशय कुशलतेने सांभाळले. या विश्वविजतेपदात जितका खेळाडूंचा वाटा आहे तितकाच सपोर्ट स्टाफचाही आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या टीमने पडद्यामागे मोठी कामगिरी बजावली त्यामुळेच भारत पुन्हा एकदा विश्वविजेता बनला. २००७ नंतर प्रथमच भारताने टी २० च्या विश्वचषकावर नाव कोरले आहे. भारताकडे आता एकूण चार विश्वचषक आहेत. दोन एकदिवसीय व दोन टी २० ची. याबाबतीत ऑस्ट्रेलियाच भारताच्या पुढे आहे. वेस्ट इंडिजनेही भारताप्रमाणे चार विश्वचषक जिंकले आहेत मात्र भारतीय संघाचा फॉर्म आणि खेळाडूंची कामगिरी पाहता भविष्यात भारत अनेक विश्वचषकावर नाव कोरेल आणि इतिहास घडवेल यात शंका नाही. भारतीय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! जय हो !! चक दे इंडिया !!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *