Month: June 2024

सर्व्हिस रोडवरील बिल्डरच्या अडगळीचे सामान हटवण्याची मागणी

ठाणे : सर्व्हिस रोड गुरुद्वारा पदचारी पुलाजवळ ड्रीम्स कंपनी ने टाकलेल्या त्यांच्या लोखंडी सामानामुळे या पुला वरून नागरिक ये-जा करू शकत नाहीत.  रहदारीच्या रस्त्यावरून लोकांना रस्ता क्रॉस करावा लागत आहे, यामुळे  अपघाताची शक्यताही खूप वाढली असून लोखंडी अडगळ काढण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेने  पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे. सुचिता कॉ-ऑप,सोस, लिमिटेड , C.T. S  No . ३४०/३४१/३४२/३४३ आणि ३४४ , टीका नं.१० , व्हिलेज नौपाडा ,ठाणे. येथे, सुचिता कॉ-ऑप,सोस चे  री-डेव्हलोपमेंट चे काम चालू आहे. जवळील सर्व्हिस रोड ला लागून पब्लिक फ्लाय ओव्हर ब्रिज आहे . याच ब्रिज वरून लोक ये-जा करतात , परंतु ड्रीम्स कंपनी ने टाकलेल्या त्यांच्या लोखंडी सामानामुळे या ब्रिज वरून लोक ये-जा करू शकत नसल्याचे … यांनी सांगितले सर्व्हिस रोड वर हे लोखंडी सामान असल्यामुळे आता पाऊस चालू झाला आहे तर तेथे पाणी साचते आहे आणि त्यामुळे तेथे खूप मच्छर होत आहेत त्यामुळे पब्लिक मध्ये आजारपण वाढण्याची शक्यता  वाढली आहे. बिल्डरच्या मनमानी कारभारामुळे ठाणेकरांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व्हिस रोड वरील सामान काढून  टाकावे. सर्विस रोड वरील सामान हटवून  लोकांना येण्या-जाण्यासाठी सर्विस रोड ताबडतोब खुला करून द्यावा अशी रिपब्लिकन बहुजन सेनेची मागणी आहे . जर हि कारवाई तात्काळ झाली नाही तर रिपब्लिकन बहुजन सेनाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. ०००००

कर्मचारी कामावर वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्या – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती वेळेवर असणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत प्रत्येक विभागप्रमुखाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी कामावर वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्यावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख व गतीमान होण्यासोबतच कार्यालयीन शिस्तीवरही नमुंमपा आयुकत्‍ डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून आज त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यालयातील सर्व विभागांना अचानक भेट देत पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रशासन विभागाचे उप आयुक्त्‍ शरद पवार उपस्थि होते. यावेळी आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती वेळेवर असणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत प्रत्येक विभागप्रमुखाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिले. कार्यालयातील नस्ती व कागदपत्रे शासकीय नियमावलीनुसार कपाटांमध्ये ठेवलेले असावेत याची विशेष दक्षता घेण्यात यावी व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात त्या पध्दतीने अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. मुख्यालयातील प्रत्येक विभागात नागरिक मोठया संख्येने भेटी देत असल्याने सौंदर्याला बाधा पोहचणार नाही अशा प्रकारे स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाचे संदेश प्रसिध्दी करण्यात यावेत असेही आयुक्तांनी सूचित केले.यावेळी स्वच्छतागृहांचीही तपासणी करुन आणखी सुधारणा करण्याच्या सूचना करतानाच वॉटर कुलरची अंतर्गत स्वच्छता तसेच त्याच्या आजुबाजूच्या परिसराची स्वच्छता नियमीतपणे होत राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निेर्देश देण्यात आले. सीसीटिव्ही कंट्रोल रुममधील अंतर्गत व्यवस्थापनामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचे निर्देशित करीत त्या ठिकाणची माहिती त्वरीत उपलब्ध्‍ होण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली सक्षम करावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कायम सतर्क असायला हवा. तसेच त्या ठिकाणी नागरिकांमार्फत येणारे संदेश दिनांक व वेळेसह अचूक टिपून घेतले जाऊन ते ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या विभागांना त्वरीत सूचना देऊन त्यावरील कार्यवाही ही नोंदवून ठेवण्याची कार्यप्रणाली काटेकोरपणे अंमलात आणावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. कक्षातील हॉटलाईन व संपर्कासाठीच्या दूरध्वनी लाईन्स कायम कार्यान्वित राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाप्रमाणेच विभाग कार्यालये व इतर कार्यालयांमध्येही अशा प्रकारची कार्यप्रणाली अंमलात आणावी असेही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देशित केले. 0000

 पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ संपन्न

कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिक प्रवासात न्याय, सचोटी आणि समानता या मूल्यांचे पालन करा – सागर जोंधळे अनिल ठाणेकर   ठाणे : कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिक प्रवास सुरू करताना विद्यार्थ्यांनी न्याय, सचोटी आणि समानता या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन पार्वताबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचे संस्थापक उपाध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी केले. डोंबिवली (पू.) येथील पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी सागर जोंधळे बोलत होते. या सोहळ्याला मान्यवर पाहुणे म्हणून एसएनडीटी विद्यापीठाचे एचओडी राजेश वानखेडे, अधिवक्ता मानकुवर देशमुख, पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई शिवाजीराव जोंधळे, संस्थापक सचिव देवेंद्र शिवाजीराव जोंधळे, संस्थेचे पदाधिकारी शिराज सागर जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालय हे एसएनडीटी विद्यापीठाचे हे पहिलेच एलएलएम कॉलेज आहे. महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं हे एक अनोखा पाऊल आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या भावी न्यायाधीश व भारताचे सर न्यायाधीश होऊ शकतात. पदवी वितरण समारंभाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची कबुली देण्यासाठी आणि त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये उत्कृष्टतेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाने काम केले. या कार्यक्रमाचा समारोप, अभिमान आणि आशावादाच्या भावनेने झाला कारण पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य पदव्या मिळाल्या. जे कायदेशीर व्यवसायात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या त्यांच्या तयारीचे प्रतीक आहे. पार्वताबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालय पदवीधर विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये यश आणि पूर्तीसाठी शुभेच्छा देतो, अशा सदिच्छा सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दिल्या. पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचा प्रतिष्ठित पदवी वितरण सोहळा पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला, त्यांची मेहनत, समर्पण आणि विद्वत्तापूर्ण कामगिरी ओळखून विश्वस्त पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या कायद्यातील मास्टर ऑफ लॉ- एलएलएम पदवीसाठी सन्मानित करण्यात आल्याने वातावरण अभिमानाने, आनंदाने आणि कर्तृत्वाच्या भावनेने भरले होते.पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचे शिराज सागर जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केले. ००००००

 मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी घेतला मोठ्याप्रमाणात लाभ

२ जुलैला होणार वाटप – आनंद परांजपे   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले शिबीरात १२५१ विविध दाखले नोंदविण्यात आले. या दाखले वाटप शिबीराचा विद्यार्थी, आजी- आजोबा व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. २ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात या दाखल्यांचे वाटप नागरिकांना केले जाईल, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २२ जून २०२४ व रविवारी, २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (पश्चिम) येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे १२५१ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा, विद्यार्थी, आजी- आजोबा व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. २ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात सर्वे नागरिकांना या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे ठाणे शहर (जिल्हा) कार्यकारिणी सदस्य, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवती पदाधिकारी, विद्यार्थी पदाधिकारी तसेच सर्व फ्रंटल / सेल / विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

 श्री माँ बालनिकेतन हायस्कूलचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा होणार सुवर्णमहोत्सव   ठाणे : दिव्य श्री तारा माँ यांनी श्री माँ ट्रस्टच्या माध्यमातून १९७५ साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्री माँ बालनिकेतन हायस्कूल आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार, २३ जून २०२४ रोजी शाळेच्या परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. आरोग्य शिबीरात सामान्य तपासणी, इ.सी.जी., नेत्र तपासणी, बी.एम. डी., हाडांचे आणि दातांचे विकार, उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या. शिबीरात तज्ञ डॉक्टर डॉ. सुंदर कृष्णन, डॉ. उदय गाडगीळ, डॉ. सुबोध मेहता, डॉ. न्याशा, डॉ. जय लालवाणी, डॉ. प्रांजली जोशी, डॉ. रितू छाबरा, डॉ. प्रतिमा शर्मा, डॉ. आनंद शर्मा, डॉ. उदय खोना, डॉ. आर.एन.सुद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. आरोग्य शिबिरात माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.

