Month: June 2024

 ठाणे महापालिकेला सीएसआर निधीतून चार एक्स रे मशीन झाल्या उपलब्ध

भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्याकडून   ठाणे  : मुंबई येथील भारत सरकारच्या टांकसाळीच्या सीएसआर फंडातून ठाणे महापालिकेस चार पोर्टेबल एक्स रे मशीन्स (क्ष किरण प्रतिमा यंत्र) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी दोन मशीन्स छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे तर उर्वरित दोन मशीन महापालिकेची आरोग्य केंद्रे व बाह्य रुग्ण तपासणी शिबिरांसाठी वापरण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेस सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्यातर्फे एक कोटी २१ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला. या निधीतून त्यांनी महापालिकेस चार पोर्टेबल एक्सरे मशीन उपलब्ध करून दिल्या. या मशीन्स नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या निधी उपलब्धतेबद्दल भारत सरकार टांकसाळ यांचे आभार मानले असून या मशीन्समुळे रुग्णसेवेला फायदा होईल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या बाह्य रुग्ण तपासणी शिबिरात एक्स रे त्वरित उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे, रुग्णाला मोफत एक्स रेसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा पालिकेशी संलग्न असलेल्या खाजगी लॅबमध्ये जावे लागत होते. अशा स्थितीत सुमारे ५० टक्के रुग्ण आवश्यकता असूनही एक्स रे काढणे टाळत असत. या पोर्टेबल एक्स रे मशीन्समुळे रुग्णाचा एक्स रे त्वरित लॅपटॉपवर उपलब्ध होईल आणि त्याचा रिपोर्ट प्रिंट न करता रुग्णाच्या मोबाईलवर पाठवणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णांचे त्वरित निदान करणे साेपे होणार आहे. भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे पोर्टेबल एक्स रे मशीन उपलब्ध झाले आहेत. त्याचा फायदा आरोग्य शिबिरांनाही होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अशी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी केले आहे.

महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नौपाड्यात बिल्डरांबरोबर हातमिळवणी

पक्की चाळ धोकादायक जाहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा खळबळजनक आरोप     ठाणे : महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिल्डरांबरोबर हातमिळवणी करून दादा पाटीलवाडीत असलेली सुस्थितीतील एक पक्की चाळ धोकादायक जाहीर केली आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून चाळीतील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याच पद्धतीने नौपाड्यातील पक्क्या चाळी व अधिकृत सुस्थितीतील इमारती धोकादायक जाहीर करण्याचा उद्योग सुरू झाला आहे, याकडे श्री. वाघुले यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. जुने ठाणे असलेल्या नौपाडा विभागात अनेक जुन्या अधिकृत इमारती आहेत. तर काही भागात अजूनही चाळींमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहेत. या भागातील जागांचे भाव गगनाला भि़डल्यामुळे काही बिल्डरांनी महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी केली. त्यातून काही चाळी व मोक्याच्या ठिकाणांवरील जुन्या अधिकृत इमारतींवर बिल्डरांची नजर गेली. त्यातून चाळमालकांबरोबर संधान साधून सुस्थितीतील व दुरुस्तीयोग्य असलेल्या चाळी व इमारतींना धोकादायक म्हणून जाहीर केले जात आहे. तसेच चाळीतील रहिवाशांवर दहशत पसरवली जात आहे. या प्रकारामुळे सामान्य रहिवाशी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी श्री. संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेच्या नियमानुसार धोकादायक चाळी व इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे असते. मात्र, जागा बळकावण्याचा हव्यास असलेल्या बिल्डरांनी नियमांची पायमल्ली सुरू केली. त्यातून दादा पाटीलवाडीतील १२ फूट उंच असलेली १० बाय २० चौरस फूटांचे रुम असलेली १० भाडोत्री राहणारी चाळ धोकादायक ठरवून पाडण्याचा घाट घातला गेला आहे. ही चाळ पाडण्यात बिल्डरांना यश आल्यास नौपाड्यातील आणखी काही चाळी व जुन्या इमारतींवरही कुऱ्हाड चालविली जाईल, अशी भीती श्री. संजय वाघुले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सध्या नौपाड्यातील जुन्या इमारतींमधून `हक्क प्रमाणपत्र’ देतानाही हेतुपुरस्सरपणे दिरंगाई केली जात असल्याचा आरोप श्री. वाघुले यांनी केला. 000000

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

समता, बंधुता, मानवता यांची स्वकृतीतून प्रचिती देत सामाजिक न्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन…

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगाराला सेवेत घेण्याचे ठाणे लेबर कोर्टाचे आदेश  – जगदीश खैरालिया

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगार राजबीर सोनपाल चौहान यांना पूर्वलक्षी प्रभावाने कामावर हजर करून घेणे बाबत मा.ठाणे लेबर कोर्टाने आदेश पारित केले आहे, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. कम्प्लेंट (युएलपी) क्र .५५ /२०२१ नुसार ठाणे लेबर कोर्टात राजबीर चौहान यांनी दावा दाखल केला होता. अर्जदार सफाई कर्मचारी राजबीर यांना दि. २९ जानेवारी २०२१ रोजी अचानक ठेकेदार मेसर्स. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. पुणे यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अचानक कामावरून काढून कमी केले होते. अनेक महिने प्रयत्न करूनही ठेकेदार चे मालक श्री विजय कांबळे आणि रूग्णालय प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने राजबीर चौहान यांनी शेवटी न्याय मिळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. ठाणे मनोरूग्णालयातील कायम कर्मचाऱ्यांनी संप पुकारले असतांना कंत्राटदारांमार्फत मार्फत कार्यरत सफाई सेवकांनी मनोरूग्णांचे हित लक्षात घेऊन साफसफाईचे काम बंद केले नव्हते. तरी देखील राजबीर चौहान यांना विना कायदेशीर प्रक्रिया कोणतीही बचावाची संधी न देता अचानक कामावरून कमी केल्याने राजबीर चौहान यांनी न्यायालयात दाद मागितली होती. सुमारे साडे तीन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेवटी न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  कोर्टात राजबीर चौहान यांची बाजू ज्येष्ठ वकील नितीन शिवकर यांनी बाजू मांडली ठेकेदार तर्फे. वकील सचिन रेगे आणि रूग्णालय प्रशासनातर्फे वकील ए. के. पुराणिक यांनी बाजू मांडली होती.  ठाणे  लेबर कोर्ट येथे श्रीमती धनश्री मोरे (जज) यांनी दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी हा निकाल जाहीर केला आहे. याप्रकरणात वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांचे देखील कामगार राजबीर चौहान यांचे आभार व्यक्त केले आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार यांनी हटवादी भूमिका घेऊन राजबीर चौहान यांना कामावर हजर करून घेऊन कोर्टाचे आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर कोर्टाचे अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली जाईल असा इशारा युनियन तर्फे कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. 000000

झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

डोंबिवली : दुकानात झोपेची गोळी नाही, असे कारण औषध खरेदीसाठी आलेल्या खोणी-पलावातील एका रहिवाशाला औषध विक्रेत्याने दिल्याने त्याचा राग येऊन रहिवाशाने आपल्या साथीदार मुलासह औषध विक्रेत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला आहे. दीपक अमृतलाल करोडिया (५४, रा. लेकसाईड, पलावा, खोणी), दीपक यांचा मुलगा दर्शन (३२) अशी आरोपींची नावे आहेत. खोणी पलावा येथील लेकशोअर ग्रीनमधील संजीवनी मेडिकल दुकानात हा प्रकार घडला आहे. या दुकानातील अंबरनाथ कोहजगाव भागात राहणारा कामगार अजय रामचंद्र स्वामी (३२) यांनी मारहाणप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अजय स्वामी हे संजीवनी मेडिकल दुकानात ग्राहकांना औषध विक्रीची कामे करतात. सोमवारी रात्री दुकान बंंद केले जात असताना दुकानात पलावा भागात राहणारे आरोपी दीपक करोडिया आणि त्यांचा मुलगा दर्शन दुकानात आले. त्यांनी जवळ डाॅक्टरांची औषध चिठ्ठी नसताना औषध विक्रेता अजय यांना झोपेची गोळी मागितली. अजयने झोपेची गोळी नाही असे उत्तर दिले. त्याचा राग दीपक यांना आला. त्यांनी अजय यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा दर्शन याने दुकानात शिरून दुकानात असलेला लाकडी दांडका घेऊन त्या दांडक्याने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. 00000

डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा

 ह प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी     डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील शेवंता हाईट्स या बेकायदा इमारतीवर पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी कारवाई केली. सहा वर्षापूर्वी ही बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली होती. ही इमारत पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत घोषित केली होती. ही बेकायदा इमारत मयत शेवंताबाई जोशी यांच्या नावाने होती. शेवंताबाई यांचे वारस विजय दत्तू जोशी, वंदना प्रकाश जोशी, अरूण दत्तू जोशी आणि विकासक प्रमोद अरूण देसाई, राहुल अरूण मैद यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता ही बेकायदा इमारत उभारली होती. या इमारती विषयी पालिकेत अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांनी ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित केली होती, पण या इमारतीवर तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नव्हती. विद्यमान साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त घेऊन ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. या इमारतीचे पहिले खांब, भिंती तोडण्यात आल्या. नंतर पोकलेन लावून ही इमारत भुर्ईसपाट केली जाईल, असे ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले.ही इमारत पुन्हा बेकायदा पध्दतीने उभारण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला तर त्यांच्या एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सावंत यांनी दिला. ह प्रभागातील बेकायदा बांधकामे ह प्रभागातील बेकायदा म्हणून घोषित केलेल्या जुन्या डोंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांची फशी हाईट्स, गटार तोडून उभारलेली बेकायदा इमारत, उमेशनगर जवळील राहुलनगर मधील सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड, कोपर येथील सखारामनगर काॅम्पलेक्स जवळील रस्त्यात उभारलेली बेकायदा इमारत, कोपरमध्ये बीएमपी गृहसंकुल भागात उभारलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीतील शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, गरीबाचापाडा श्रीधर म्हात्रे चौकातील क्रीडांगण आरक्षणावरील वसंत हेरिटज इमारत, चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील भागातील बेकायदा इमारतीचा पाया, कोपर रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्याचा खुराडा, खंडोबा मंदिराजवळील बेकायदा इमारत. तसेच, देवीचापाडा खाडी किनारी सुरू असलेल्या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी सुरू करावी, अशी मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. 00000

अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या!

जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन     अंबरनाथः अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणारे पिण्यायोग्य पाणी गेल्या दिवसांपासून गढूळ येत असून त्यामुळे नागरिकांनी पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना गढूळ पाण्याबाबत तक्रार करण्याचे आवाहनही प्राधिकरण्याच्या वतीने करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरातील मोठा भाग आणि संपूर्ण बदलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरणाच्या वतीने बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीतून बॅरेज बंधाराय येथे पाणी उचलले जाते. प्राधिकरणाच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात यावर प्रक्रिया करून ते विविध जलकुंभांच्या माध्यमातून वितरीत केले जाते. पावसाळा सुरू होताच नदीत गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी प्रक्रिया केल्यानंतरही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होता. गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. गळक्या जलवाहिन्या शोधा नागरिकांनी आपल्या पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळजोडणी गटार भागातून जात नसल्याची खात्री करावी. तसे आढळल्यास ही जलवाहिनी गटारीतून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. तसेच त्यावर गळती होत नसल्याची खात्री करावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. सोबतच बहुमजली इमारतीतील ग्राहकांनी पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता करावी, असेही आवाहन प्राधिकरणाने केले आहे. इथे नोंदवा तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवर गळती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. अंबरनाथ (पूर्व / पश्चिम) :- ९२२०६०६८५४, ९८६०३२४२३६. तर बदलापूर पूर्व ९८६९७८६१५१, पश्चिम ८९८३२८०२३२ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक तक्रार नोंदवू शकतात.

डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार

वाणगाव : डहाणूतील शेतकरी हा आधुनिक विचारसरणीचा असल्याने शेतात पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीचा परिस्थितीनुसार बदल होत असतो. यंदाही तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने, तर ५० हेक्टरवर एसआरटी पद्धतीने भातलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार आहे. भातशेती हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. डहाणू तालुक्याचे एकूण ९८,५३७.३८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यातील १५,७४३.६० हेक्टरवर भातलागवड आणि २३४.७५ हेक्टरवर नागलीचे पीक घेतले जाते. यंदा तालुक्यात ५० हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने आणि ५० हेक्टर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भातलागवड होणार आहे. डहाणूतील नरेशवाडी येथेही २० एकर क्षेत्रावर यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात येणार आहे. नरेशवाडी, डेहणेपळे, रानशेत, रणकोळ, ऐना, वाघाडी या भागांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. तालुक्यातील सर्व कृषी सहायकांनी आपापल्या सजेतील शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून आधुनिक लागवड पद्धतीचा अवलंब करत आहेत, असे डहाणूचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. नरेशवाडी संस्थेने नुकतेच नवीन भात लागवड यंत्र खरेदी केले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही यंत्राद्वारे लागवड करावी. यासाठी ते यंत्रांचे कमीत कमी भाडे आकारून लागवडीस प्रोत्साहन देणार आहेत. ट्रे तयार करण्याची पद्धती रोपे ट्रे किंवा प्लास्टिक कागदावर चौकट करता येतात. पेरणीच्या सुरुवातीला माती व शेणाचे ७०:३०चे प्रमाण ठेवून ट्रे भरावे. एकरी फक्त आठ किलो बियाणे लागते. पारंपरिक पद्धतीपेक्षा साधारणत: दहा ते बारा किलो बियाण्याची बचत होते. एका ट्रे मध्ये ८० ग्रॅम बियाणे पेरले जाते. एकरीसाठी १०० ट्रे लागवडीसाठी लागतात. रोपवाटिका तयार करताना सर्वप्रथम ६० ते ७० टक्के ट्रे मातीने भरून घ्यावे. त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मिसळून त्यावर एकसमान बियाणे पसरवावे. खरीप हंगामात कृषी विभाग डहाणू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. भातपिकाचे विविध प्रात्यक्षिके, एसआरटी, यंत्राद्वारे भातलागवड, चारसूत्री लागवड पद्धत, ⁠भात व नाचणी पिकासाठी शेतीशाळा, ⁠एक रुपयात पीकविमा, लागवडीनंतर त्यावर येणाऱ्या कीडरोगाबाबत माहिती, क्रॉपसॅपअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मदत करणे आदी कामे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. भात प्रमुख पीक असल्याने त्याचे लागवड क्षेत्र कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहेत.

पदपथांना फेरीवाल्यांचा वेढा, बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची कसरत

मुंबई : कायम वर्दळ असलेल्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका प्रशासन अधूनमधून संबंधित फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र, पदपथांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात पालिका पूर्ण अपयशी ठरली आहे. रस्त्यांवर पसरलेल्या पथाऱ्यांमुळे पादचारी, प्रवाशांना अडथळा ठरत आहेत. बोरिवली पोलीस ठाण्याच्या आसपासच्या परिसरातही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. तसेच, सातत्याने फेरीवाल्यांची संख्या वाढत असून ही समस्या सोडविण्यात यंत्रणा उदासीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एस. व्ही. मार्ग, जांभळी गल्ली आणि आसपासच्या परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांना फेरीवाल्यांचे अडथळे पार करून स्थानक गाठावे लागत आहे. गरोदर स्त्रिया, वृद्ध, अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांच्या समस्येमुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच, यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित ठिकाणच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल होताच काही वेळ रस्ते मोकळे होतात. मात्र, पथक निघून गेल्यानंतर काही वेळात फेरीवाले पुन्हा पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करतात. अनधिकृत फेरीवाल्यांना आता पालिकेप्रमाणेच पोलिसांचीही भीती राहिलेली नाही. बोरिवली स्थानकाबाहेरील पोलीस ठाण्याला लागूनच अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरले आहेत. पादचारी आणि फेरीवाल्यांमध्ये अनेक वेळा वाद होतात. फेरीवाले अर्वाच्च भाषेत पादचाऱ्यांना शिवीगाळ करतात. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही ही समस्या जैसे थे आहे. न्यायालयाने रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. मात्र, बोरिवलीसह विलेपार्ले येथील तेजपाल नगर, मोंघीबाई मार्ग, मालाडमधील आनंद मार्ग, अंधेरीतील एम. ए मार्ग, स्टेशन रोड, एस. बी मार्ग आदी भागात फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. विलेपार्ले स्थानकाबाहेरील रस्त्यांवर थेट अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. दादरमधील सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग, एन. सी केळकर मार्ग, छबिलदास मार्गावरही फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. वांद्रे येथील हिल रोड आणि आसपासच्या परिसरातही अशीच स्थिती आहे. गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आदी परिसरातही फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ‘केवळ विचारमंथन नको’ उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मुंबई पालिकेला अनेकदा खडसावले आहे. मात्र, मुंबईतील पदपथ अद्यापही फेरीवाल्यांच्या कचाट्यातून मोकळे झालेले नाहीत.काही पदपथ अनधिकृत बांधकामांनी गिळंकृत केलेले आहेत. तर, अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथांवर ठाण मांडले आहे. नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच, न्यायालयाने अतिक्रमणाची समस्या सोडवण्याबाबत विचारमंथन करण्यात वेळ खर्ची घालण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. 0000

‘आयडॉल’चे प्रवेशसाठी विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येणाऱ्या पदवीस्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना https:// mu. ac. in/ distance- open- learning या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘आयडॉल’मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. गतवर्षी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’च्या चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी या विभागीय केंद्रांवर प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. तसेच, पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे. ‘ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश घ्यावा’, असे आवाहन ‘आयडॉल’चे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी केले आहे. प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), बी.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. , एम. ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, जनसंपर्क), एम. ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम. कॉम. , एमएमएस, एम.एस. सी. , एम. एस. सी. (संगणकशास्त्र), एमसीए व प्रथम व द्वितीय वर्ष एमएमएस आणि एमसीए प्रथम व द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू होतील. ०००००