Month: June 2024

 कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका

सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी   कल्याण: कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना चांगली मते मिळाली. त्याचा विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका केल्या आहेत. या नेमणुका निष्ठावंत, ज्येष्ठांना डावलून करण्यात आल्याचा आरोप करत सामान्य, निष्ठावंत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही. शिवसेनातील बंडानंतर कल्याण परिसरातील अनेक जुने निष्ठावान, ज्येष्ठ शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांना साथ दिली. अशा शिवसैनिकांना नवीन नेमणुकांमध्ये पदस्थापना देऊन त्यांचा सन्मान करणे आवश्यक होते. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांनी तीन लाख ८१ हजार मते मिळविली. त्याचा विचार करून ठाकरे गटाने आता आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकींच्या तयारीचा भाग म्हणून येथील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. कल्याण पश्चिम, मुरबाड विभागासाठी ॲड. अल्पेश भोईर यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोईर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीला कोणाचा विरोध नाही, पण त्यांना टप्प्याने पदोन्न्तीने पद देणे आवश्यक होते, असे सामान्य शिवसैनिकांचे मत आहे. कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंंबरनाथ शहरासाठी जिल्हाप्रमुख म्हणून धनंजय बोडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना हे पद दिल्याचे सांगण्यात येते. नगरसेवक, विभागप्रमुख, दोनदा विधानसभा उमेदवारी, उपशाखाप्रमुख पदे धनंजय बोडारे यांनी भुषविली आहेत. आता जिल्हाप्रमुख पदही त्यांंना देण्यात आले आहे. अनेक पदे एकाच व्यक्तिला किती वेळ देणार. इतरही अनेक ज्येष्ठ कृतीशील शिवसैनिक पक्षात आहेत. त्यांचाही विचार होण्याची गरज आहे, अश मागणी सामान्य शिवसैनिक करत आहेत. दरेकर यांचे मताधिक्य वाढविंण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पदरात नव्याने नेमणुका टाकण्यात आल्याची चर्चा सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. ठाकरे गटाचे नेते मात्र हा आक्षेप खोडून काढतात. डोंबिवलीत अभिजीत सावंत या ज्येष्ठ शिवसैनिकाला शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी सामान्य, ज्येष्ठ शिवसैनिक कुरबुर करत आहेत. संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या नेमणुका करण्यात आल्या. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे सामान्य शिवसैनिक हाच शिवसेनेचा कणा आहे, असे सांगायचे आणि निष्ठावंत, सामान्य ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून नियुक्त्या करायच्या, यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण, मुरबाड, डोंबिवली परिसरातील नेमणुकांमध्ये लक्ष घालण्याची मागणी सामान्य शिवसैनिकांकडून केली जात आहे. अधिक माहितीसाठी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कोट पक्षाकडून करण्यात आलेल्या नव्या नेमणुकांमध्ये कोणतीही नाराजी नाही. याऊलट पक्षाने युवा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याने शिवसैनिक आनंदात आहेत. सदानंद थरवळ (जिल्हाप्रमुख, कल्याण जिल्हा)

श्री गणेश आखाड्याचे उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर संपन्न

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर आयोजित २१ दिवसांच्या उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचा  सांगता समारंभ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शिबिरात ४० पेक्षा जास्त युवा कुस्तीपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये काही मुलींचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे कर्नाटक, म्हैसूर येथील काही कुस्तीपटूंनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक  विवेक नयकल, महेंद्र जाधव, वैभव माने, कोमल देसाई, वस्ताद रूपचंद माने यांनी कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले. शिबिरातील सर्व कुस्तीपटूंना प्रमाणपत्र, चषक, ट्रेक सुट देऊन गौरविण्यात आले. यंदाचे शिबिराचे दुसरे वर्ष होते. शिबिरातील कुस्तीपटूंची २१ दिवस नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय सुभाष घाटवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. शिबिराच्या समारोप सोहळ्याला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नझरुद्दीन नायकवडी, व्यापारी हुकमीचंद जोशी, डॉ. जितकुमार यादव, उद्योजक श्री. यादव, पै. राजाराम पाटील, प्रकाश वाठारकर, गणपती जाधव (मुंबई पोलीस), माणिक पाटील NSG कमांडो, सुधाकर गायकवाड, श्री साई ज्वेलर्सचे मालक आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी एशियन क्रीडा, आरोग्य , नर्सरी प्रकल्प शिंदे स्पोर्ट्स , टिळक रोड , पुणे  यांच्यावतीने वस्ताद वसंतराव पाटील यांना  “महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२४” मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल सर यांनी केले.