 नवीन इमारतींमध्ये ५० टक्के घरे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा – ॲड अनिल परब

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक परब यांनी विधानभवन सचिवालयाकडे अशासकीय विधेयक सादर केले   मुंबई : घरे नाकारल्यामुळे मराठी लोकांचे मुंबईतून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केले आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के आरक्षित ठेवली पाहिजेत त्यामुळे मुंबईतील मराठी लोकांची टक्केवारी आणखी कमी होणार नाही, असे परब म्हणाले. परब यांनी या विधेयकाद्वारे मुंबईतील नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के आरक्षणासह घरे उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. घरे आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहील. विकासकाने तसे न केल्यास विकासकाला सहा महिने तुरुंगवास किंवा १० लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केली आहे. या विधेयकामागील उद्देश स्पष्ट करताना परब म्हणाले की, खाण्याचे प्राधान्य किंवा धर्माच्या नावाखाली मराठी लोकांना घरे नाकारण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विकासकांकडून मराठी लोकांना जाणीवपूर्वक घरे नाकारली जात असल्याचे दिसून आले आहे. धर्म किंवा खाण्याचे प्राधान्य यावर आधारित कोणताही भेदभाव हा घटनाबाह्य आहे, असे परब म्हणाले. परब यांनी पुढे विलेपार्ले येथील एका बांधकाम व्यावसायिकाने मराठी लोकांना मांसाहार करत असल्यामुळे घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भ दिला. विलेपार्ले येथील मराठी लोकांनी बिल्डरच्या विरोधात निदर्शने केली. परंतु, सरकारने या समस्येची दखल घेतली नाही. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केल्यानंतरच विकासकाने माफी मागितली, असे परब पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुंबईतील मराठी लोकांचा टक्का दिवसेंदिवस कमी होत आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मात्र आता मराठी माणसांना मुंबईत घरे नाकारली जात आहेत. मराठी माणसांना भाड्याने घरे मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे राज्यात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांसाठी ५० टक्के घरे आरक्षित करण्यात यावीत. याबाबत तातडीने कायदा करण्याची गरज आहे, असे परब म्हणाले. राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मविआचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. 00000

शाळेच्या प्रवेशव्दारावरील झाड तोडल्याने कल्याणमधील सेंट थॉमस शाळेला नोटीस

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता कल्याण पूर्व विजयनगर भागातील सेंट थॉमस शाळेने शाळेेच्या प्रवेशव्दारावरील बदामाचे जुनाट झाड तोडले. या नियमबाह्य कृतीबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाने शाळा व्यवस्थापनाला कारवाईची नोटीस पाठवून सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी पालिका प्रशासनाचे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उपक्रम सुरू आहेत. शहर, परिसरात हरितपट्टे विकसित करण्यासाठी पालिका प्रशासना बरोबर, सामाजिक, पर्यावरण संवर्धन संस्थांनी पुढाकार घ्यावा म्हणून आयुक्त डाॅ. जाखड प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत कल्याणमधील एका शिक्षण संस्थेने पालिकेच्या परवानग्या न घेता झाड तोडल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत. सेंट थॉमस शाळेला शाळेच्या प्रवेशव्दारावर एक प्रवेशव्दार उभारायचे आहे. या कामासाठी शाळेच्या प्रवेशवद्रारावरील बदामाचे २५ वर्ष जुने २५ फूट उंचीचे बदामाचे झाड अडथळा येत होते. हा अडथळा हटविण्यासाठी हे झाड धोकादायक नसताना ते तोडल्याने नागरिक, पालक नाराज झाले होते. उन्हाळ्यात शाळेच्या प्रवेशव्दारावर सावलीसाठी हे झाड मोठा दिलासा होते, असे पालक सांगतात. याप्रकरणी या भागातील काही जागरूक नागरिकांनी हा विषय पालिका आयुक्त, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या निदर्शनास आणला. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सेंट थॉमस शाळा प्रशासनाला महाराष्ट्र क्षेत्र झाडांच जतन व संरक्षण अधिनियमान्वये नोटीस पाठवली. आणि सात दिवसात याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विहित वेळेत शाळेने खुलासा केला नाहीतर या कलामन्वये शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत दिला आहे. दोन दिवसापूर्वी ठाणे पालिका हद्दीतील देसई-तांबडीपाडा गावातील एका रहिवाशावर घरासमोरील कडुनिंबाचे झाड तोडले म्हणून पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारची कारवाई सेंट थॉमससह बेकायदा झाडे तोडणाऱ्यांंवर करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

मतदार यादी नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी राजकीय पक्षांनी केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावेत- अशोक शिनगारे

ठाणे : पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींचे अद्ययावतीकरण, नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच प्रारुप व अंतिम मतदार यादीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमावेत. तसेच मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येईल, हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 1.7.2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) जाहीर केला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. शिनगारे यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देऊन म्हणाले की, मतदारांपर्यंत मतदार यादीची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षाची मोठी मदत होणार आहे. निवडणूक प्रशासनाकडून केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आले आहेत. येत्या 25 जुलै 2024 रोजी एकत्रित प्रारुप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळी बीएलओंबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समन्वय साधून नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांचे नाव यादीत आहे का तपासणे, यादी नाव नसेल अथवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्यासाठी मतदारांकडून अर्ज भरून घेणे ही कामे करावीत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन मतदान केंद्रे उभारणे व सध्याच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरणासाठीही राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. मतदार यादींचे अद्ययावतीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदान यादीत नाव असेल तरच नागरिकांना मतदान करता येणार आहे. निवडणूक ओळखपत्र असेल आणि यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यामध्ये आपले नाव आहे की नाही याची सहनिशा करावी. नाव नसेल तर किंवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर तातडीने अर्ज करून नाव नोंदणी/दुरुस्ती करावी, यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही श्री. शिनगारे यांनी यावेळी केले. 00000

‘बायकांना पुढे करून जमिनी लाटल्या; धक्काबुक्कीसह शिवीगाळ करताना जिभाच घसरल्या’

