Month: June 2024

वर्षाऋतु मधील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती

माथेरान : वर्षाऋतुमध्ये मुंबई पासून अगदी जवळ असलेल्या माथेरान सारख्या सुंदर पर्यटनस्थळाची भ्रमंती  म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते.त्यामुळे पर्यटक आवर्जुन हजेरी लावत असतात.अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत केवळ वाहतुकीची खर्चिक बाब वगळता अगदीच स्वस्त दरात राहण्याची सोय लॉजिगच्या माध्यमातून त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये होत असते. वर्षाऋतु मध्ये इथल्या नैसर्गिकरित्या साकारणा-या अदभूत निसर्गाच्या चमत्काराची सप्टेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने अनुभुती पहावयास मिळते. बारा महिन्यांतील पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात इथे निसर्ग निर्मितीचा अलौकिक आंनद आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी आणि श्रावण तापीच्या कोवळ्या उन्हात पॉईंट्सची सैर करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. सप्टेंबर महिन्यात डोंगर रांगात सभोवताली आणि पॉईंट्स परिसरात सोनकीची पिवळी फुले आच्छादलेली असतात त्यामुळे भूमातेच्या गर्भातून सोन्याचा उदय झाला आहे की काय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. चोहोबाजूंनी गर्द झाडी आणि त्यातून पायी चालत जाण्याची मजा सुध्दा काही औरच असते. पावसाळी हवामानात गर्द धुक्यातून मार्गक्रमण करतांना अगदी समोरचं दृश्य देखील दृष्टीक्षेपात येत नाही.नैसर्गिक सौंदर्य धुक्यात हरवल्यामुळे ही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील विहंगमय  दृश्ये न्याहाळण्यासाठी पर्यटक विविध पॉईंट्स वर गर्दी करतात.पॉईंट वरील हे दाट धुक्याचे नैसर्गिक आवरण मनाला मोहीत करते.धुके विरळ झाल्यावर क्वचितच इंद्रधनूची कमान धुक्या आड दिसल्यावर मन प्रसन्न होते.शारलोट लेक वरील ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आतुर झालेले असतात. महत्त्वाचे जवळपास पंधरा पॉईंट्स असून इको पॉईंट, लुईझा पॉईंट, वन ट्री हिल, लिटिल चौक पॉईंट, सनसेट, रामबाग, हनिमून पॉईंट, मलंग पॉईंट असे काही महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्यावर खरोखरच मनाला आलेली ग्लानी दूर होते निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो याचे भान रहात नाही. पावसात भिजल्यावर कुठल्या स्टॉल वर गरमागरम भजी चहाचा आस्वाद घेत तर कुठं निखार्यावर भाजलेला गरमागरम मका खाण्याचा मोह सुध्दा आवरता येत नाही. कुणी घोड्यावर तर आबालवृद्ध हातरीक्षाच्या साहाय्याने पॉईंट्स वरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी जात आहेत. एकंदरीत पूर्वीचे आणि आताचे वर्तमानातील माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवतो.तीन दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले संपूर्ण व्यवहार बंद असायचे.हॉटेल्सआणि जुन्या बंगल्याना गवताच्या झडी लावून चार महिने या सर्व वास्तू बंदिस्त असायच्या परंतु इथे वर्षाऋतुमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढू लागल्याने आता हे सुंदर स्थळ बाराही महिने पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असते. पावसाळ्यात चार महिने माथेरानची मिनिट्रेन बंद असते त्यासाठी (दस्तुरी ) अमन लॉज स्टेशन पासून गावात येण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे इथे शनिवार आणि रविवार त्याचप्रमाणे अन्य सुट्टयांच्या हंगामात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. राहण्यासाठी लॉजिंग तसेच हॉटेल्स मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याने आगाऊ बुकिंग करण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. अत्यंत स्वस्त दरात या सोयी इथे उपलब्ध आहेत. नेरळ स्टेशन वरून इथे येण्यासाठी चोवीस तास टॅक्सी सेवा उपलब्ध असते माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर उतरल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून माथेरान स्टेशन पर्यंत येण्यासाठी माफक दरात शटल सेवा सुरळीत सुरू आहे.हौशी पर्यटक घोड्यावरून येतात तर नव्याने दाखल झालेल्या पर्यावरण पूरक ई रिक्षा सुध्दा रात्री दहा वाजेपर्यंत सेवेसाठी उपलब्ध असल्याने सर्वाना उत्तम प्रकारे सेवा आणि व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग ‘बकरी ईद’साठी सज्ज

ठाणे : बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यात यावा यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ठाणे जिल्ह्यात मुब्रा, भिवंडी, ठाणे, खोणी या ठिकाणी बकरी ईद निमित्ताने कुर्बानी देण्यात येते. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद मार्फत तात्पुरत्या कत्तलखान्याला परवानगी देण्यात आली आहे. प्रादेशिक सह आयुक्त मुबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्याप्रमाणे जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे.‌ पशुसंवर्धन विभागामार्फत बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कुर्बानीसाठी आलेल्या म्हैस वर्गाचे कत्तली पूर्व तपासणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी तसेच सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईद १७ जून ते १९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत असून या सणानिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या म्हैस वर्गीय पशुधनाची खरेदी करतात. या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर ईयर टॅगिंग करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची नियुक्ती तीन दिवसांसाठी करण्यात आली आहे. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठाणे डॉ. समीर तोडणकर, सहाय्यक आयुक्त बदलापूर डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक आयुक्त जि.प.स.चि.शेलार डॉ. अजित हिरवे, सहाय्यक आयुक्त ता.ल.प.स.चि कल्याण डॉ. दीपक कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 434 शाळा…

मुंबईच्या तलावांच्या क्षेत्रात पावसाची एन्ट्री

मुंबईकरांना दिलासा !   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची एन्ट्री झाली आहे. सरासरीने अधूनमधून पाऊस पडू लागला आहे. पावसाने तलावक्षेत्रात हजेरी लावल्याने मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसात सर्वात जास्त १३५ मिमी पाऊस तुळशी तलावात, त्यापाठोपाठ विहार तलावात १३४ मिमी, भातसा तलावात ८८ मिमी, मध्य वैतरणा तलावात ७३ मिमी, मोडक सागर – ६५ मिमी, तानसा – ६४ मिमी आणि अप्पर वैतरणा तलावात सर्वात कमी म्हणजे ४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सातही तलावात गेल्या ९ जूनपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.मुंबईत यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई शहरात दरवर्षी किमान २,२०० ते २,७०० मिमी इतका पाऊस पडतो. मात्र मुंबई महापालिकेकडे या पावसाचे पाणी साठवून ठेवण्याबाबत वेगळे असे नियोजन नाही. तसेच, सन २००६ पासून राज्यात मोठ्या जागेतील इमारतीच्या ठिकाणी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग ‘ योजना राबविण्याबाबत कायदा करण्यात आलेला असताना त्याची अंमलबजावणी करण्यात पालिकेला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच पावसाचे हे पाणी मुंबईतील तुळशी आणि विहार या दोन तलावात त्यांच्या क्षमते एवढेच जमा होते. तर पवई तलावात पावसाचे पाणी काही प्रमाणात साठवले जात असले तरी या तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे त्या पाण्याचा वापर आरे कॉलनी व जवळच्या काही कंपन्यामध्ये पिण्याच्या व्यतिरिक्त पाण्याची गरज भागविण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे मुंबईत पावसाळ्याच्या चार महिन्याच्या मोसमात पडणारे जवळजवळ २२,०० ते २,७०० मिमी इतक्या पावसाचे पाणी विनावापर समुद्रात वाया जात असते. मुंबईची दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतकी आणि ठाणे, भिवंडी महापालिकेची दररोज १५० दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तहान ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा हे प्रमुख ५ तलाव भागवत असतात. त्यामुळे हे ५ प्रमुख तलाव आणि मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव असे एकूण सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरलेले (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) असणे आवश्यक असते. दरम्यान सध्या सात तलावात बुधवारी सकाळी ६ पर्यंत फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर (५.५४ टक्के) इतका म्हणजे पुढील २० दिवस १ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. सध्या सात तलावात फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर ००००

