Month: June 2024

‘तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू’

डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता   डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील सुमा्रे ४५ रासायनिक कंपन्यांना शासनाने बंद करण्याच्या दिलेल्या नोटिसा आणि त्यात एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या कंपनी स्फोटांंच्या मालिका, या सगळ्या प्रकाराने सरळमार्गी काम करणाऱ्या उद्योजकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. कंपनी चालक असलेल्या आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला होत असलेला हा त्रास पाहून त्यांच्यासोबत काम करणारी त्यांची मुले म्हणजेच, युवा उद्योजकांनी उव्दिग्न होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंंद करू, असा सल्ला वडिलांना दिला आहे. डोंबिवली एमआयडीसीत मागील साठ वर्षांपासून उद्योजक व्यवसाय करत आहेत. आता कंपनी चालकांची तिसरी पीढी उद्योजक म्हणून पुढे येत आहे. अनेक कंंपनी चालकांची मुले, मुली परदेशातून उच्च शिक्षण घेऊन डोंबिवली एमआयडीसीतील आपल्या आजोबांनी सुरू करून वडिलांनी पुढे चालविलेला उद्योग अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या उच्चशिक्षित नव उद्योजकांनी आपल्या कंपनीतील जुन्या पारंपारिक ढाच्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानात्मक बदल केले आहेत. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया वाढली आहे, असे उद्योजक सांगतात. अनेक कंपन्यांमध्ये आता कंपनी सुरू करणारे आजोबा, वडील आणि मुलगा, मुलगी (नातू) असे चित्र दिसते. आपली कंपनी आता आपली मुले पुढे नेणार आहेत. म्हणून कंपनी संचालक मंडळात बहुतांशी कंंपनी चालकांनी आपली पत्नी, उच्चशिक्षित आपली मुले, मुली यांना संचालक, भागीदार म्हणून घेतले आहे. कंपनीतील उत्पादन प्रक्रिया अधिक पारदर्शक, सचोटीने करून वर्षातून दोन ते तीन वेळा कंपनीच्या प्रवेशव्दारावर येणारे शासकीय अधिकारी कंपनी तपासणी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही हेतूने येणार नाहीत, अशी व्यवस्था या नवतरुण उद्योजकांनी कंपनीत केली आहे. एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटानंतर या कंपनी मालकाला झालेली अटक. भागीदार वृद्ध आईला झालेला त्रास पाहून एमआयडीसीतील अनेक उद्योजकांच्या युवा उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असेल तर संबंधितांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. परंतु, एका कंपनीत स्फोट होतो. सरसकट सर्वच रासायनिक कंपन्यांंना कंपनी बंदच्या नोटिसा, स्थलांतरासाठी शासनाकडून आग्रह धरला जात असेल. कंपनीतील स्फोटानंतर पोलीस गुन्हा दाखल होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनी बंद करून दुसरे काही सुरु करू, असा सल्ला युवा उद्योजकांनी आपल्या वडिलांना देण्यास सुरुवात केली. एका उद्योजक तरुणीने तर उद्योग विस्ताराचे स्वप्न घेऊन मी या व्यवसायात आले आहे. विवाह, कुटुंब या गोष्टी न पाहताच मी जर तुरुंगात जाणार असेल तर आपणास कंपनी चालविण्यास अजिबात रस नाही, असे मत नाव छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. कंपनी स्फोटानंतर संंबंधित कंंपनीचे मालक असलेले कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होते, असा अनुभव अनेक उद्योजकांनी सांगितला. डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी बंद नोटिसा, स्फोटांच्या मालिका, त्यामुळे इतर उद्योजकांना होणारा त्रास पाहून नव उद्योजक आपल्या पारंपरिक उद्योगातून बाहेर पडण्याचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. 0000

पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सुसज्ज राहण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : यावर्षी अदयापपर्यंत पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसात मोठया प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन सतर्कता राखावी असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले. विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी नाले व गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजूनही काही झोपडया शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पहाणी करावी व अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले. पाऊस लांबल्यामुळे सद्यस्थितीत नमुंमपा क्षेत्रात आठवडयातील तीन दिवस संध्याकाळच्या वेळेत पाणी पुरवठा देता येत नाही यामागील भूमिका नागरिकांनी समजून घेतली आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणात आणखी 39 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा याच्या आपण प्रतिक्षेत आहोत. त्यानुसार पाणी पुरवठयाचे नियोजन केले जात आहे. त्याची माहिती वेळोवेळी नागरिकांना देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. यावर्षी पूर्वापार पध्दतीने नाल्यांमधील प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नालेसफाई करण्यात आली असून आगामी काळात नाल्यांची गाळ काढून सखोल सफाई करणेबाबत नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच धारण तलावांच्या सफाईबाबतही आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पावसाळी कालावधीत उद्भवणारे आजार लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच साथरोगांवरील आवश्यक औषधांची उपलब्धता करुन ठेवणेबाबत आरोग्य विभागास निर्देशित करण्यात आले. पावसाळा लांबल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होईल अशी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रभावीपणे  प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच आपत्कालीन निवा-याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने व इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करणेबाबत तसेच सिडकोकडे यासाठी जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. घाटकोपर, मुंबई येथील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत तत्परतेने अनधिकृत होर्डिंग निष्कासीत करण्याची कार्यवाही केली असून नोंदीत 53 पैकी 47 अनधिकृत होर्डिंग हटविलेले आहेत. उर्वरित 4 एमआयडीसी अखत्यारितील होर्डिंगही त्यांचेमार्फत त्वरित हटविण्यासाठी अधिक पाठपुरावा करण्यात यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. परवाना विभाग तसेच नगररचना विभाग यांच्यामार्फत दिल्या जाणा-या परवानग्या, परवाने, प्रमाणपत्रे याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. त्याचप्रमाणे जन्मदाखले संबधितांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सक्षम करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. या सर्व बाबींवर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देशित करण्यात आले. 15 जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून साधारणत: 6 हजार नवीन विद्यार्थी नमुंमपा शाळांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्याचप्रमाणे शाळांमधील डिजीटल बोर्ड सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदाने अशा सेवांचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त्‍ श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्याकडून शासन, लोकन्यायालय आदी स्तरावरील पत्रव्यवहाराचा आढावा घेण्यात आला. पावसाळी कालावधीत सर्व घटकांनी क्षेत्रीय स्तरावर सतर्क रहावे व मदतकार्यासाठी सुसज्ज असावे असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.

‘नौपाड्यात शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाईचा आग्रह’

भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाचे पोलिसांना निवेदन   ठाणे : नौपाडा येथील शाळा- हाविद्यालयांच्या परिसरात थाटलेल्या पानटपऱ्या व सिगारेट विक्रीची दुकाने बंद करण्याची आग्रही मागणी भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाकडून…

 ‘आव्हाडांनी वायकरांना शुभेच्छा द्याव्या’

प्रताप सरनाईक यांचा सल्ला   ठाणे : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या, असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ‘जो जिता वो सिकंदर’ आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचेही ते म्हणाले.  विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. दोन वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले आहेत.  राज्यात लोकसभेला केवळ १५ जागा लढल्या आणि ७ जागा निवडून आणल्या. त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक स्त्राईक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरला आहे. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्याने काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करुन दाखविले आहे. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले आहेत. त्यामुळे बाकी कोण काय बोलत त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचे असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या विषयी त्यांनी छेडले असता,  या विषयावर आम्ही बोलणार नाही. आम्ही या विषयावर बोलणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. सरनाईक यांना मंत्रीपद मिळणार का? असा सवाल त्यांना केला असता, सरनाईक यांचे नाव नेहमीच मंत्रीपदासाठी येत आहे. मात्र मुख्यमंत्री हा एक ठाणेकर याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वेळी विधानसभेचा एक सदस्य म्हणून आपले नाव मंत्रीपदासाठी चालते यावरच मी समाधानी असल्याचे ते म्हणाले.  त्यातही मंत्रीपद जर माझ्या नशिबात असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ००००

शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

ठाणे : पावसाळा लागून १५ दिवस झाले. मात्र जिल्ह्यात आजूपर्यंतही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही तब्ब्ल ४८ खासगी टॅंकरवद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीव घेणी पाणी टंचाई आजही सुरू आहे. अर्धा जून संपत असतानाही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ माेठ्या गांवांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टॅंकर पाणी पुरवठा करीत आहेत. शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर मुरबाड तालुक्यातील १७ माेठे गांवे आणि १८ पाड्यांसाठी सहा टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मुरबाडमधीाल ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टॅकरने एक लाख एक हजार ७०७ लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात आला होता. 00000

