Month: June 2024

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता. छायादेवी शिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला आहे. सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व प्रकल्प संचलक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सन २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याकरिता रोहन घुगे यांच्या संकल्पेतून विविध प्रयोग राबविले गेले. यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास साधला. याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकीत ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाला आहे. कुपोषण मुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित व अति तीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचे काम वर्धा जिल्ह्यात केले आहे.‌ वर्धा जिल्हा राज्यात पहिला पीएम विश्वकर्मा राबविण्यात रोहन घुगे यांनी विषेश प्रयत्न केले आहेत. कुपोषण, शिक्षण, कृषि, पशु, आरोग्य अशा विविध विषयावर अभ्यासपुर्वक कामकाज त्यांनी केले असून विविध नाविन्यपुर्ण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी मोलाचे कामकाज वर्धा जिल्ह्यात केले आहे. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांच्या प्रगति पथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील रिक्त पदे, शाळा भेटी, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिली.ग्रामीण भागात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन नियोजन संदर्भातील माहिती घेण्यात आली. ग्रामस्थांच्या कल्याणासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहाणी करण्याचे नियोजन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्नशील राहायला हवे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदी यावेळी उपस्थित होते. 0000

संजय केळकर यांनी काढली कोकणपट्टी पिंजून !

पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासाठी ठाणे, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन करुन केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात श्री. केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते. 0000

राज्य सरकारी कंत्राटदारांची उपासमार

२७ जूनला अधीक्षक अभियंत्यांच्या दारात करणार ठिय्या आंदोलन   ठाणे : राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र, त्यांची देयके देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागिय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या मागण्या मान्य केल्यास येत्या गुरूवारी, २७ जून रोजी, अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आवळे यांनी दिला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारणसारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी शासन, मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाही. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी ५ मागण्याचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठक ही घेतली होते, परंतु शासन काहीही करीत नाही, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने ही निदर्शने केली. दरम्यान,  राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन   कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांची वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी;  राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्यात येऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने दिले असून या मागण्यांची आठवडाभरात पूर्तता न केल्यास अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ००००

प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अनिल ठाणेकर   ठाणे :पांढऱ्या रेशनकार्डधारकांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेअंतर्गत  ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री या नात्याने राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळीत असून गोर-गरीब जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आरोग्य सेवेचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलेल्या पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना दिला जात आहे. त्यामुळे पांढर्‍या रेशनकार्डधारक या सुविधेपासून वंचित राहत होते. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून ज्या पध्दतीने पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना जी आरोग्य सुविधा मिळते त्याचप्रमाणे पांढर्‍या रेशनकार्डधारकांना मिळावी, अशी  मागणी जनतेतून होऊ लागली आहे. पांढरे रेशनकार्डधारक असलेले अनेक नागरिक या राज्यामध्ये असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यावर मोफत वैद्यकिय उपचार होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर पांढर्‍या रेशनकार्डधारकांची शिधापत्रिका आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न करून महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा दिल्यास याचा फायदा राज्यातील गोर-गरीब समाजाला होईल व त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. मुख्यमंत्री या नात्याने नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वाचे धाडसी निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा हाही धाडसी निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ०००००

५ जुलैपासून जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम-  भरत बास्टेवाड

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे.…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रिपाइं रायगड जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत

अशोक गायकवाड   रायगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून रिपाइं जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी मंत्रीपदी वर्णी लागल्याने ना. रामदास आठवले हे मंगळवारी, दि १८ जून २०२४ रोजी पुणे दौऱ्यावर जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, कोकण युवा सरचिटणीस जिवक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, मावळ लोकसभा उपाध्यक्ष पंकज सोनावणे, खालापूर तालुका युवा अध्यक्ष सुनिल सोनावणे, खोपोली शहर अध्यक्ष नितिन वाघमारे, राहुल महाडिक युवा नेते, रुपेश रूपवते खोपोली युवा शहर अध्यक्ष, अशोक गोतारणे , उमरोली पंचायत समिती वार्ड अध्यक्ष निलेश गायकवाड आदींनी आठवले यांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ, पुष्पमालेव्दारे शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले. 00000

सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांची स्वच्छता मोहीम

डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अशोक गायकवाड   नवी मुंबई : महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग असतो. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम आज तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर.१० सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांनी यशस्वी केली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त्‍ आयुकत्‍ सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली से.१० सानपाडा येथील वृक्षांच्या हरित पट्टयात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन त्यामध्ये १५ गोणी प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा करण्यात आला. या मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त्‍ डॉ. अजय गडदे, तुर्भे विभाग अधिकारी तथा सहा आयुकत्‍ भरत धांडे आवर्जुन सहभागी झाले होते. वेस्टर्न कॉलेजचे एनएसएस विदयार्थी यांच्यासह डि-मार्ट मधील कर्मचारी व कामगार यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झालेल्या या मोहिमेच्या आयोजनात स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक व सफाई मित्र आणि पर्यवेक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना पर्यावरणाविषयी जागरूकता तसेच प्लास्टिक प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. ००००

मुरबाड मध्ये समाधानकारक पावसामुळे शेतकरी आनंदात

राजीव चंदने   मुरबाड : मान्सून  दाखल झाला नसला तरी, मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावत उघडीप दिल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणी सफल झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे, दरवर्षी जुनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून ने मुरबाड तालुक्यात हजेरी लावण्यात उशीर केला असला तरी अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे, हे वातावरण भातशेती साठी आणि पेरणी साठी योग्य ठरले आहे, मागील वर्षी पेरणी केल्या नंतर पावसाने भरमसाठ बॅटिंग केली होती त्यावेळी पेरलेलं बियाणे तरंगले, रुजलेले पाण्यात कुजले, काही बियाणे वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना “रुजा ” (घरातच भात बियाण्यास मोड आणून तो शेतात पेरणे ) करण्याची वेळ आली होती. मात्र यंदा असे झाले नाही त्यामुळे तालुक्यातील बहुतेक ठिकाणी भातरोपे किमान वित भर वाढले आहेत. त्यात यावर्षी भात बियाणेची किंमतही वाढली आहे. खतांची किंमतही वाढली आहे.असे असताना पावसाने एक प्रकारे यावर्षी उपकारच केले आहेत अशी भावना शेतकरी व्यक्त करत असून त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावर्षी चांगला पाऊस आहे. पावसाने चांगली उघडीप दिली भातरोपे चांगली झाली आहेत शेतकरी शेतीपयोगी वस्तू बी, बियाणे, औजारे यांच्या किमती वाढीव झाल्या आहेत,….रमेश हिंदुराव, शेतकरी न्हावे सासणे 0000

युवा बुध्दिबळपटू एलेश त्रिपाठीचे शानदार यश

मुंबई : नुकत्याच राजस्थान मधील उदयपुर शहरात झालेल्या फिडे रेटिंग लेकसिटी ओपन बुध्दिबळ स्पर्धेत विरारच्या मटिक अकादमी शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या एलेश त्रिपाठी याने शानदार कामगिरी करताना खुल्या गटात आठवा क्रमांक मिळवला. त्याने अपराजित राहताना ९ पैकी ७.५ गुण मिळविले. त्याने ६ लढती जिंकल्या .तर ३ सामने बरोबरीत सोडवले.रेटिंग श्रेणीत त्याचा दुसरा क्रमांक लागला.त्याला ६१ हजार रुपये रोख आणि  आर्कषक चषक भेट देण्यात आला. भारतातील ५५ ० पेक्षा जास्त बुध्दिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रसाद घाटे एलेशचे प्रशिक्षक आहेत. तसेच अर्पित पांडे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन एलेशला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ तो बुध्दिबळ खेळत आहे.तामिळनाडू येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. उदयपुर स्पर्धेतील एलेशच्या सुरेख कामगिरी बदल शाळेच्या मुख्याधापीका सीमा बहल यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.

आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांची स्वच्छता मोहीम*

अशोक गायकवाड*   नवी मुंबई : महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग…