Month: June 2024

राष्ट्रवादी काँग्रेस राजर्षी शाहू महाराजांची जयंती राज्यभर विविध उपक्रमांनी साजरी करणार – सुनिल तटकरे

मुंबई दि. २५ जून – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांनी राज्यभर साजरी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत आला असून या युगपुरुषांचे सामाजिक सलोखा आणि लोकशाही विचार या मूलमंत्राने दिनांक २६ जून ते १ जुलै या दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे. ३० जून रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‘सामाजिक सलोखा परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक, व्याख्याते व विचारवंत यांचा सहभाग असणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर ‘कृषी दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिनी’ त्या – त्या जिल्हयातील व तालुक्यातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालयात ‘तंत्रज्ञानयुक्त शेती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. 000

बेस्ट कामगार परळ वसाहतीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठयात उत्सवात संपन्न

लोकमाता अहिल्यामाई होळकर यांची २९९ वी जयंती   मुंबई :  बेस्ट कामगार अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने माता अहिल्यामाई होळकर यांची २९९ वी जयंती बेस्ट कामगार परळ वसाहतीत विविध सांस्कृतिक भरगच्च सुत्यउपक्रम राबवून मोठया उत्साहात जयंती उत्सवाचे अध्यक्ष श्री सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न केली. सर्व प्रथमतः माता अहिल्यामाई होळकर यांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण सन्मानीय स्थानिक आमदार श्री अजय चौधरी यांनी करून प्रमुख वक्ते समाजभूषण सो ना काबळे, प्रा.दादा धडस सर,बी जी गायकवाड गुरूजी, यांच्या शुभ हस्ते समई दिप प्रज्वलित करून जयंती उत्सव सोहळ्याचे उद्घाटन झाले, प्रतिमा पुजन जयंती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष श्री आंनदा जरग, सचिव श्रीअनिल कोळपे, खजिनदार दत्तात्रेय पुळके, श्री यशवंत मदने,सुरेश धायगुडे आदि सन्मानीय मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.सदर प्रंसगी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून बेस्ट कामगार सेवानिवृत्त बस निरीक्षक श्री रमेश कोळपे, बस चालक श्री शिवाजी कोळपे,यांचा पुष्पगुच्छ,शाल,फेटा, बेस्ट बस स्मृतीचिन्ह देऊन उपस्थितीत मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. उपस्थितीत मान्यवरांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत झाले, प्रमुख पाहुणे आमदार श्री अजय चौधरी यांनी जयंती निमित्त शुभेच्छा देवून आपल्या भाषणात म्हणाले की,  ३१ मे २० २४ ला जयंती माता अहिल्यामाई होळकर होती, लोकसभा निवडणुकी काळ असल्याने व पावसाळ्यात शेतीचे कामे व बेस्ट उपक्रमातील आपले नौकरी दिवस संभाळून जवळपास आपण बेस्ट कामगारानी एक महिन्यानी ती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन कौतुक केले, पुढे आमदार चौधरी म्हणाले की, माता अहिल्यामाई होळकर यांची जयंती वर्ष भर ही साजरी केली तर ही अहिल्यामाई होळकरच्या थोर कर्तबगारी उपकाराची परतफेड करू शकत नाही,असे ते आवर्जुन म्हणाले. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त बेस्ट कामगार बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप.क्रेडीट सोसा.मुंबई अध्यक्ष समाजभूषण सो ना कांबळे यांनी सविस्तर भाषणात माता अहिल्यामाई होळकर यांचा जीता जागता क्रांतीकारक इतिहास जयंती उत्सव सोहळ्यात प्रदीर्घ भाषणात वर्णन करताना म्हणाले की, इ.स.जन्म ३१ मे १७२५ पुण्यश्लोक माता अहिल्यामाई होळकर ग्रामीण दुर्गम खेडेगांव चौंडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर येथे वडील माणकोजी शिदे व आई सुशिला शिदे, माणकोंजी शिंदे हे गावचे पाटील होते,मल्हारराव होळकर यांच्या मागणीनुसार आठ वर्षांची मुलगी अहिल्यामाई  यांचे लग्न शनिवार वाडा पुणे येथे २० मे १७३३ मध्ये फक्त बारा वर्षांच्या खंडेराव होळकर होवून त्या सासरी इंदूरला जावून होळकराची सुन म्हणून क्रांतीकारक इतिहास घडविला तो पुढील आपणास सविस्तरपणे आपणास थोडक्यात सांगतो, कांबळे म्हणाले की, माता अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या समभावाचा आदर्श मिरवीत हिंदु मंदिरे,मशिद,चर्च,बौद्ध विहारे,आदि धर्मियांचे बांधली व देशभरातील मंदीराचा जीर्णोद्धार केला, विहिरी पानवटे, रस्ते,महारस्ते बांधून पर्यटनाला प्रोत्साहन देऊन मजुरांना काम मिळाले, विश्रामगृह, महिला साठी खास स्नानगृह त्यांच्या मुलाबाळांची काळजी घेवून निर्माण केली, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण करून आपल्या राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या शूरवीर यशवंत फणसे या आदिवासी बहादूरा आपल्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला तडा दिला, धर्मातील रूढी पंरपंराचा आंधळेपणा कधीही स्वीकारला नाही,  पती खंडेराव याना वीरमरण आले असता आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या विनंतीवरून सती गेल्या नाहीत त्या तरुण वयात विधवा २९ व्या वर्षी होवून पती खंडेराव १७५४, मल्हारराव  सासरे १७६६, मुलगा मालेराव १७६७ च्या निधनानंतर त्यांच्या जीवनातील उत्तम राज्यकारभाराचे २९ वर्ष राघोबा पेशवाईचा पन्नास हजार फौज फाट्याला नामोहरम करून शरणार्थी आणून कंकण व महिला फौजेचा दणका देवून युक्तिवादाने लढाई जिंकून लाभल्याची जागतिक पुस्तकात नोंद असून आपला नातू नथाबा, त्यानंतर एकच वर्षात जावई यशवंत फणसे यांचे निधन व मुलगी मुक्ताबाई या १७९१ला आपल्या पती बरोबर सती गेल्या, त्यांनी इंदूरवरून राजधानी नर्मदा नदी च्या महेशवर हे वसाहत स्थापन केल्या ठिकाणी त्यांचे वृध्दापकाळाने ७० व्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ निधन झाले!एका खडतर जीवनाचा अंत झाला पण इतिहास रूपाने अहिल्यामाई होळकर आपल्यात जिवंत असल्याचा भास होतोय! त्यांनी एकच धर्म पाळला तो म्हणजे मानता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लावता राज्याचा कोष समृध्द लोककल्याणसाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्याचे प्रदीर्घ आपल्या घणाघाती भाषणात प्रमुख वक्ते समाजभूषण सो ना कांबळे यांनी ठणकावून सांगुन उपस्थितीत सर्व समाजातील व खास करुन धनगर समाजातील बंधूभगिनी अहिल्यामाई होळकर यांचा आदर्श घेतला तरच अहिल्यामाई होळकर जयंतीचा जल्लोष जागर सार्थकी होईल असे गौरवोद्गार काबळे यांनी काढून माता अहिल्यामाई होळकरच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन केले आमदार अजय चौधरी, प्रा. दादा धडस, श्री बी जी गायकवाड गुरूजीआदिने यांनी आपले विचार थोडक्यात प्रगट करून माता अहिल्यामाई होळकर यांचा संपूर्ण इतिहास प्रमुख वक्ते सो ना कांबळे यांच्या तोंडून ऐकल्याचे समाधान व्यक्त केले सदर वेळेस महिलांचा हळदी कुंकूसंमारभ मुलांच्या सांस्कृतिक भरगच्च विविध सुत्यउपक्रम कार्यक्रम राबवून बेस्ट कामगार परळ वसाहतीत माता अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव सोहळ्या मोठया उत्साहात संपन्न झाल्याचे बेस्ट कामगार नेते मुक्त पत्रकार समाजभूषण सो ना कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

 शौचालय नूतनीकरणाच्या कामात थुकपट्टी 

कंत्राटदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा मनविसेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांचे आयुक्तांना पत्र   ठाणे : शौचालय नूतनीकरणाच्या २ कोटींच्या कामात शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन केली आहे. माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत मागासवर्गीय निधी तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शौचालय नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या संदर्भात पत्र दि. 21 मार्च 2024 रोजी माजिवाडा – मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनाही दिले आहे. पत्र देऊन तीन महिने होत आले तरी अद्याप कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका परिमंडळ 3 च्या उपायुक्तांना तीन वेळा भेटूनही सदर विषय सांगितला असता त्यांनी आमच्यासमोर तीन वेळा फोन करुन कार्यकारी अभियंता संजय कदम यांना सदर विषयात लक्ष घालण्याचे सांगितले परंतू संजय कदम यांनी उपायुक्त यांना देखील जुमानले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार भेटून, फोन करुन निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत माहिती दिली होती परंतु त्यांनी देखिल दुर्लक्ष केले. अशा प्रकरणांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा सतत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांसोबत मैत्रीचे संबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे हेमंत मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. कंत्राटदारांने फक्त बाहेरुन रंगरंगोटी करून शौचालय नूतनीकरण झाल्याचे भासवले आहे. निविदेत दिलेली बरीचशी कामे कंत्राटदाराकडून करण्यात आलेली नाहीत. जुन्या दरवाजांना अर्धवट रंग देऊन नविन दरवाजे असल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढी थूकपट्टी करुन अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, त्यामागचे कारण काय? तरी आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी केली आहे. 00000

 ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी होणार

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत. ‘ते ३३ जाहिरात फलक काढून घ्यावेत’ महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्या इमारतींवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले आहेत. पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. त्यास, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत सांगितले. अतिधोकादायक इमारतीबाबत दक्ष राहावे अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ०७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. इतर प्रभागातील ०८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 00000

प्रोजेक्ट आत्मनिर्भर’ क्रांतीकारी ठरणार-संदीप माळवी

अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या छत्र्यांची विक्री सुरु   ठाणे : रस्त्यावर निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचे काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल. सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार, असा आत्मविश्वास ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी येथे व्यक्त केला. समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल. प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी केले. जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, ऍड. ईश्वर सूर्यवंशी,  ऍड. प्रदीप टिल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील विविध सिग्नलवर वस्तू विकून चरितार्थ चलविणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड इंटरप्राइजेसच्या अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेसकोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील करण्यात येत आहे. अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे. ही उत्पादने सिग्नल शाळा व तीन हात नका सिग्नल येथे उपलब्ध असतील. 000000

मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक  निरीक्षक  नजीब मुल्ला यांनी दिली.तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष लक्ष्य साधण्याकरिता पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबाबतीतला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत आहे. मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील माझे सहकारी माजी नगरसेवक यांच्या मागणीनुसार हा ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झाली आहे. इथल्या आमदारांकडून विकासाच्या नावाखाली मागील काहीवर्षात पीए व ठेकेदार यांच्या मागणीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा प्रसिद्धी माध्यमांनीच प्रसिद्ध केला आहे. पण आम्ही मात्र नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नागरी विकास कामांमार्फत देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, महायुतीच्या राज्य शासनाकडून उपलब्ध ५० कोटी निधीचा उपयोग होणार आहे. मुंब्रा कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कौसाच्या पुढील लोकवस्ती आठी, वाय जंक्शन च्या पुढेल लोकवस्तीसाठी वनखात्याच्या जागेवर केंद्र सरकारने मंजूर केलेले आणखीन एक कब्रस्थान बनविण्यात येईल, कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक  निरीक्षक  नजीब मुल्ला यांनी दिली. तर प्रभाग क्रमांक ३२ पॅनलसाठी ५ कोटी, प्रभाग क्रमांक ३३ पॅनलसाठी ७. ६० कोटी रुपये, मिराज खान व आशरीन राऊत यांच्या पॅनलसाठी ६ कोटी रुपये, अजिज शेख व जाफर नोमानी प्रभाग क्रमांक ३० पॅनलसाठी ८.४० कोटी रुपये, मोरेश्वर किणे आणि इतर यांच्या प्रभाग ३१ पॅनलसाठी ६ कोटी रुपये, अनिता किणे व विष्णू भगत २६ पॅनलसाठी ८.५ कोटी रुपये, प्रकाश बर्डे प्रभाग क्रमांक २५ पॅनलसाठी ७.२० कोटी रुपये, याप्रमाणेच उद्यान, सुशोभीकरणसाठी ७ कोटी रुपये, दिवा येथील २९ नंबर पॅनलसाठी २५ लाख रुपये अशापद्धतीने या ५० कोटीच्या निधीचे विकास कामांसाठी वितरण केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानत आहे. डंकेकी चोटपर सच्चेपणाने काम करत आहोत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मागणीनुसार, लोकांमध्ये जावून, लोकांना विचारुन, लोकशाही पद्धतीने विकास कामांसाठी प्रभागनिहाय हा ५० कोटीचा निधी खर्च होणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा, प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर नईम खान, माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेवक राजू अन्सारी, अजीज शेख, इब्राहीम राऊत, मोरेश्वर किणे, मिराज खान, विश्वनाथ भगत तसेच तकी चेऊलकर, प्रभाकर सावंत, मनिषा भगत, राजनाथ यादव, जसबीर शेख, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध खेळाकरिता मुख्यमंत्री ५० कोटींचा निधी देणार-  प्रताप सरनाईक

एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवरील अनिल ठाणेकर   ठाणे : बोरीवडे येथील मैदानावर पी.पी.पी. तत्वावर उभारण्यात येणार्या कन्व्हेंशन सेंटर व स्पोर्टस् क्लब मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर स्थलांतरीत करण्यात यावे. येथील विविध खेळ खेळण्याकरिता या मैदानाचा उपयोग क्रीडापट्टूना करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असून त्याची लवकरच पुर्तता होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून या परिसरामध्ये अनेक नविन क्रिडापट्टू राहावयास आलेले आहेत. तसेच कित्येक लहान मुले ही वेगवेगळ्या क्रीडाक्षेत्रात पारंगत होण्यासाठी कासारवडवली येथील बोरीवडे मैदानाचा सरावासाठी वापर करीत असतात. मला मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ऍथलेटिक स्पर्धकांनी ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन ’या मैदानावर ऍथलेटिक ट्रॅक , बास्केटबॉल, हॉलीबॉल तसेच शिवाजी पार्कच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धांसाठी वापर करावा“, अशी मागाणी केली असून क्रीडा विभागाने त्याबाबतचा प्रस्तावही तयार केल्याचे समजते. घोडबंदर परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी २० एकरामध्ये असलेल हे एकमेव मैदान असून या मैदानाचा वापर क्रीडापट्टूना होणे गरजेचे आहे. बोरीवडे मैदानातील २० एकर जागेच्या सभोवताली कुंपन भिंत, सुसज्य प्रवेशद्वार त्याचबरोबर क्रीडापट्टूना एम.सी.ए.च्या धर्तीवर इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, बॅटमिंटन, हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, स्कॉश कोर्ट, मॅटवर खेळला जाणारा कुस्तीचा आखाडा, मुष्टियोध्दांसाठी आखाडा, मल्लखांब, मॅटवरची कबड्डी, खो-खो, लाँग टेनिस कोर्ट, यासह मैदानाच्या सभोवताली ऍथलेटिक्स खेळाडूंसाठी तीन मीटरचा सिथेंटिक ट्रॅक अश्या प्रकारचे विविध खेळ खेळण्याकरिता या मैदानाचा उपयोग क्रीडापट्टूना करता यावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असून त्याची लवकरच पुर्तता होणार आहे. त्यामुळे सर्व खेळांना प्राधान्य देणारे घोडबंदर परिसरातील हे एक अद्ययावत क्रीडा संकुल होईल यात शंका नाही.त्याचबरोबर भविष्यातील विकासाच्या दृष्टीने व विविध मोठमोठ्या व्यावसायिकांकरिता तसेच क्रीडापट्टूकरिता गोरेगाव येथील नेस्को, वरळीतील डोम यासारख्या कन्व्हेंशन सेंटर तसेच बीकेसी येथील स्पोर्टस् क्लब प्रमाणे ठाणे शहरामध्ये सुध्दा या सुविधा देणे गरजेचे आहे. त्याकरिता मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर बीकेसी येथे असलेल्या एम.सी.ए.च्या धर्तीवर क्रिकेट क्लब व कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी व एम.एम.आर.डी.ए.च्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे आपण बोरीवडे येथील पी.पी.पी. तत्वावर उभारण्यात येणारा प्रकल्प मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर स्थलांतरीत करून ऍथलेटिक तसेच विविध क्रीडा प्रकारात पारंगत असलेल्या क्रीडापट्टूना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांन केली आहे. ०००००

खासगी आस्थापनेवरील कोकण पदवीधर/शिक्षक मतदारांना विशेष दोन तासांची सवलत- अमोल यादव

 अशोक गायकवाड नवी मुंबई, : *कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील खासगी आस्थापनेवरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी २६ जून, २०२४ रोजी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.* भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै,२०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/शिक्षक निवडणूकीमध्ये खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू होत नसल्याने अशा व्यक्तींना मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष दोन तासाच्या सवलतीचा लाभ घेऊन पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. ०००००० ००००

बुध्दिबळ दिनानिमित्त २० जुलैपासून आयडियल बुध्दिबळ महोत्सव

मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदा आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा-महोत्सव  २० व २१ जुलै दरम्यान आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आला आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना  सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कार आणि एकूण १५० पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय क्रीडा चळवळीच्या व्यस्ततेमुळे  प्रदीर्घ कालावधीनंतर खास खुल्या  गटातील बुद्धिबळपटूच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्वांसाठी खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे २१ जुलै रोजी ३० चषक आणि एकूण  रोख रु.४१,०००/- पुरस्कारासह  आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार व चषक दिला जाणार आहे. तसेच एकूण १२० चषक पुरस्कारासह विविध ८ वयोगटाच्या बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी होणार आहेत. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत  स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २९ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) परिसरात  गुरुवार  दि. 27/06/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दि. 28/06/2024 रात्री 12.00 वा. पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी . ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ०००००