माहेरवाशीण असलेल्या निता विचारेंनी मंत्रालय सचिवालयाची धमकी देवून सावंतांना मारहाणीसाठी केले प्रोत्साहित   राज भंडारी   रायगड : म्हसळा तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदेरी येथील विचारे कुटुंबियांच्या चुलतीच्या नावे असलेल्या जमिनीचे मूळ वारसदार असलेल्या रामचंद्र किसन विचारे व अन्य चार भाऊ असे वारस असून त्यांच्या मालकीच्या या जागेत रमेश व संदीप सावंत यांच्या वडिलांना ४०० स्क्वेअर फूट जागा घर बांधून राहण्यासाठी सन १९६२ साली तोंडी व्यवहाराने देण्यात आली होती. याबाबत आता रामचंद्र विचारे आणि बंधूंची कोणत्याही प्रकारची हरकत नव्हती. मात्र कालांतराने रमेश व संदीप सावंत यांचे वडील श्रीधर सावंत यांनी सदर घराभोवती पुढील बाजूस पडवी तसेच मागील बाजूस एक पडवी बांधून अतिक्रमण करून जागा लाटली. त्यानंतर त्यांची मुले यावरच न थांबता ग्रामपंचायतीने बांधकामास मज्जाव घातलेला असताना देखील त्यांनी आता तर घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवरही बेकायदेशीर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करून चक्क पाच फूट उंचीची संरक्षक भिंतच उभारली. त्यानंतर रामचंद्र किसन विचारे यांनी या प्रकाराला विरोध केला असता सावंत कुटुंबातील संदीप श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत आणि निता यशवंत विचारे यांनी ६८ वर्षीय रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करीत आपल्या जिभेवरील ताबा सोडत अर्वाच्च शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यातच माहेरवाशीण असलेल्या निता यशवंत विचारे यांनी तर कहर केला, स्नेहा सावंत यांना अंगावर धावून जाण्यासाठी प्रोत्साहन करताना त्यांनी जिभेवरील ताबा सोडत “मी मंत्रालयात सचिवालयात कामाला आहे, तुझे कोण काहीही करू शकणार नाही. मी सर्व बघून घेईन” असे बोलून खतपाणी घातले. अखेर विचारे बंधूंनी पोलीसात दाद मागितल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. तसेच सदर प्रकारावर येथील लोकप्रतिनिधी यांनी हस्तक्षेप करून रविवारी (दि.२३ जून) रोजी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक लावली. मात्र सदर बैठकीला सावंत कुटुंबीयांनी पुन्हा जैसे थे भूमिका घेत आपला गोंधळ घालण्यास सुरुवात करून सदरची बैठक धुडकारून लावली. यावेळी उपस्थितांनी त्यांना न्यायालयीन दणका देण्याची गरज असल्याचे सुचाविल्यामुळे रामचंद्र विचारे यांच्यासह पाचही बंधूंनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रामचंद्र किसन विचारे यांनी बोलताना सांगितले की, गेली अडीच वर्षे सदर प्रकार सुरू आहे. आम्ही सर्व भाऊ हे नोकरीनिमित्त मुबई परिसरात राहतो. अडीच वर्षांपूर्वी आम्ही आमच्या जागेत लावलेली झाडे तसेच इतर पूर्वजांच्या काळातील दोन आंब्याची झाडे व एक नारळाचे झाड रमेश आणि संदीप सावंत यांनी कोणाचीही परवानगी न घेता तोडले व ते चोरुन विक्री केले. याबाबत पोलीसात तक्रार दिली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास विरोध करताना आपले वारस दाखले दाखवा असे सांगितले. त्यानुसार सदर वारस दाखल्यांचे काम सुरू होते. साधारण दीड महिन्यापूर्वी आम्हाला वारस दाखले मिळाले. पुन्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे नव्याने आलेले सुर्वे या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपली तक्रार घेता येणार नाही असे उत्तर दिले. या प्रकारामुळे संदीप आणि रमेश सावंत यांची हिम्मत अधिकच फोफावली. त्यानंतर त्यांनी आमच्या मोकळ्या जागेवर त्यांचीच जागा असल्याचे भासविण्यासाठी गेल्यावर्षी एका बाजूला संरक्षक भिंत बांधली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये तशी तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम थांबविले आणि विना परवानगी आपण बांधकाम करू शकत नसल्याची त्यांना नोटीस दिली. मात्र मुजोरीचा कळस गाठलेल्या सावंत बंधूंनी मात्र प्रशासनाला केराची टोपली दाखवून दुसऱ्या बाजूला याच आठवड्यात दुसरी संरक्षक भिंत बांधून संपूर्ण जागा आपलीच असल्याचे भासवित बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच पाचही विचारे बंधू हे दिनांक ९ जून रोजी याठिकाणी आले. यातील मोठे बंधू रामचंद्र किसन विचारे यांनी त्यांना बांधकाम करताना अडविले असता रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत आणि माहेरवाशीण असलेली निता यशवंत विचारे हे याठिकाणी येवून ६८ वर्षीय वृद्ध असलेल्या रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करून परत अडवाल तर जिवंत राहणार नाही अशी धमकी देण्यास सुरुवात करू लागले. हे सर्व होत असताना याचा आवाज बाजूलाच असलेल्या विचारे बंधूंच्या कानावर गेल्यानंतर हे सर्व बाहेर आले. यावेळी माहेरवाशीण असलेली निता विचारे ही स्नेहा संदीप सावंत हिला पुढे करून “तू मार त्याला, मी मंत्रालय सचिवालयात कामाला आहे, तुझे कोणीही काहीही करू शकणार नाही. मी बघते सर्व” असे बोलून मारहाणीसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे सर्व बंधूंनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे सर्व चित्रफीत पोलिसांना दाखविल्यानंतर देखील पोलिसांनी सदर बाब ही सिव्हील मॅटर असल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. सरळ आणि साधेपणाने वागणाऱ्या विचारे कुटुंबाला न्याय तरी कोण देणार अशी स्थिती उद्भवली आहे. सावंत कुटुंबाच्या पाठीमागे कोणाचे हात दडले आहेत ? ते का प्रशासनाला जुमानत नाहीत ? पोलिसांचे देखील ते का ऐकत नाहीत ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील अशीच एक चॅप्टर केस २०२२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये संदीप श्रीधर सावंत, रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत, निता यशवंत विचारे आणि प्रसाद महादेव विचारे यांचा समावेश होता. त्या चॅप्टर केसनुसार एक वर्षे सावंत कुटुंब शांत राहिले आणि चॅप्टर केसची मुदत संपताच त्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. दिनांक ९ जून रोजी घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी तक्रार घेतली नसल्यामुळे रामचंद्र किसन सावंत यांनी गोरेगाव पोलिसांसह संदेरी ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग, गृहमंत्रालयाच्या सचिवांना तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना एक पत्र तयार करून पाहिली प्रत गोरेगाव पोलिसांना शनिवार दिनांक २२ जून रोजी दिली. यावेळी सदर तक्रार अर्ज पोलिसांनी वाचल्यानंतर तत्काळ त्यांनी संदीप सावंत, स्नेहा सावंत, ऋतुजा सावंत आणि निता विचारे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलाम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी विचारे कुटुंब आणि सावंत कुटुंबांची बैठक लावण्याचे प्रयत्न केले. रविवारी (२३ जून) रोजी सदरची बैठक देखील पार पडली. या बैठकीला काही राजकीय पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी देखील ग्रामस्थांसह उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीमध्ये चर्चा सुरळीतपणे सुरू झाली मात्र काही वेळाने रमेश सावंत आणि अनेक गुन्हे दाखल असलेला प्रसाद विचारे यांनी याठिकाणी येऊन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असलेल्या मध्यस्थांनी दिलेला पर्याय हा सावंत बंधूंनी धुडकावला. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे प्रसाद विचारे याचे काम हे बिघडविण्याचे काम असल्याचे ग्रामस्थांमधून नेहमीच बोलले जात असते त्याची प्रचिती देखील या बैठकीमध्ये ग्रामस्थांना अनुभवण्यास मिळाली. मुळातच सावंत कुटुंबाची ही जागा नसताना देखील कामानिमित्त आपण बाहेर राहत असल्यामुळे त्यातील अर्धी जागा देऊन मार्ग काढण्यासाठी विचारे कुटुंबांनी एक पाऊल मागे घेतले होते. मात्र जागा बळजबरी करून लाटण्याचा घाट घालणाऱ्या सावंत बंधूंना हे मान्य नसल्यामुळे अखेर विचारे बंधूंनी आपण न्यायालयीन लढाई लढून सत्याचा विजय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. 00000

ठामपा वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागातील बेजबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करा – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर   ठाणे : पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई कर अशी मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे स्वत:चे वृक्ष प्राधिकरण विभाग व उद्यान विभाग असून या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधीत अधिकारी बसलेले आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यामध्ये पावसाच्या पहिल्याच तडाख्याने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी अपघात झाले असून, काही ठिकाणी मोटार गाड्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रीडापट्टूना अपघात झाल्याची बातमी मला मीरा-भाइर्दर मधील एका कार्यक्रमादरम्यान रात्री १० वाजता कळली. बातमी कळल्यानंतर मी तातडीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावरून बेथनी हॉस्पिटलकडे येत असताना माझ्या समोरच ८ ते ९ मोठ-मोठी झाडे कोसळली. त्याचबरोबर शहराच्या इतरही भागामध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याचे समजले. त्या दिवशीच्या घटनेवरून असे लक्षात आले की, ह्या सर्व झाडांच्या फाद्यांची छाटणी पावसाळ्यापुर्वी योग्य प्रकारे न झाल्याने त्या फाद्यांचे वजन व सोसाट्याच्या वार्यामुळे ही सर्व झाडे उन्मळून पडल्याचे दिसून येते. माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिकेबरोबरच मीरा-भाइर्दर महानगरपालिकेचा भाग येत असून त्या ठिकाणी झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे झाल्यामुळे तेथे झाडे पडल्याच्या तुरळक घटना दिसून येतात. परंतू, ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना या घटनाना सामोरे जावे लागत आहे. झालेल्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही भयंकर घटना घडलेली नाही. तरी पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशो मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 000000