Month: June 2024

‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा

एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन   मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लावलेल्या…

केवळ एक रुपयात शेतकऱ्यांनी भात, नाचणी पिकांचा विमा उतरावा- अंकुश माने

ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा काढण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै, 2024 आहे, अशी माहिती कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे. खरीप हंगाम २०२४ करीता पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही श्री. माने यांनी कळविले आहे. ठराविक पिकांकरिता अधिसूचित असणाऱ्या महसूल मंडळामधील शेतकरी त्या पिकाचा विमा उतरवू शकतील. ठाणे, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस.जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 51760/-, रत्नागिरी जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 50000/-., ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा नाचणी पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 20000/-., पालघर जिल्हा उडीद पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 25000/- ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामी अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तींचा अधिन राहून निश्चित केली जाईल. खरीप हंगाम 2024 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै, 2024 अशी आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, सहकारी पतसंस्था, पीक विमा अँप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीक विमा अर्ज दाखल करता येईल. शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. माने यांचे मार्फत करण्यात येत आहे. 0000

कोकण पदवीधर मतदार कर्मचाऱ्यांसाठी 26 जून रोजी नैमित्तिक रजा – अशोक शिनगारे

ठाणे :  विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 26 जून 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मर्यादीत स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. 000000

 स्वच्छतेसाठी अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका !

ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य पद्धतीने करण्यासाठी ५० टोगो व्हॅन – प्रताप सरनाईक   अनिल ठाणेकर   ठाणे : ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वीच शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे. ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय. कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदार संघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येतेय. या टोगो व्हॅन मध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा केला जातो. त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून, आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्येक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत. भविष्यात ओवळा माजिवडा मतदारसंघासाठी ५० व्हॅन देणार आहेत. जेणेकरून कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लॅण्डस्केप केलेले आहेत, तिथे खताचा पर्यावरणसुलभ वापर करता येईल. तसंच मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता. त्यामधून ह्या दोन टोगो व्हॅन घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून, राज्यात असा प्रकल्प पहिल्यादांच होतो आहे, अशी माहीती आ. प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००

ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४ हजार ७०३ गणवेश होणार तयार

ठाणे : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावाणी सुरू झाली आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळाले आहे. जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेले गणवेश दिसणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण सुमारे 1,04,703 गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 1201 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करावयाच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळाले असून यातून बचत गटाच्या महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण 104703 गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 15 जून 2024 रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड व अंबरनाथ या 6 तालुक्यामधील एकूण 6 केंद्र शाळेतील 1201 विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोच करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली. यावेळी गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच माविम जिल्हा प्रतिनिधी व सीएमआरसीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांना मिळावे यासाठी शासन स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच मुख्यालय स्तरावरून या उपक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या होऊन विहित वेळेत शिवणकाम पूर्ण होण्यासाठी प्रकल्प संचालक कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत, महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे मेहनत घेतली. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात या प्रकल्पाची अंलबजवणी होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत गणवेश पुरवठा व्हावा यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, गौरी दोंदे, वित्त व लेखा अधिकारी राखी मिराशी व व्हॅल्यु चेन सल्लागार महेश कोकरे यांनी जिल्ह्यांना मार्गदर्शन केले. गणवेश शिलाईचे कामकाज वेळेत पूर्ण करून शाळेत पोहच करण्यासाठी सर्व सीएमआरसीतील गारमेंट युनिट मोठ्या जोमाने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सीएमआरसी मार्फत कुशल महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिलांची निवड करणे, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माविमचे विभागीय सल्लागार मंगेश सूर्यवंशी, माविमच्या ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती अस्मिता मोहिते यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून हे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. 0000

पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजाराहून अधिक अर्ज

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांच्या एकूण ८०५ जागांकरिता राज्यभरातून ४६ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले असून याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिला उमेदवारांचे सुमारे नऊ हजार अर्ज आहेत. राज्यात २०२२-२०२३ या वर्षासाठीची भरती प्रक्रिया यंदाच्या वर्षी होणार असून या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचण्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण या पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक अशा एकूण ८०५ जागांवर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील ११९ आणि ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांचा समावेश आहे. ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांपैकी ६६६ जागा या पोलीस शिपाई पदासाठी असतील. तर २० जागा वाहनचालक पदासाठी असणार आहेत. तसेच ग्रामीण पोलीस दलात ११९ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ७३, वाहन चालक पदासाठी ३८ आणि पोलीस वादक या पदासाठी आठ जागा आहेत. ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या एकूण ८०५ जागांसाठी ४६ हजार ६२४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ठाणे शहर पोलीस दलात सर्वाधिक म्हणजेच, ३९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे आठ हजार ४२ अर्ज आहेत. तर ग्रामीण पोलीस दलात ७ हजार १९ जणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण १ हजार १५ इतके आहे. ठाणे शहर पोलीस दलाची मैदानी चाचणीची प्रक्रिया ठाण्यातील साकेत मैदानात होणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणीची प्रक्रिया मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मैदानामध्ये पार पडेल. मैदानी चाचणी दरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तैनात असतील. ठाण्यातील साकेत मैदान आणि परिसरात १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस कर्मचारी आणि ७० मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पावसाळ्यात ही भरती प्रक्रिया होणार असल्याने उमेदवारांसाठी मैदानात मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच एखादा उमेदवार त्याचे छायाचित्र आणण्यास विसरल्यास त्याच्यासाठी छायाचित्रकार आणि प्रत काढण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे. – संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस. कोट मुंब्रा येथे भरती प्रक्रियेसाठी आदल्या दिवशी अनेक उमेदवार येतील. त्यांच्या सुविधेसाठी मैदानात मंडप उभारण्यात आला आहे. त्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी ३५० अधिकारी कर्मचारी तैनात असतील. – डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण. ०००००

 ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार

ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त   ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या महत्व वाढले आहे. या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदार संघाच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामध्ये कोकण पदवीधर मतदार संघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजीत पानसे तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैय्या, उबाठाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून याठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहाव्यास मिळणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यात, ठाणे जिल्ह्यातील ९८ हजार ९३, रायगड जिल्ह्यातील ५४ हजार ९३१, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १८ हजार ५५१, पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३३३ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ६८६ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय महत्व वाढलेल्या या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मतदारांची आकडेवारी कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री १२ हजार ९८७, पुरुष १५ हजार ९३० तर, तृतियपंथी ८, ठाणे जिल्हा स्त्री ४२ हजार ४७८, पुरुष ५६ हजार ३७१ तर, तृतियपंथी ११, रायगड जिल्हा स्त्री २३ हजार ३५६, पुरुष ३० हजार ८४३ तर तृतियपंथी ९, रत्नागिरी जिल्हा स्त्री ९ हजार २२८, पुरुष १३ हजार ४५३ तर, तृतियपंथी ०, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री ७ हजार ४९८, पुरुष ११ हजार ५३ तर, तृतियपंथी ०, असे एकूण २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाचे रमेश कीर, भाजपचे निरंजन डावखरे, भीमसेना विश्वजित तुळशीराम खंडारे, अपक्ष अमोल अनंत पवार, अरुण भिकण भोई, अक्षय महेश म्हात्रे, गोकुळ रामजी पाटील, जयपाल परशूराम पाटील, नागेश किसनराव निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद सिताराम पाटील, ॲड. शैलेश अशोक वाघमारे, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, असे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 00000

