Month: June 2024

थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प – फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर देत शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटचकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प…

‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची टीका मुंबई  :- आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील…

महाराष्ट्रात घोषणांचा ‘अर्थ’पुर्ण पाऊस

० मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये ० मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत ० महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’ ० वारकरी बांधवांसाठी…

राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी नकोच

मुंबई, ता. २७ : राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी सुरू करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अशी भूमिका रिक्षा संघटनांनी घेतली आहे. परिवहनेतर संवर्गातील वाहनांची (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करण्यासाठी त्यांना एग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाला सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीच्या अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते. अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना समितीच्या अहवालात होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरी भागातही बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा झाला आहे; पण त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे.

 ठाणे महापालिकेत पोकळी वाढली

महापालिकेच्या सेवेतून ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढतांनाच दिसत आहे. मे महिन्यात ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा ६२ अधिकारी, कर्मचाºयांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका दिवसेंदिवस रिती होत असल्याचेच चित्र या निमित्ताने दिसत आहे. यात उपायुक्त, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्याध्यापिका, लिपीक, प्राथमिक शाळेचे शिक्षक आदींचा यात समावेश आहे. महापालिका शाळांमध्ये आधीच मुख्याध्यापकांची कमतरता आहे. शिक्षकांची देखील वानवा भासत आहे. त्यात सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही. ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता जून महिन्यात तब्बल ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. दर महिना कर्मचाऱ्यांची ही संख्या वाढतच जात आहे. त्यात आता शहर विकास विभागातील कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले आहेत. मागील महिन्यात देखील एक कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले होते. त्यात पुन्हा एकाची भर पडली आहे. समाज विकास विभागाचे उपायुक्त, वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधिक्षक, कार्यालयीन उपअधिक्षक, दोन मुख्याध्यापिका सिस्टर इनचार्ज, वरीष्ठ लिपिक, दोन लिपीक, वरीष्ठ लेखापरिक्षक, प्रस्ताविका, प्राथमिक शिक्षका ११, चालक यंत्रचालक, वाहन चालक, जमादार, आरक्षक, बालवाडी आया, माळी बिगारी, बिगारी, सफाई कामगार आदींचा त्यात समावेश आहे. मागील काही वर्षापासून महापालिका शाळांमध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची संख्या कमी आहे. महापालिकेने तासिका शिक्षक घेतले असले तरी देखील ते पूर्ण क्षमतेने हजर होत नसल्याने शिक्षकांची पोकळी दिसून येत आहे. त्यातही मुख्याध्यापकांची संख्या देखील आता घटत चालली आहे. दुसरीकडे शिक्षक नसल्याने मुख्याध्यापकांना देखील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही पोकळी केव्हा भरुन निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कातकरीवाडीत रस्त्यासाठी कपिल पाटील यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

मुरबाड : धसईनजीकच्या ओजिवले येथील कातकरीवाडीपर्यंत पोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे आज केली आहे. कातकरीवाडीतील महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून आणले जात असल्याच्या वृत्ताची तातडीने दखल घेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच या वाडीपर्यंत जिल्हा नियोजन विकास निधी किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली. मुरबाड तालुक्यातील ओजिवली येथील कातकरीवाडीमध्ये ५० हून अधिक नागरिक राहतात. मुख्य गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या या वाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बांबूला बांधलेल्या कपड्याच्या झोळीतून रुग्णालयात आणले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तातडीने दखल घेतली. जिल्हा नियोजन समिती वा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कातकरीवाडीमध्ये जाण्यासाठी डांबरी रस्त्याला मंजुरी द्यावी, या संदर्भात तातडीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा, अशी विनंती कपिल पाटील यांनी केली. 000000

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा व कौसा येथे मोफत दाखले वाटप शिबीर-आनंद परांजपे