प्रशासनाच्या निष्क्रियतेची पर्यटकांना शिक्षा

माथेरान : कामाच्या अन दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दोन दिवस मनाला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून बहुतांश पर्यटक हे माथेरानला पसंती देतात. परंतु येथील सर्वच संबंधीत  प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेबाबाबत सुयोग्यपद्धतीने नियोजन नसल्याने दरवेळेस येथील घाटरस्त्यात आणि दस्तुरीच्या वाहनतळावर वाहनांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.त्यामुळे खाजगी वाहने पार्किंग अभावी घाटातून माघारी जात आहेत तर अनेकदा त्यांना आपल्या किमंती गाडया घाटातील रस्त्यावर पार्क करून दस्तुरी पर्यंत आपल्या लहान मुलांना आणि सामानाच्या बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत इथल्या निष्क्रिय प्रशासनाच्या चुकांची शिक्षा पर्यटकांना सोसावी लागत आहे. दस्तुरी पार्किंग ह्या वनखात्याच्या जागेत मोठया प्रमाणावर अतिक्रमणे झालेली असल्याने त्याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर पॅनोरमा पॉईंट्सच्या रस्त्यावर जवळपास पन्नास गाडया पार्क होऊ शकतात परंतु तेथे पोलीस प्रशासन हरकत घेत आहे असे बोलले जात आहे. दस्तुरी येथील एमपी हा प्लॉट अद्यापही नगरपरिषदेच्या ताब्यात आलेला नाही अन्यथा जवळपास दोनशे गाडयाची पार्किंगची सोय सहजपणे होऊ शकते त्याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यास प्रशासन का कमकुवत ठरत आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाटरस्ता फुल होऊन जातं आहे. येथील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील याबाबत सर्व कल्पना आहे परंतु शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यास कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माथेरान मधील काही महत्वाकांक्षी राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकवेळ या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सकारात्मक विचार केला तरच इथे पर्यटन क्रांती घडू शकते परंतु श्रेयवादाच्या लढाईत स्थानिकांना भरडले जात आहे.

हज कमिटीच्या गैर व्यवस्थापनामुळे सौदीत हज यात्रेकरूंचे हाल…

राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांचे, सीईओ लियाकत अफाकी यांच्यावर आरोप   ठाणे : भारतातुन सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे तेथे हाल सुरु आहेत. यात्रेकरूंना भोजन, प्रवासाची आणि निवासाचीही व्यवस्था नसुन याला हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच जबाबदार आहेत. असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी केला आहे. प्रत्येक यात्रेकरूकडुन साडेतीन लाख रुपये घेऊनसुद्धा काहीही सुविधा दिलेल्या नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही बबलु शेख यांनी म्हटले आहे. शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बबलु शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हालअपेष्टांचे व्हीडीओ माध्यमांसमोर दाखवले. बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख भाविक जात असतात. १५ ते १६ जून आणि नंतर दोन दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह इतर राज्यांतील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील २१ हजार भाविक यात्रेस गेले आहेत. मात्र, सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठलीच सुविधा नाही. वाहनाची, भोजनाची आणि निवासाचीही व्यवस्था नसल्याने हज यात्रेकरूचे हाल सुरु आहेत. २१ हजार लोकांसाठी केवळ ९० जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवले आहे. हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाच्या सौदी अरेबिया येथुन पाठवलेल्या चित्रफिती दाखवुन राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यात्रेकरूंनी तसेच हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतर फोनही उचलत नाहीत. लियाकत अफाकी यांनी सर्व कारभार आपल्याच हाती ठेवला असुन लाखो रुपये उकळुनही सुविधा न दिल्याने हा एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप बबलु शेख यांनी केला आहे. तेव्हा,केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी बबलु शेख यांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १ कोटी रूपयांचा गांजा जप्त

अशोक गायकवाड रायगड : आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजे, नवी मुंबई येथे पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकून कारवाई केली.आरोपींच्या ताब्यातून एकुण १ कोटी १३ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४०, तळोजे, नवी मुंबई येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठासाठा वाहतुक होणार आहे अशी कार्यालयास माहिती मिळाली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या भरारी पथक क्रमांक २, पनवेल यांनी मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकला. यावेळी एक महिन्द्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० गाडीमध्ये दोन आरोपी आरिफ जाकीर शेख वय २५ वर्षे रा. रूम नं. १२, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई व परवेझ बाबुअली शेख वय २९ वर्षे रा. रूम नं. १३, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८ कोकनी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये ४१४ किलो अं. १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. या गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून ही कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, . निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.

झोमॅटोची डिलिव्हरी आता दिव्यांग ही करु शकतील

स्नेहज्योतने मिळवून दिल्या निओमोशनच्या आधुनिक दुचाकी !   मुंबई : हल्ली घरोघरी झोमॅटो मार्फत डिलिव्हरी व्यवसाय जोरात सुरु असून आता या व्यवसायात दिव्यांग व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहेत. बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगर मध्ये कार्यालय असलेल्या  स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग पुनर्वसन कार्यासाठी समर्पित आहे. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या हिंमतीवर अर्थार्जन करून सक्षमपणे आपले आयुष्य व्यतीत करण्यासाठी दिव्यांगांना विविध कौशल्यामध्ये पारंगत करण्यापासून ते त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टींमध्ये भरभक्कम पाठिंबा उभ्या करण्यापर्यंत सर्व आवश्यक गोष्टी स्नेहज्योत तर्फे करण्यात येतात. चेन्नई स्थित निओमोशन या कंपनीने दिव्यांग व्यक्तींसाठी स्पेशली डिझाईन केलेल्या इलेक्ट्रिकल व्हेईकल वरून झोमॅटो फूड डिलिव्हरी चा व्यवसाय दिव्यांग व्यक्तींनाही करता येऊ शकतो का, याचा प्रयोग वर्षभरापूर्वी स्नेहज्योत संस्थेने केला. ज्यामध्ये निओमोशन चे सीईओ सिद्धार्थ डागा व प्रतिनिधी निरंजन जाधव यांनी मोलाचा वाटा उचलला. या पहिल्या टप्प्यामध्ये हरिशंकर शर्मा, निजामुद्दीन आणि प्रवीण शिंदे या दिव्यांग सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व अडचणींवर मात करीत आपले मासिक उत्पन्न झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून जवळजवळ 25 हजार रुपये पर्यंत नेले. त्यांच्या या स्वयंपूर्ण होण्याच्या प्रवासातून प्रेरणा घेत स्नेहज्योतने मागील आठवड्यात तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना या झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरवले आहे. यामध्ये एक दिव्यांगना शुभांगी मोधले सुद्धा आहे. जवळजवळ  1,20,000 रुपये किंमत असलेल्या या गाडीसाठी एच टी पारीख फाउंडेशनने 1,10,000 रुपयांची मदत केली व उर्वरित दहा हजाराची मदत संस्थेचे शुभचिंतक, विदुला वैद्य, सुरेश मनोहर आणि सुजय अरगडे यांनी केली. हा संपूर्ण कार्यक्रम बोरिवली पूर्व येथील चोगले हायस्कूलमध्ये संपन्न झाला.  ज्यामध्ये चोगले हायस्कूलचे कार्यवाह श्री संजय डहाळे व त्यांचे पुतणे श्री. सुमेध सुनील डहाळे यांनी अनमोल सहकार्य केले. स्नेहज्योत संस्थेच्या पुढाकाराने तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना अर्थार्जन करून स्वयंपूर्ण होण्यासाठी एक नवीन क्षेत्र खुले झाले असल्याचे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या सचिव सुधाताई अनिलकुमार वाघ यांनी सांगितले. मुंबई व्यतिरिक्त राज्यात दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या व्यवसायात यापूर्वीच उतरल्याचेही सुधाताई वाघ यांनी आवर्जून नमूद केले.

मालमत्ता कराच्या सवलतीत ठाणे महापालिकेने जाहीर केली अंतिम मुदतवाढ

दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात १० टक्के सवलत   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते ३० जून २०२४ पर्यंत पहिल्या सहामाहीच्या करासोबत दुसऱ्या सहामाहीच्या कराची  रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य कराच्या रक्कमेत थेट १०% सवलत देण्यात येणार आहे. सामान्य करातील सवलत योजेनस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच, मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे. ज्या करदात्यांनी ०१ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पहिल्या सहामाहीच्या कराच्या रक्कमेसह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केला आहे त्यांना दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेतील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलतीला करदात्याचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर, सामान्य करातील १० टक्के सवलत ३० जून २०२४ पर्वत अंतिमतः वाढविण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

छताचे प्लास्टर कोसळून तीनजण जखमी

ठाणे : कोपरी येथील मीठबंदर भागात सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप मोहीते (४६), यश मोहीते (१६) आणि निधी मोहीते (१२) अशी जखमींची नावे आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. मीठबंदर येथे सुमारे ३५ वर्ष जुनी श्रमदान ही चार मजली शासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण २० सदनिका असून १० ते १२ सदनिकांमध्ये खांबांना तडे गेले आहे. तसेच प्लास्टरही निखळले आहे. त्यामुळे ही इमारत राहण्यासाठी धोकादायक झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इमारतीतील एका सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळले. या घटनेत प्रदीप, यश आणि निधी हे तिघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.