कर्जत तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

पोलीस निरीक्षक कारवाई करतील का?   कर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र स्थानिक पोलीस निरीक्षक याबाबत कोणतीच भूमिका घेताना दिसून येत माहित. खरंतर अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी यामध्ये काही आर्थिक हितसंबंध ठेऊन आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ नुसार राज्यात विनापरवाना खेळल्या जाणाऱ्या जुगारास प्रतिबंध करणे हा मुख्य उद्देश ठेऊन राज्यात जुगार,मटका यावर कारवाई होत आहेत. मात्र कर्जत तालुक्यात अशा प्रकारच्या कारवाई होताना दिसून येत नाहीत.   सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, गांजा, अमली पदार्थ, अवैध दारू यांची विक्री होताना दिसून येत आहे.  तरुणाई याच्या आहारी जात आहे. मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असून याला अभय कुणाचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मोठमोठ्या इंटरनॅशनल महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे सुद्धा येथील स्थानिकांच्या निदर्शनास येत आहे.  सामान्य शेतकरयांना त्रास देणारे अधिकारी अशा ठिकाणी आपली सदसदविवेक गहाण टाकतात का असा प्रश्न सुद्धा जाणकारांना पडला आहे. अलीकडे फेब्रुवारी महिन्यात कर्जत शहरातील नाना मास्तर नगर येथील एका फॉर्म वर जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला. शहरामध्ये अनेक दिवस सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याबाबत कर्जत पोलीस स्टेशन मात्र अनभिज्ञ कसे हा प्रश्न देखील शिल्लकच राहिला. कर्जत पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आपली सदसदविवेक बुध्दी वापरून यावर कायदेशीर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 000000

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन   पनवेल : विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड सर,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), श्री.भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), श्री.सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युटिव्ह, एअर इंडिया मुंबई एअरपोर्ट), श्री.रुद्राश गोवारी(एअर इंडिया, गोवा एअरपोर्ट) श्री वसीम सर (फिनिक्स एअरपोर्ट ट्रेनिंग अकॅडमी) यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने जॉब कोणत्या एअरलाइन्स मध्ये आहेत, इंटरव्यू साठी जाताना कसा ड्रेस कोड पहिजे, आपले डॉक्युमेंट कशाप्रकारे असावेत, नक्की कामाचं स्वरूप काय आहे, ड्युटीची वेळ किती तास आणि कुठल्या शिफ्ट असतात,  तुमच्या आत्मविश्वासावर, बोलण्याच्या कलेवर आणि शिक्षणावर तुमचं सिलेक्शन होतं अशाप्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंग्रजीचे कोर्सेस केलात तरी सुद्धा पंधरा दिवसात बोलण्या आणि समजण्या इतपत इंग्रजी शिकू शकता असे मान्यवरांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ चालू झाल्यावर मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हेच आमचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचे- प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले. पनवेल – उरणच्या पासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई विमानतळाचे काम जोरदार सुरु आहे. आणि अशा ठिकाणी मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या ठिकाणी आपली माणसे, आपले स्थानिक लोकाना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत अशी रोखठोक भूमिका प्रितम म्हात्रे यांनी घेतली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार श्री बाळाराम पाटील, श्री काशिनाथ पाटील(मा.प..पं.स. सभापती), मा.श्री गोपाळ भगत,मा.नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज आणि सौ.सारिका भगत, श्री.देवा पाटील (जिल्हाध्यक्ष पु.यु.सं.रायगड), श्री बबन विश्वकर्मा हे उपस्थित होते. कोट भविष्यात आपल्या पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या स्वर्गीय दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे. या पुढील भविष्यात अशा प्रकारे विविध शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा माझा मानस आहे.- प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष , जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था. 00000

भिवंडी तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्गचे कार्य प्रगतीपथावर

भिवंडी : भारताचे ऊर्जा मंत्रालय देशाला ऊर्जेच्या बाबतीत सक्षम बनवण्यासाठी एक निश्चित ध्येय डोळ्यापुढे ठेवून कामास लागले आहे. ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विजेची मागणी आणि विद्यमान पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगर प्रदेशाला साडेचार हजार मेगा वॅट इतका विजेचा तुटवडा भासत आहे. यापैकी २००० मेगा वॅट अतिरिक्त वीज पुरविण्याची जबाबदारी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांना देण्यात आली आहे. काही महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण होणार असून सध्या भिवंडी तालुक्यात या प्रकल्पाचे कार्य जोमाने प्रगतीपथावर आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय प्रगती पोर्टलच्या माध्यमातून सदरच्या प्रकल्पपुरती करता लक्ष ठेवून आहे. प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय देखील प्रकल्प पूर्णत्वाकरिता युद्ध पातळीवर कार्य करत आहे. तूर्तास भिवंडी तालुक्यातील तीन गावांतून या प्रकल्पाची उच्च वीज वाहिनी जाते. खानिवली, तळवली तर्फे राहुर आणि कांदली तर्फे राहुर अशा तीन गावांतून जाणाऱ्या या वाहिनीची साधारणपणे लांबी ४.३ कि.मी. इतकी आहे. उच्च वीज वाहक तारा वाहून नेणारे टॉवर हे या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. भिवंडी तालुक्यातील तीन गावांच्या 19 टॉवर उभारण्यात येणार आहेत. यातील जवळपास सर्वच टॉवर उभारणीच्या पाया बांधणीचे कार्य पूर्ण झालेले असून.१४ टॉवर उभारून पूर्ण देखील झालेले आहेत. या प्रकल्पाकरित या तीन गावांतील ९०५ भूधारकांची जमीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरता वापरली जाणार आहे. राष्ट्रीयकृत प्रकल्पांकरता जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याचे बाबत २०२२ मधील सुधारित तरतुदींच्या अन्वये भूधारकांना जमीन वापरल्याचा परतावा दिला जाणार आहे. तूर्तास २७७ भूधारकांना परतावा देण्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित भूधारकांना परतावा देण्याचे काम सुरू आहे. एकत्रित मिळून तब्बल २४ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा परतावा भूधारक लाभार्थींना मिळणार असल्याचे समजते. गुजरात राज्यामधून येणारी ही वीज मुंबई महानगर प्रदेशात पोहोचविली जाणार आहे.पडघा ते खारघर या टप्प्यात ४०० के व्ही क्षमतेची उच्च वीज वाहक यंत्रणा उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. आगामी काळात विद्युत ऊर्जा हीच ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत राहणार आहे. घरगुती वापरण्याची उपकरणे ते थेट दुचाकी – चार चाकी वाहने हे सारे विजेवरती वापरले जात आहे. अर्थातच यामुळे विजेचा वापर वाढता राहणार आहे. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून मिळणारी अतिरिक्त ऊर्जा ही हरित ऊर्जा असल्याकारणाने ती उपभोक्त्यांच्या खिशावरील ताण हलका करणारी ऊर्जा असेल. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उच्चांक मोडणारे कमाल तापमान नोंदविले गेले. अशा परिस्थितीत वीज प्रवाह खंडित झाल्यास जीवाची लाही लाही होऊन उष्माघात रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा परिस्थितीत वाढता विजेचा वापर ही मनुष्य प्राण्याची अपरिहार्यता ठरते. या पार्श्वभूमीवर मुंबई ऊर्जा मार्ग लि यांचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे हे जनतेच्या हिताचे ठरेल चौकट: प्रकल्प पूर्णत्वाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी ज्या भूधारकांची जमीन वापरली जात आहे त्यांना मिळणारा परतावा हा समाधानकारक व न्याय्य असावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्याच्या घडीला २७७ भूधारकांना आम्ही परतावा दिलेला आहे. बाकी भूधारकांना परतावा देण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. – सुरजित नारायण प्रकल्प अधिकारी,मुंबई ऊर्जा मार्ग ली.

सिग्‍नल शाळा झाली हरित शाळा

ठाणे : शिक्षण हे सामाजिक बदलाचे साधन आहे हा विचार बाळगून आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍यानिमित्‍ताने सिग्‍नल शाळेने अभिनव उपक्रम राबविला असून शाळा परिसरात जवळपास तीन हजार रोपे लावून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे रूप दिले आहे. वृक्षरोपनासोबतच शाळेतील ओला कच-याचे खत व सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठीच्‍या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्‍यात आला. लायन्‍स क्‍लब ऑफ मांडवी इस्‍ट, ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या सहकार्याने हरित शाळा उपक्रम राबविण्‍यात आला आहे. तीन हात नाका परिसर हा ठाण्‍यातील सर्वांधिक वाहनांची वर्दळ असलेला परिसर आहे. वाहनांच्‍या धुराने व धुळीने होणारे प्रदुषण कमी व्‍हावे तसेच पुलाखाली असलेल्‍या शाळेतील मुलांना हवा प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्‍हणून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे स्‍वरूप देण्‍यात आले आहे. शाळा परिसरात मुंबई व ठाणे दिेशेला असलेल्‍या दोन्‍ही रस्‍त्‍यावर ‘व्‍हर्टीकल गार्डन’ची निर्मिती करण्‍यात आली आहे. या व्‍हर्टीकल गार्डनमध्‍ये जवळपास तीन हजार रोपांची लागवड करण्‍यात आली असून यामुळे वाहनांच्‍या आवाजाचा त्रास कमी होऊन हवा प्रदुषण देखील रोखले जाणार आहे. व्‍हर्टीकल गार्डन सोबतच शाळाच्‍या आवारात, वर्गखोल्‍याच्‍या बाहेर मोठया प्रमाणावर कुंडयाची आरास केली आहे. यामुळे प्राण वायुचा पुरवठा देखील वाढणार आहे. हरित शाळेतील रोपांची देखभाल करण्‍यासाठी विदयार्थ्‍यांचे प्रशिक्षण घेण्‍यात आले असून या माध्‍यमातून जीवशास्‍त्राचे प्रत्‍यक्ष ज्ञान मुलांना अनुभवता येणार आहे. रोप लागवड, बोन्‍साय निर्मिती, एका रोपापासून अनेक रोपे तयार करणे, कुंडीतील निगा व देखभाल याचे देखील प्रशिक्षण या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विदयार्थ्‍यांना दिले जाणार आहे. ‘माझी वसुंधरा व स्वच्छ भारत’ अभियानाचा भाग म्हणून ठाणे महानगरालिकेच्यावतीने संपूर्ण शहारात  हरित शहर व कचरा मुक्त शहरासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील शाळा हरित व कचरा मुक्त व्हाव्यात यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याला प्रतिसाद म्हणून ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेने हरित व कचरा मुक्त शाळेचा हा उपक्रम राबविला आहे. रोप लागवडी सोबतच रोपांना कायम उत्‍तम दर्जाचं खत पुरवठा व्‍हाव म्‍हणून शाळेत तयार होण्‍या-या ओल्‍या कच-यापासून खत निर्मिती करण्‍याचा उपक्रम सुरू करण्‍यात आली असून खत निर्मितीचे काम देखील विदयार्थ्‍यांच्‍या सहकार्याने केले जाणार आहे. ओल्‍या कच-यासोबत कच-याचे वर्गीकरण करणे, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्‍तू बनवणे, सुका कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या प्रकल्‍प पुनर्निमाण या सुका कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या प्रकल्‍पास पाठवून शाळा ‘शून्‍य कचरा’ करण्‍यात आली आहे. सिग्‍नल शाळेने रस्‍त्‍यावरील निर्वासित मुलांच्‍या शिक्षणाला हिरवा सिग्‍नल दिला. लायन्‍स क्‍लबने हा वसा पुढे नेत शाळा हरित करण्‍याचा उपक्रम राबविला याबद्दल क्‍लबच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा व निधीदात्‍या चंदा कारटेला यांचे लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा यांनी कौतुक केले. यावेळी समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले, लायन शांती सावला सह लायन्‍स क्‍लबचे सदस्‍य उपस्थित होते.  पाटील इंटरप्रायजेसचे संकेत पाटील व प्रवीण जाधव यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा, लायन्‍स क्‍लब मांडवी इस्‍टच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा, या उपक्रमासाठी ज्‍यांनी अर्थसहाय्य केले त्‍या लायन चंद्रा कारटेला, समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.

६७२ नागरिकांनी घेतला दाखल्यांचा लाभ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबीरात ६७२ नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे ६७२ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे,  मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसीन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बने, सुनिल पाटील, पल्लवी गिध, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज चेऊलकर, संदीप शिंदे, नासीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे 1000 हजार विद्यार्थ्यांना वह्यांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम   ठाणे : आई-बा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट मिळाली आहे. ज्युनियर…

कोकणातून मी शिवसेना संपवली- नारायण राणे

रत्नागिरी- कोकणातून महायुतीला तडीपार करा म्हणणाऱ्या शिवसेनेला मी कोकणातून संपवले असेअसे धक्कादायक विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे…