Month: June 2024

घनकचरा विभागाने सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईत

1 क्व‍िंटलहून अधिक प्लॅस्टिक जप्त     ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 38 हजार 450 रु. इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या पथकाने केली. सदर कारवाईअंतर्गत विविध प्रभागसमितीतील दुकाने व आस्थापना यांचेकडून सिंगल युज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण रु. 9 हजार रु. दंड, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार 500 रुपये दंड,  दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 3 हजार 500 रु दंड, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 09 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार रु. दंड, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, लोकमान्य सावरकर प्रभागसमिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 5 हजार 700 रु. दंड, वागळे प्रभाग समिती क्षेत्रातून 13 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार 250 रु. दंड, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 2 हजार 500 रु.दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या 9 प्रभागसमिती क्षेत्रातून एकूण 38 हजार 450 रु. दंड वसूल करण्यात आला असल्याची मा‍हिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सिंगल यूज प्लॅस्टिकबाबतची कारवाई ही  नियमित सुरू राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा व दुकानदारांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकची विक्री करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 0000

माथेरानमध्ये स्वच्छ पाणी व तलाव स्वच्छतेसाठी उपोषण

माथेरान : माथेरानमधील श्री राम मंदिर समोर निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून येथील शार्लोट लेकच्या स्वच्छतेसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून, गेले १० वर्ष पेक्षा अधिक काळ होऊन ही माथेरान मधील पिण्याचा पाण्याचा लेक साफ केला गेला नसून त्यामुळे येथे पावसाळ्यातील दिवसांमध्ये रोगराई वाढत आहे तर अशुद्ध पाण्याचा पुरवठा ही होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने माथेरान नगरपालिकेला अगोदर निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वछ करावा अशी मागणी केली होती व जून 25 पर्यंत स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता परंतु ह्या कालावधी मध्ये काम सुरू न झाल्याने आजपासून संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष कदम हे आमरण उपोषणास बसले आहेत. शार्लेट हा माथेरान नगरपालिकेच्या मालकीचा असून अमृत 2 या कार्यक्रमांतर्गत माथेरान नगर परिषदेकडून माथेरान शार्लेट तलाव सुशोभी करण्याकरता 4:99.82 लक्ष इतके अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते,अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ पनवेल कार्यालयाकडून त्यास 6/2/2023 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती सदर अंदाज पत्रक तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करून टाकने तसेच सदर तलावातील गेट व ब्रिज बाजूची दुरुस्तीकरितांची तरतूद होती त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्याचप्रमाणे माथेरान नगर परिषदेस राज्य शासनाने राज्यसरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माथेरान येथील शार्लेट तलावास पर्यावरण दृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी 7/ 3/ 2007 रोजीच्या शासन निर्णय नुसार362:65लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिशापोटी रुपये 326:38लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मंजूर रकमेपैकी 200 लक्ष इतका निधी आतापर्यंत वितरीत केला असून माथेरान नगर परिषदेच्या 2/3/ 2023 रोजीच्या पत्रानुसार उर्वरित कामे करण्यासाठी 100 लक्ष इतका निधी नगर परिषदेस उपलब्ध करून दिला असल्याने 27/03/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आले आहे.परंतु ह्या निधीचा वापर लेक च्या स्वच्छते व सुशोभीकरणासाठी न होता इतरत्र वापरला गेला का की ह्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे असे उपोषण ठिकाणी चर्चा सुरू होती. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने वारंवार तलाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनविरोधात दंड थोपटले असून ,माथेरान येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना गडूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा तलाव तातडीने स्वच्छ व्हावा ह्याकरता उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यास माथेरान मधील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी संघटनेचे योगेश शिंदे,अविनाश गोरे,सीमा कदम,जगदीश कदम,विजय सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते. 000000

 महाराष्ट्राला दारूबंदी नव्हे तर दारू नीतीची गरज

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन     मुंबई : दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दारूबंदी नव्हे, तर दारू नितीची गरज आहे. दारूबंदीमुळे मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, पण ते शून्य होणार नाही. त्यासाठी दारू नीतीची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. यशवंतराव चव्हाण केंद्र, प्रथम आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे माजी सनदी अधिकारी व यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस शरद काळे यांच्या प्रथम स्मृतीप्रितर्थ्य मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दारू नीतीची अंमलबजावणी करून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण गडचिरोलीत ६८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोलीत राबवण्यात येत असलेला ‘मुक्तिपथ’ हा महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले, ‘प्रथम’च्या संचालिका फरीदा लांबे, शरद काळे यांच्या पत्नी सुनीती काळे, त्यांच्या कन्या डॉ. सुचित्रा काळे-दळवी, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्ष प्रा. विस्पी बालापोरिया, यशवंतराव चव्हाण केंद्राचे विश्वस्त अजित निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले उपस्थित होते. 00000

आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास

ठाणे : आईला भेटण्यासाठी सातासमुद्रापार असलेल्या लेकानं तब्बल १६ देशांचा अनोखा प्रवास केला आहे. विराजित मुंगळे असं या मुलाचं नाव असून त्यांनी लंडन ते मुंबई असा कारने प्रवास केला. विराजित यांना या प्रवासासाठी ५९ दिवस लागले. या काळात जवळपास १८ हजार किलोमीटरचा रस्त्याने प्रवास केला. १६ देशांमधून सुरु झालेला हा प्रवास ठाण्यात येऊन थांबला आहे. विराजित मुंगळे हे एक ब्रिटीश भारतीय आहेत. त्यांनी आईला सरप्राईज देण्यासाठी लंडनहून बाय कारने मुंबई गाठली. विराजित हे फ्लाईटनेही येऊ शकले असते परंतु एक थरारक अनुभव घ्यायची इच्छा असल्याने त्यांनी हा कारने मुंबईत यायचे ठरवले. विराजित यांनी लंडनहून ठाणे यात १८३०० किमी प्रवास कारने केला. या प्रवासात १६ देश, ज्यात जर्मनी, रशिया आणि चीनचाही समावेश आहे. प्रत्येक देशात त्यांनी जेवणाचा, राहण्याचा अनुभव घेतला. विराजित ऐतिहासिक सिल्क रोडशी प्रेरित आहेत. त्यामुळे अशीच रोड ट्रिप करण्याची त्यांची इच्छा होती. या रस्ते प्रवासात विराजित यांनी दिवसाला ४०० ते ६०० किमी अंतर दिवसाला कापले. त्यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीचा प्रवास करणेही टाळले. मात्र इतका मोठा प्रवास करून घरी पोहचताच आईचा ओरडाही विराजित यांना ऐकावा लागला. इतक्या देशातून प्रवास करण्यासाठी विराजित यांनी आधीच सर्व परवानग्या घेऊन ठेवल्या होत्या. सोबतच ट्रिपसाठी ऑफिसहून २ महिन्याची सुट्टीही घेतली परंतु हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. रस्त्यात अनेक ठिकाणी उंच पर्वत, कमी ऑक्सिजन यामुळे त्यांना आजारपणाचाही सामना करावा लागला. ५२०० मीटर उंच आणि खराब वातावरणामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले. त्यानंतर ठाण्यात पोहचून विराजित हे त्यांच्या आईला भेटले. आता ठाण्याहून पुन्हा लंडनाला जाण्यासाठी ते लाँग ड्राईव्ह करत जाणार नाही. आता ते त्यांची चारचाकी लंडनला शिपमधून पाठवतील आणि स्वत: विमानाने लंडनला जाणार आहेत.

ट्रेकिंगला येणाऱ्या पर्यटकांना अनुभव नसल्याने अपघातांमध्ये वाढ

माथेरान : पावसाळा म्हणजे तरुणाईला साद घालणारा निसर्ग, अनेक जण पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असाल व पावसाला सुरुवात होताच वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता कोणतीही माहिती न घेता थेट पोहोचत असतात परंतु या हौशी पर्यटकांना माहिती अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पहिल्याच पावसामध्ये अशा अनेक अपघाती घटना घडल्याने हा प्रश्न आता खंबीर स्वरूप धारण करीत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा भेद करत असाल तर त्या ठिकाणचे सर्व माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्याकरिता माथेरान मध्ये माथेरान पोलिसांनी एक मोहीम सुरू केली असून केव्हाही कुठे माथेरान परिसरात गरज असल्यास पोलीस खाते तत्पर असणार असल्याचे येथील एपीआय अनिल सोनोने यांनी सांगितले. माथेरान  हे मुंबई पुणे ठाणे कल्याण नाशिक यासारख्या मेट्रो सिटी पासून अगदी जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे माथेरानच्या पर्वत रांगांची अनेक पर्यटकांना नेहमीच भुरळ पडलेली आहे, त्यामुळे तरुणाई पाऊस सुरू होण्या अगोदरच माथेरानला येणाऱ्या पर्वतीय पर्वतरांगांमधून ट्रेकिंग द्वारे येण्याचे बेत आखत असतात, व पावसाला सुरुवात होताच माथेरानच्या डोंगररांगा या हौशी ट्रेकर्सने फुलून गेलेल्या दिसतात परंतु या परिसराचे योग्य माहिती नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असते त्यामुळे माथेरानला येण्याअगोदर येथील पर्वतीय रस्ते व त्याच्या सुरक्षिततेची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. माथेरान करिता येणारे सुरक्षित ट्रेकिंगचे रस्ते पनवेल येथून माथेरान करिता धोधानी पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे व तिथून पुढे माथेरान करिता दोन पायवाटा आहेत त्यातील मंकी पॉइंट येथून येणारी वाट ही पावसाळ्यात अती धोकादायक आहे,त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी ही वाट न पकडता येतील सनसेट पॉईंट येथे येणारी कमी धोकादायक वाटेने आल्यास अधिक सोपे जाते , येथील खालापूर तालुक्यातील चौक येथून ही माथेरान करिता दोन रस्ते येतात त्यातील एक थेट वन ट्री हिल पॉइंट येथे येतो तर दुसरा रामबाग पॉइंट येथे येतो . नेरळ येथून पेब किल्ला फिरून माथेरान हा ही एक मार्ग सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे . भिवपुरी येथून येथील गारबट पॉइंट हा ही एक अतिशय अवघड ट्रेक उपलब्ध आहे परंतु जे हौशी पर्यटक आहेत त्यांनी हा टाळलेलाच बरा, अशा अनेक वाटा पावसाळी पर्यटनासाठी हौशी गिर्यारोहक शोधत असतात पण रस्त्यांची संपूर्ण माहिती नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागते त्यात प्रामुख्याने अनेक जण निसरड्या वाटेने जाण्यासाठी लागणारे साहित्य बरोबर नेत नसल्याचे निदर्शनास येत आहे तर काही स्वतःबरोबर प्राथमिक उपचाराचे साहित्य बरोबर ठेवत नाही तर निसरड्या वाटेवरून चालण्यासाठी लागणारे ट्रेकिंग शूज ही न वापरता अशा ठिकाणी गेल्यानंतर अपघातास आमंत्रण देत असतात सर्वात महत्त्वाचे आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणची भौगोलिक माहिती काही आपत्कालीन परिस्थिती तर आवश्यक ते टेलीफोन नंबर त्या ठिकाणी मोबाईल साठी नेटवर्क आहे का की आपण दुसऱ्यांची संपर्क साधू शकतो अशी माहिती न घेताच अनेक जण या ट्रिप टाकत असतात व अपघातास आमंत्रण देतात त्यामुळेच माथेरानला येण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करून ट्रिप आखावी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरान मध्ये  आपत्कालीन स्थिती उद्भाविल्यास खालील नंबर बरोबर संपर्क करावा.

पर्यटनासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करा-किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहेत. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटनांच्या होऊ नये यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधबे , समुद्रकिनारे अशा जागांवर जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार , गटविकास अधिकारी , पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सुचित केले.;यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बस्टेवाड यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्रकिनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे, विविध धबधबे गड-किल्ले आदीं ठिकाणी संबंधित विभागांच्या वतीने उपाययोजना करणेबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रूपाली पाटील , कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली. मान्सून पर्यटनाच्या अनुषंगाने विविध तलाव, धबधब्याच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक येत असतात . या व मागील वर्षी काही ठिकाणी अपघात होवून पर्यटकांच्या मृत्यु होण्याच्या दुघटना घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रबळगडाच्या धर्तीवर इरशाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड(पेठ गड), सागरगड व इतर पर्यटकांच्या गर्दी होणाऱ्या वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यावर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे. पर्यटकांना स्थानिक गार्डड सोबत नेणे बंधनकारक करावे. पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे , पाणी प्रकल्प समुद्र किनारी व इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करणे बाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या. 0000

तुर्भे विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम

नवी मुंबई : शहर प्लास्टिकमुक्त असण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या तसेच एकल वापर प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमाही राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक फ्री मार्केट ही संकल्पना राबविली जात आहे. या मार्केटमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कापडी पिशव्या वेंडींग मशीन लावण्यात येत आहेत. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिम राबवताना तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या दोन व्यावसायिकांवर कारवाई करत प्रत्येकी रु. 5 हजार प्रमाणे एकूण रू. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम जमा केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवणा-या दोन व्यावसायिकांविरुध्द कारवाई करुन प्रत्येकी रु. 250/- प्रमाणे एकूण रु. 500/- इतका दंड वसूल केला. या कारवाईमध्ये स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील आणि स्वच्छता निरीक्षक सहभागी होते. 00000

इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर यांची तपासणी व धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार !

समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांच्या तक्रारीची ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी घेतली दखल अनिल ठाणेकर     ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा उपशहरप्रमुख, समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी, युवासेनेचे ओवळा माजीवडा विधानसभा सचिव सागर बैरीशेट्टी, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, संजय मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना ठाण्यातील गावंडबाग क्षेत्रातील टर्फ बाजूच्या इमारतीतील वेदर शेड उडून झालेल्या अपघातामुळे ९ मुले जखमी झाल्याची दुर्घटना कानावर घालून ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी करण्याची तसेच धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याची तत्काळ दखल घेत सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या घेतलेल्या बैठकीत अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा होऊन महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी तसेच धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी.महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत.त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश दिले. वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी ९ मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्यास त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.इतर प्रभागातील ८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 0000

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र.…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी. 0000