Month: June 2024

लता राजे, बने, बांदल, दळवी, तेंडुलकर मुंबई मराठी पत्रार संघाच्या पुरस्काराचे मानकरी

मुंबई :मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या युगारंभ पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांनी निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल,…

महायुतीत अस्वस्थता; राष्ट्रवादी एकाकी

स्वाती घोसाळकर मुंबई – लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवाचे आत्मचिंतन सुरु झाले आहे. महायुतीत प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपाचे २०१९ मधिल २३ वरून यंदा ९ खासदारांपर्यंत झालेल्या घसरणीची गंभीर दखल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने…

डाऊन झालोय, आउट नाही;

देवेंद्र फडणवीसांचा एल्गार मुंबई : महाराष्ट्रात आपण डाऊन झालोय, आऊट नाही… येणारी विधानसभेची निवडणूक नव्या जोमाने लढविणार आणि दणक्यात जिंकणार अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांविरोधात एल्गाल पुकारला. दादर येथील वसंत स्मृती…

डॉ. संतोष सावर्डेकर यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” प्रदान

चिपळूण : महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांचे वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख…

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरूज ढासळला

कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या प्रवेशव्दारावरील दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूज गुरूवारी रात्री ढासळला. रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला. कोणीतीही हानी यात झाली नाही. गुरुवारी पडलेल्या पावसाच्या माऱ्याने बुरूजाचा काही भाग खचून हा बुरूज ढासळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील डाव्या बाजुला हा बुरूज आहे. शुक्रवारी पहाटे नागरिक दुर्गाडी किल्ल्यावर येऊ लागले. त्यावेळी त्यांना बुरूजाचा दर्शनी भाग कोसळला असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ कल्याण, डोंबिवली शहरात वाऱ्यासारखी पसरली. दुर्गाडी किल्ला हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत येत असला तरी त्यावर नियंत्रण पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. पाच वर्षापूर्वी दुर्गाडी किल्ल्याचे दोन बुरूज ढासळले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बुरूजांची डागडुजी करून ते सुस्थितीत केले होते. बुरूजावरील नवीन कामाला भेगा पडल्या आहेत. आता या नादुरुस्त भागाची देखभाल केली नाहीतर पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती इतिहासप्रेमींंनी व्यक्त केली. दुर्गाडी किल्ला हा निव्वळ दगडावर उभा नसून या किल्ल्याचा काही भाग मातीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती खचू लागली की असे प्रकार होऊ शकतात, असे एका जाणकाराने सांगितले. दुर्गाडी किल्ल्याच्या दोन्ही बाजुने २४ तास जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचे दणके अप्रत्यक्षपणे किल्ल्याला बसत असतात. त्याचाही हा परिणाम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निधी पडून दुर्गाडी किल्ला सुस्थितीत आणि देखणा असावा म्हणून शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ला नुतनीकरण कामासाठी २५ कोटीचा निधी गेल्या वर्षी मंजूर केला आहे. या निधीतील साडे सात कोटीचा निधी शासनाने प्रत्यक्ष कामासाठी मंजूर केला आहे. परंतु, या निधीतून वर्ष उलटले तरी दुर्गाडी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले नाही, असे दुर्गप्रेमींनी सांंगितले. शिवाजी महाराजांनी पहिल्या आरामाराची स्थापना कल्याणमध्ये केल्याचे इतिहासकार सांगतात. या आरामाराच्या किनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हे ऐतिहासिक वैभव टिकून ठेवण्यासाठी शासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरण, संंवर्धनाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचीन बासरे यांनी केली. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ, सभोवताली बुरूज आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पातून दुर्गाडी किल्ल्याच्या बाजुला खाडी किनारी नौदल आरमार उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रेक्षणिय आणि प्रदर्शनीय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष ना. का. आहेर यांच्या कार्यकाळात दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. बुरूज सुस्थिती करण्यात आले होते. आता बराच काळ लोटला असल्याने दुर्गाडी किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची आहे ते अस्तित्व कायम ठेऊन नव्याने बांधणी होणे आवश्यक आहे. अन्यथा असे पडझडीचे प्रकार सुरूच राहतील. – श्रीनिवास साठे, कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक. 0000000

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी देण्यात आली असून उर्वरीत ७४ नवीन ई रिक्षा लवकरच सध्याचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर हातरीक्षा मालकांना मिळणार आहेत. ई रिक्षांना चार्जिंग करण्यासाठी एकूण तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यातील दस्तुरी नाक्यावर २,कम्युनिटी हॉल परिसरात ५ आणि नगरपरिषदेच्या आवारात ५ ई रिक्षांना चार्जिंग करण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत वीस ई रिक्षांना चार्जिंग साठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य ठिकाण असणाऱ्या कम्युनिटी हॉल परिसरात आणखीन चार्जिंग व्यवस्था करण्यात यावी यासाठी ई रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. यावेळी अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, चालक रुपेश गायकवाड, किशोर सोनावले, अक्षय वैद्य,सिताराम शिंदे, दीपक डोईफोडे, मारुती कदम, दिलीप कदम, शैलेश भोसले,विजय कदम आदी उपस्थित होते. रिक्षा संघटनेची आवश्यक सूचना लक्षात घेऊन आम्ही नगरपरिषदेच्या अभियंत्यांना याबाबतीत माहिती देऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. राहुल इंगळे — प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद ०००००