ठाणे पालिकेची २६७ कोटींची विक्रमी कर वसुली

ठाणे :  पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाई सेवा उपलब्ध करून दिली होती, तसेच सवलती अन् वेळेत ग्राहकांच्या प्राप्त झालेल्या देयकांमुळे १ एप्रिल ते १५ जून या तीन महिन्यांच्या कालावधीत २६७ कोटींची विक्रमी वसुली झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली, तर मागील वर्षी याच कालावधीत २५३ कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १३ लाख १४ हजार रुपये अधिक वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेने करदात्यांना मालमत्ता कर भरण्याची योजना १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविली होती. त्यानुसार करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीतील मालमत्ता कराची रक्कम दुसऱ्या सहामाहीच्या करासह एकत्रितपणे जमा केली, तर दुसऱ्या सहामाहीतील करदात्यांना सामान्य करात १० टक्के सवलत दिली होती. या कालावधीतील रक्कम १६ ते ३० जून या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी करदात्यांना सामान्य कर रकमेवर ४ टक्के सवलत जाहीर केली होती. आयुक्त सौरभ राव म्हणाले की, या सवलतीला करदात्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सामान्य करातील १० टक्के सूट आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. कर वसुलीच्या उपाययोजना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक/करदात्यांना मालमत्ता संबंधित ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये करदात्यांना त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातून मालमत्ता कराशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या मालमत्तेवर किती कर थकीत आहे. किती दंड असेल, तर किती मालमत्ता कर भरावा लागेल, याची उत्तरे महापालिकेच्या वेबसाइटवरून नागरिकांना घरबसल्या मिळतील, अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात येऊन कोणालाही भेटण्याची गरज भासू नये, यासाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. विभाग समिती कार्यालयातील संकलन केंद्र महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे म्हणाले की, मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व विभाग समिती कार्यालयांत संकलन केंद्रे सुरू केली आहेत. मालमत्ताधारक सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केंद्रावर येऊन मालमत्ता कर भरू शकतात. याशिवाय ऑनलाईन कर भरण्याची सुविधाही सुरू आहे. करदात्यांना त्यांच्या देयकाची संगणकीकृत प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे किंवा प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रातून मिळू शकते, तसेच या लिंकद्वारे, करदाते इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲपद्वारे त्यांचा मालमत्ता कर ऑनलाइन जमा करू शकतात.

मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश मुंबई : पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कामांसाठी ज्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे, त्यांना कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिला जाणार आहे. पावसाळ्यामुळे काँक्रिटीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत. सध्या कार्यादेश देऊनही मागील वर्षी शहर भागातील कामे रखडली होती. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा यापूर्वीच मागवल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कंत्राट दिले नव्हते. आता मात्र लोकसभा निवडणूक संपल्यामुळे कंत्राट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कंत्राटदारांशी चर्चा करून अंतिम कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सगळी कामे पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहेत. पुन्हा आचारसंहिता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता रस्त्यांच्या कामात अडथळा ठरेल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. १) शहर विभाग ९७ किमी २) पूर्व उपनगर ७० किमी ३) पश्चिम उपनगर २५३ किमी रस्त्यांची कामे १) २०२२-२३ सालासाठीचा खर्च शहर – १३६२ कोटी ३४ लाख ६ हजार २) पूर्व उपनगर-  ८६४ कोटी १७ लाख ६१ हजार ३) पश्चिम उपनगर – ३ हजार कोटी २०२५ सालापर्यंत सर्व रस्ते काँक्रीटचे मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार ६०७८ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 000000

कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट

पहिल्या ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास   मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८० हजारांहून अधिक वाहने धावली. वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान एका मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यानची मार्गिका खुली झाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आठ ते दहा मिनिटे लागत असल्याने मुंबईकर कोस्टल रोडला पसंती देत आहेत. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास १२ मिनिटांत करता येईल. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची (कोस्टल रोड) वरळी ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिण मार्गिका मार्चमध्ये खुली झाली, तर उत्तर मार्गिका ११ जूनपासून सुरू झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. दक्षिण वाहिनीवरून पहिल्याच दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १५ हजार ८३६ वाहनांनी प्रवास केला होता, तर उत्तर वाहिनीवरून पहिल्या दिवशी २० हजार वाहने मार्गस्थ झाली. कोस्टल रोड (मरिन ड्राइव्ह ते वरळी-दक्षिण वाहिनी)- वाहनांची संख्या- १) मार्च २०२४- २,६३,६१० २) एप्रिल २०२४ – ४,३६,१५० ३) मे २०२४- ५,२८,५१९ ४)  ११ जून -२०,४५० मरिन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास जुलैनंतर कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ८९.६७ टक्के काम पूर्ण झाले असून, जुलैपर्यंत वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जुलैअखेर वांदे वरळी सी-लिकचा प्रवास करणे शक्य होणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांदे हा प्रवास फक्त १२ मिनिटांत करता येईल. 00000