कल्याण-डोंबिवलीत साथरोग नियंत्रणासाठी फवारणी मोहीम

कल्याण : पावसाळा सुरू झाल्याने विविध प्रकारचे साथरोग या काळात डोके वर काढतात. या साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने शहराच्या विविध भागात विशेष जंतुनाशक, धूर फवारणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी या विशेष फवारणी मोहिमेचे नियोजन केले आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकातून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी डोंबिवली विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी शरद पांढरे, के. पी. जगताप उपस्थित होते. या विशेष मोहिमेत १२२ सफाई कामगार, १२२ पितळी फवारणी पंप, ३० धुराच्या मशीन, तीन धुराच्या जीप्स, ११ ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. सकाळ, संध्याकाळ ही फवारणी केली जाणार आहे. हातगाड्या सुरू साथरोगाच्या नियंत्रणासाठी आयुक्तांनी विशेष फवारणी मोहीम सुरू केली असली तरी ज्या उघड्यावरील हातगाड्यांवरील खाद्य पदार्थांमुळे हे साथरोग पसरतात. त्या गाड्या ग प्रभाग सोडून नऊ प्रभागांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. संध्याकाळी चार वाजल्यापासून खाऊ गल्ल्या ग्राहकांनी भरून जातात. सर्वाधिक हातगाड्या डोंबिवलीत ह प्रभाग, ई प्रभाग, ड, अ प्रभागात लावल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. 000

करंजाडेवासियांचे पाणी प्रश्नासाठी आंदोलन

पनवेल : लाखो रुपये किमतीची घरे खरेदी केली मात्र पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने वर्षभरात करंजाडेवासियांना दीड कोटी रुपयांचे टँकरचे पाणी खरेदी करुन प्यावे लागले. अशी संतापजनक परिस्थिती करंजाडेची असल्याने करंजाडेवासियांना दुसऱ्यांदा मोर्चाचे हत्यार उपसावे लागले. मंगळवार आणि पाऊस असल्याने कामावर सुट्टी टाकून अनेक नागरिक या मोर्चात छत्री व पाण्याची बाटली घेऊन सहभागी झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक व महिलांचा समावेश होता. करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्नासाठी उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर केला होता. अखेर चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणूका असल्याने आ. बालदी यांनी सिडको भवनात करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मागील आठवड्यात सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मदारांच्या बैठकीपूर्वीच नागरिकांच्या संघटनेने मंगळवारचा दिवस मोर्चासाठी जाहीर केल्यामुळे मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता मोर्चा वसाहतीमधील सेक्टर ६ येथील बस थांब्यापासून सुरू झाला. या मोर्चेकरींना जेएनपीटी महामार्ग रोखायचा होता. मात्र पोलिसांनी विरोध केल्यामुळे आणि सिडको अधिकाऱ्यांनी वसाहतीमध्येच आंदोलन ठिकाणी येऊन आश्वासन देण्याचे ठरल्याने मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या चौकी शेजारीच मोर्चा थांबवला. सिडको मंडळाचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रणिक मुळ यांनी मोर्चेकऱ्यांना जीर्ण जलवाहिनी यापुढे बंद ठेऊन नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा कार्यान्वित केल्याची माहिती दिली. तसेच २० दश लक्ष लिटर पाण्याची गरज असलेल्या वसाहतीला यापुढे सूरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले. करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशन या सोसायट्यांच्या संघटनेने पाठिंबा दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी सांगितले.

 सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने ‘मार्ड’चा आंदोलनाचा इशारा

निवासी डॉक्टर आक्रमक   मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली असून याप्रकरणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास शस्त्रक्रिया विभागातील कक्षात कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. मागील वर्षभरात महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांवर सात ते आठ वेळा हल्ले झाले आहेत. अशा हल्ल्यामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण होतोच, पण रुग्णसेवेमध्येही व्यत्यय येतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्यावर अद्यापपर्यंत काहीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. परिणामी, वारंवार डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी. निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्ण सेवा करत असतात. त्यामुळे त्यांना अशा हल्ल्यापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे, अशी माहिती ‘केंद्रीय मार्ड’चे अध्यक्ष अभिजित हेलगे यांनी दिली. दरम्यान, सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांवर आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशाराही ‘मार्ड’ने सरकारला दिला आहे. 000000