 करंजाडेतील पाणी प्रश्न लागणार मार्गी

सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश राज भंडारी पनवेल : सन २०१९ पासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्नाने ग्रासले होते. त्यातच करंजाडे ग्रामपंचायतीत दीड वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. सरपंच मंगेश शेलार हे मुळातच पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊनच निवडणुकीला सामोरे गेले होते. अखेर करंजाडेचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या आठवडाभरात करंजाडेकरांना उच्चदाबाने मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. गेली अनेक वर्षे सतावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा दिला असल्याची माहिती करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी गुरुवारी (दि.१३ जून) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह जेष्ठ नेते कर्णा शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. करंजाडेचा पाणी प्रश्न निकालात न निघाल्यास पावसाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर सिडकोचे एमडी श्री.सिंगल व पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांनी येत्या चार दिवसांत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नवीन जलवाहिनीतून करंजाडेचा पाणीपुरवठा सुरू करतो, जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी एमजेपीच्या अधिकार्‍यांनीसुद्धा नवीन लाईनवरून पाणीपुरवठा सुरु करण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच करंजाडे व पुनर्वसन नोडमधील रहिवाशांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मंगेश शेलार यांनी माहिती दिली. तसेच यावेळी नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करीत नागरिकांचे आभार मानले. 00000

म्हाडाच्या भूखंडावरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात

विलेपार्ले येथील फलक आज हटवणार मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात झाली. आतापर्यंत ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले असून विर्लेपार्ले येथील अनधिकृत जाहिरात फलकावर पहिला हातोडा पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने मुंबई मंडळाने फलक हटविण्याच्या कामाला काही वेळापूर्वी सुरुवात केली आहे. घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेनंतर म्हाडाने सर्व विभागीय मंडळांना आपल्या अखत्यारितील भूखंडावरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले होते. मुंबई मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले आहेत. हे सर्व फलक वांद्रे विभागात आहेत. म्हाडाच्या भूखंडावर जाहिरात फलक लावण्यासाठी संबंधित म्हाडा विभागीय मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र असेल तरच पालिकेला जाहिरात फलक लावण्यास परवानगी देता येते. असे असताना मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न घेता महापालिकेच्या परवानगीने म्हाडाच्या भूखंडावर ६० फलक लावण्यात आल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यानंतर मुंबई मंडळाने पालिकेला पत्र पाठवून तात्काळ हे जाहिरात फलक हटविण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार अखेर आता अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास सुरवात झाली. पालिकेच्या मदतीने अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत. पहिली कारवाई मौजे विलेपार्ले (ता. अंधेरी) येथील भूखंड क्रमांक ३६, विलेपार्ले शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्था येथील अनधिकृत जाहिरात फलकाविरोधात होणार आहे. काही वेळातच फलक हटविण्याच्या कारवाईस सुरुवात होणार आहे. उर्वरित फलक हटविण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. 00000

कल्याण-डोंबिवलीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे. मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्पादनावर भर द्यावा आणि भाविकांनी अशा मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पालिका हद्दीत गणेश मूर्तींचे उत्पादन, विक्री करण्यासाठी मूर्तिकार, कारागिर, विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जे मूर्तिकार, विक्रेते, कारागिर पालिकेकडे नोंदणी करणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विकण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० च्या सुधारित नवीन मार्गदर्शक कायद्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याचे काटेकोर पालन कल्याण डोंबिवली पालिकेकडून केले जाणार आहे. मूर्तिकार, उत्पादक, कारागिर, विक्रेते यांना मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू करणे, मूर्ती विक्रीसाठी मंच लावणे यासाठी परवानगी देण्यासाठी पालिका प्रभाग कार्यालयांमध्ये नियोजन केले जाणार आहे. जे अशाप्रकारची परवानगी घेणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कारवाई करतील, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले आहे. पालिका परवानगीची प्रत प्रत्येक मूर्तिकार, कलाकार, विक्रेत्यांनी कारखाना, दुकानाच्या दर्शनी भागात लावावी. पर्यावरणपूरक, शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून सहज पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांना भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. जे या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिला आहे. मूर्तिकार बैठक कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उत्पादनावर भर देण्यात यावा. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची असलेली बंदी, तसेच पीओपीच्या वापराचे दुष्परिणाम याविषयावर मूर्तिकार, कारखानदार, विक्रेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शुक्रवार, १४ जून रोजी,दुपारी चार वाजता अत्रे रंगमंदिरातील सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले आहे. 000000

 मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात

एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय  मतदारांची आतापर्यंतची एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी झाली  अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. मुंबई पदवीधर मतदार संघात  मुंबई शहर स्त्री 12 हजार 873 व पुरुष 17 हजार 969 तर तृतियपंथी 1, मुंबई उपनगर स्त्री 36 हजार 838 व पुरुष 52 हजार 987 तर तृतियपंथी 5 असे एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार आहेत.  मुंबई शिक्षक मुंबई शहर स्त्री 02 हजार 14 व पुरुष 511 तर तृतियपंथी 0, मुंबई उपनगर स्त्री 09 हजार 872 व पुरुष 03 हजार 442 तर तृतियपंथी 0 असे एकूण 15 हजार 839 मतदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री 12 हजार 987 व पुरुष 15 हजार 930 तर तृतियपंथी 8, ठाणे जिल्हा स्त्री 42 हजार 478 व पुरुष 56 हजार 371 तर तृतियपंथी 11, रायगड जिल्हा स्त्री 23 हजार 356 व पुरुष 30 हजार 843 तर तृतियपंथी 9, रत्नागिरी जिल्हा स्त्री 09 हजार 228 व पुरुष 13 हजार 453 तर तृतियपंथी 0, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री 07 हजार 498 व पुरुष 11 हजार 053 तर तृतियपंथी 0, असे एकूण 2 लाख 23 हजार 225 नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या आहेत. 00000