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची चौवार्षिक निवडणूक २१ जुलैला होणार

अध्यक्ष अजितदादा पवार यांची वार्षिक सभेत घोषणा   मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची चौवार्षिक निवडणूक २१ जुलै २०२४ रोजी होणार. असे राज्य संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी वार्षिक सभेत जाहीर केले. राज्य कबड्डी संघटनेची वार्षिक सभा  १८जून २०२४ रोजी सकाळी दादर येथील कबड्डी महर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी सभागृहात होऊन विषय पत्रिकेवरी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी अजितदादा पवार होते. होणारी निवडणूक ही प्रचलित घटने प्रमाणे पण क्रीडा संहितेला आधारभूत ठेवून घेतली जाईल असे पवार म्हणाले.  निवृत्त न्यायधीश दिलीप जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीला या सभेने मंजुरी दिली. या निवडणुकी करीता संलग्न २५ जिल्हा संघटनेकडून प्रत्येकी चार(४) प्रतिनिधींची नावे (त्यात एक महिला प्रतिनिधींचे नाव असणे आवश्यक राहील) राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका परीपत्रकाद्वारे मागविली आहेत. शासनाच्या क्रीडा आचार संहितेचा सर्वांनी मान राखून त्याची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्राची क्रीडा परंपरा फार जुनी असून ती देखील जोपासली गेली पाहिजे असे ते पुढे म्हणाले. या सभेला पदाधिकारी, प्रतिनिधी, आजीव सदस्य, खेळाडू असे सर्व मिळून २०० सदस्य हजर होते. त्यात मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार अमरसिंह पंडित, शकुंतला खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती एका पत्रकाद्वारे संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली. 000000

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे – सुनिल तटकरे

अहमदनगर : आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगर जिल्हयातून केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तिथपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी या अहमदनगर जिल्ह्यातून झाली म्हणून या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना यापूर्वी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तसाच पुन्हा एकदा अजितदादाला पाठिंबा देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. याच आधारावर लोकसभा निवडणूक राज्यात लढली गेली शिवाय ही निवडणूक अक्षरशः ग्रामपातळीवर नेऊन ठेवली गेली. मात्र असे असताना नगर शहराचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना ३२ हजाराचे लीड देत या सगळ्यावर मात करून दाखवले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. पक्षाचा कार्यकर्ता हा धोरण समोर ठेऊन आणि नेता जे काम करतो ती भूमिका घेऊन काम करत असतो त्यावेळी नेत्याच्या त्या संवेदना घेऊन लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचायचे असते असेही सुनिल तटकरे म्हणाले. यापुढे सर्वांनी जबाबदारीचे भान लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच विरोधकांनी ज्यापद्धतीने गैरसमज पसरवले आहे ते कसे चुकीचे आहे हे लोकांना सांगायची गरज आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना सुनिल तटकरे यांनी केले. अजितदादांचे नेतृत्व व्यापकतेने पुढे न्यायचे असेल तर अजितदादांना ताकद देणे गरजेचे आहे. जनाधार वाढवण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे असा विश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले. भाजपकडे जाऊन सत्तेत सहभागी होणार होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. यापुढे सर्व घटकांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही हे आपण सांगत आहोतच परंतु लोकसभा निवडणुकीत जे जे घटक बाजूला गेले आहेत त्या घटकांना सोबत आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. योग्य भूमिका घेऊन लोकांसमोर गेलो तर पक्षाचे व्यापक हित जोपासणारे आणि जो आपल्यासाठी दिवसरात्र काम करतोय त्याला जनमानसात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. निवडणूक विकासावर लढली गेली नाही मात्र यावेळी लोकसभेत आलेले अपयश विसरुन किंवा झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यशाची पायरी नक्की मिळवू असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. या आढावा बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप यांनी आपले विचार मांडले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, फ्रंटल सेल व प्रमुख तसेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी अहमदनगर दक्षिण ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहूरी  यामधील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार संग्राम जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 000000