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर (जि.) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ जून व रविवारी, ३० जून २०२४ रोजी, मुंब्रा व कौसा येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा खासकरुन विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केले आहे. विद्यार्थांना लागणारे, 1.अधिवास (डोमीसाईल) दाखला, 2.उत्पन्नाचा दाखला, 3. रहिवासी दाखला त्याप्रमाणे नागरिकांना लागणारा 4. ज्येष्ठ नागरिक दाखला, हे दाखले तत्परतेने काढून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची व राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर(जि) पक्षाची संपूर्ण टीम मुंब्रा व कौसा येथील दाखल्याची नोंद करणाऱ्या ठिकाणी दिवसभर उपस्थित असणार आहे. डाॅक्युमेंट्स व्हेरिफाय करुन, अपलोड करुन, रिसीट दिली जाईल आणि या ठिकाणी आपल्याला आपला दाखला मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तरी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर (जि.) यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २९ जून २०२४ रोजी, आफरीन हाॅल, जामा मशीदीच्या बाजुला, मुंब्रा रेल्वे स्थानकासमोर व रविवार, दिनांक ३० जून, २०२४ रोजी, मुबारक पॅलेस हाॅल, दुसरा मजला, वीरानी पेट्रोल पंपाजवळ, कौसा-मुंब्रा येथे, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, आयोजित करण्यात आलेल्या या ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चा, विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अपील विद्यार्थीवर्गाला व ज्येष्ठ नागरिकवर्गाला, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केले आहे. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत : 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा,  त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे.

गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी किलकारी योजना – डॉ. गंगाधर परगे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामीण भागात देखील ‘किलकारी’ या नवीन योजनेची अंलबजावणी करण्यात आली असून गर्भवती महिलेला गावातील आरोग्यसेविकाद्वारे Reproductive and Child Health (आर.सी.एच) पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशासेविकांसाठी मोबाईल अकादमी ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘किलकारी’ योजना केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे. गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन विषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक रेकॉर्डेड ऑडियो कॉल करण्यात येत आहे. ऑडियो कॉल चुकल्यास किंवा त्या आठवड्यातील ऑडियो कॉल पुन्हा ऐकायचा असल्यास नोंदणीकृत १४४२३ या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क करता येणार आहे. गरोदर महिलांचे स्वत: वापरत असलेल्या मोबाईल द्वारेच नोंदणी करण्यात यावी अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटिल यांनी दिली आहे. एप्रिल व मे महिन्यातील आकडेवारी नुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ४१८ व शहरी भागात २१ हजार ६२० गर्भवती महिलांची नोंद आहे. ठाणे जिल्ह्यातील १ हजार १२३ आशासेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर आशासेविकांसाठी नोंदणीकृत १४४२९ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किलकारी सेवा देण्यासाठी येणारा दूरध्वनी क्रमांक ०१२४-४४५१६६० आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्य विषयक नवीन अभियानाच्या

कृती आराखड्याची नवी मुंबई महानगरपालिका प्रभावी अंमलबजावणी करणार     नवी मुंबई : स्वच्छतेचा आणि आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत स्वच्छता अंगिकारुया, आजारपण पळवूया ही संकल्पना नजरेसमोर ठेवून ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळे उपक्रम राबविण्यास नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आधीपासूनच सुरुवात केली आहे. याबाबत करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करताना घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य विभाग यांच्यासोबत सर्वच विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या अभियानाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीमांचे आयोजन, कचरा संकलन आणि वाहतुकीचे नियोजन, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची नियमित स्वच्छता, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छताविषयक जागरूकता व त्यांच्या प्रत्यक्ष सहभागावर भर, शुध्द जलाच्या नियमित चाचण्या, स्वच्छ व शुध्द पाण्याचा पुरवठा आणि पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल, आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रामध्ये विशेष लक्ष आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता व  पावसाळी कालावधीत घ्यावयाच्या आरोग्य विषयक दक्षतेबाबत जनजागृती व माहिती प्रसार, पीपीटी अर्थात आरोग्य विषयक संरक्षण प्रतिबंध व उपचार अंमलबजावणी अशा प्रकारची कार्यवाही करण्यात येणारे आहे. विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी हे स्वच्छता अभियानाचे केंद्रीय अधिकारी असणार असून आपापल्या विभागातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे काम करण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या पालक अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागात स्वच्छता कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष दयावे अशाही सूचना देण्यात आल्या. यादृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दुर्लक्षित जागांची स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी व त्यामध्ये स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणावर सहभागी करुन घ्यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. स्वच्छतेबाबत जागरुकता वाढविण्यासोबतच विभागांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी व यामधून शहर स्वच्छतेचा स्तर उंचवावा यादृष्टीने विभाग कार्यालयांमध्ये आंतरविभागीय स्वच्छता स्पर्धा घेण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. या स्पर्धेत मार्केट्सची स्वच्छता, शाळा व महाविदयालयांतील स्वच्छता, बसस्टँड – हॉटेल्स – पेट्रोल पंप – वाणिज्य संकुले व आस्थापना अशा प्रकारची सार्वजनिक वर्दळीची ठिकाणांवरील स्वच्छता, सार्वजनिक उदयानांची स्वच्छता अशा निकषानुसार त्रयस्थ परीक्षणाव्दारे निवड करण्यात येईल असे ते म्हणाले. मार्केट्स प्लास्टिकमुक्त करणे हे आपले प्रमुख उद्दीष्ट असून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली तयार करावी व त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कापडी पिशव्या निर्मिती प्रक्रियेत नमुंमपा क्षेत्रातील महिला बचत गटांना सहभागी करुन घ्यावे असेही त्यांनी निर्देश दिले. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा यादृष्टीने त्यांची मनोभूमिका तयार करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली. यासोबतच किरकोळ बाजारात प्लास्टिक पिशव्या येऊच नयेत याकरिता कार्यप्रणाली राबविण्याच्या दृष्टीनेही ठोस पावले उचलावीत असे आयुक्तांनी सांगितले. सोसायटयांमधील कचरा वर्गीकरणावर भर दयावा. त्यादृष्टीने सोसायटयांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा व त्यांच्या घरापर्यंत पोहोचून जनजागृती करावी आणि स्वच्छतेविषयी त्यांचे अभिप्राय घ्यावेत व सूचना जाणून घ्याव्यात तसेच ही कार्यवाही अत्यंत व्यापक स्वरुपात राबवावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. आपल्या अधिकारी, कर्मचा-यांचा स्वच्छता कार्यात प्राधान्याने सहभाग असावा यादृष्टीने नमुंमपाचे अधिकारी, कर्मचारी ज्या सोसायटयांमध्ये राहतात त्या सोसायटयांमध्ये स्वच्छता विषयक बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी व त्याच्या अंमलबजावणीकडे संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांनी लक्ष दयावे असेही निर्देश देण्यात आले. प्रत्येक विभागात होणाऱ्या स्वच्छताविषयक उपक्रमांना सर्व प्रसार माध्यमांतून व महानगरपालिकेच्या समाज माध्यमांतून व्यापक प्रसिध्दी दयावी जेणेकरुन इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल असे निर्देशित करीत ज्या सोसायटयांमध्ये स्वच्छताविषयक चांगले काम होत आहे त्यांना प्रसिध्दी देऊन प्रोत्साहीत करावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच संबंधित विभागप्रमुख, विभागांचे पालक अधिकारी, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व स्वच्छता अधिकारी उपस्थित होते. आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सुरु असलेल्या स्वच्छता विषयक कामगिरीचा विभागनिहाय आढावा घेण्यासोबतच आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विभागांमध्ये अभिप्रेत असलेल्या स्वच्छतेच्या कार्यवाहीविषयी अपेक्षा सांगितल्या व त्याच्या पूर्ततेसाठी गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ००००००

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

माथेरान : माथेरान पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर, माथेरान या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित करून उपस्थित विद्यार्थी यांना सपोनी श्री.अनिल सोनोने यांनी मार्गदर्शन  केले. तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले अमली पदार्थ विषयी उत्सुकता व त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता हे प्रकार वाढत आहेत त्यातूनच अनेक गैरप्रकार वाढत आहेत,नुकतेच पुणे ह्या सुसंस्कृत शहरामध्ये अमली पदार्थांनमुळे वाढलेली अपघातांची व गुन्ह्याची संख्या पाहता शालेय विद्यार्थ्यांना अशा व्यासनाविषयी जागरूकता दाखवून त्यापासून परावृत्त करणे गरजेचे असल्याने हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन करण्यापासून  जनजागृती करण्यासाठी या वेळी आव्हाहन करतानाच अश्या समाज कंटकान पासून सावध राहण्याचे सांगण्यात आले. यावेळी सहा. फौजदार सी के पाटील, गोपनीय अंमलदार दामोदर खतेले हे उपस्थित होते. सदर वेळी साधारण 70 विद्यार्थी उपस्थित होते व त्यांनी अंमली पदार्थ विरोधात शपथ घेतली.