Month: June 2024

सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक

पनवेल-अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी पाचव्या आरोपीस हरियाणातील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या प्रकरणात २० हून अधिक आरोपी फरार आहेत. रविवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून सलमानच्या हत्येसाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेले फोनवरील व्हिडीओचे संभाषणाचा महत्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना या हत्येचा कट उधळता आला. दीपकला शनिवारी हरियाणातील भिवानी येथील तिग्रणा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. दीपक सलमानच्या हत्येच्या कटातील संशयीत आरोपींची राहण्याची तसेच गुन्हा करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व्यवस्था करणार होता. दीपक हा सातत्याने व्हिडीओ कॅालद्वारे कटातील संशयीत आरोपितांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दीपकच्या गुन्ह्यातील सहभागाविषयीची माहिती भिवानी (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षक वरूण सिंघला यांना कळविल्यानंतर भिवानी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाने दीपकला ताब्यात घेतले. भिवानी येथील न्यायालयासमोर दीपकला हजर केल्यावर न्यायालयाने ५ जूनपर्यंत दीपकला ट्रांझीट कोठडी रिमांड दिल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी दिली.

आज अवजड वाहनांसाठी अटल सागरी सेतू बंद

नवी मुंबई: लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अटल सेतू वाहतूक जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असली तरी त्यांना शिवडी येथे थांबता येणार नाही. वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत शिवडी वेअर हाऊस, हे बंदर रोड, शिवडी पुर्व मुंबई येथे ३१ दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ व ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा स्ट्रॉग रूम आहे. चार जून रोजी या ठिकाणी मत मोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अटल सेतू शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झिाट) येथे कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच माल वाहतूककरणारी वाहने यांना अटल सेतू दक्षिण वाहिनी येथून येण्यास मनाई करण्यात आली आहे. या  मार्गावर हलकी वाहने येण्यास परवानगी असेल. परंतु, त्यांना शिवडी एक्झीट येथे उतरण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना थेट कुलाबा एक्झीट व वडाळा एक्झीट येथून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यावेळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग मंगळवारी चार जून  रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दरम्यान बंद असणार आहे. नवी मुंबई एमटीएनएल दक्षिण वाहिनी ते शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवजड वाहनासाठी पर्यायी मार्ग नवी मुंबई वाशी खाडी पूल मार्गे तर हलकी वाहनासाठी पर्यायी मार्ग – कुलाबा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) व वडाळा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) असणार आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसुचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन बंब , रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड !

ठाणे : श्रमिक जनता संघ युनियनची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवारी २ जून २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे पार पडली.  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची युनियनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया, उपाध्यक्ष पदी डॉ संजय मंगला गोपाळ, खजिनदार म्हणून अविनाश नाईक, सह खजिनदार पदावर सुदर्शन साहू, सचिव पदावर सुनील कंद आणि संजय चौहान यांची पुढील काळासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समिती सदस्य म्हणून अर्चना पवार, अनिता कुमावत, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, बापू ओव्हाळ, सूरज वाल्मिकी, गौतम सहानी, पुजा पंडित, रोशन गायकर सुखेंदु मडैया, दुर्गेश खवसे राजकुमार दुबे, रामसुशील विश्वकर्मा, संतोष गुप्ता, बैजनाथ यादव, कृपाशंकर मिश्रा , चंद्रकांत चौधरी, विरेंद्र सावंत, नवीन मिश्रा आदी आणि कार्यालयीन सचिव म्हणून अजय भोसले यांची निवड करण्यात आली. कल्याण येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान मंगल कार्यालय येथे १ व २ जून रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आणि राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी भूषविले. महासचिव जगदीश खैरालिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ संजय मंगला गोपाळ यांनी सूत्रसंचालन केले. अधिवेशनात सरकारने चार लेबर कोड रद्द करून सर्व कामगार कायदे पुन्हा अंमलात आणावे, मैला सफाईचे काम यांत्रिक पद्धतीने करावे, मैन्युअल स्कैवेंजिंग प्रतिबंध कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, खाजगीकरण – कंत्राटीकरण पध्दत बंद करून कायम नोकरी द्यावी, समान कामाला समान वेतन अदा करा, कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळालेच पाहिजे, वर्षानुवर्षे मछली विक्री व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करून अनुज्ञप्ती पत्र/ लायसन्स द्यावे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, गीग कामगारांसाठी कामगार कायदे लागू करा, ग्लोबल वार्मिंग आणि वाढत्या उष्णते पासून कष्टकरी श्रमिकांना सुरक्षा सुविधा पुरविल्या जाव्या,  मध्यप्रदेश येथील सेंच्युरी, मराल आणि पीडीपीएल कारखान्यातील श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठींबा देत विविध ठराव ही मंजूर करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या २०१५ पासूनच्या किमान वेतनाचा फरकाची सुमारे सात कोटी रक्कम त्वरित अदा करा, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरूग्णालय, मध्य रेल मधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर युनियनच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्धार अधिवेशनात समारोप सत्रात करण्यात आला. शनिवारी १ जून रोजी कार्यशाळेत ज्येष्ठ अधिवक्ता रवींद्र नायर, सुधा भारद्वाज आणि एनएपीएमचे कार्यकर्ते श्री भार्गव यांनी युनियनचे प्रमुख कार्यकर्त्यांना विविध श्रमिक अधिनियम आणि श्रमिकांचे अधिकार या बाबतीत मार्गदर्शन केले होते. युनियनचे कार्यकारिणी सदस्य नविन मिश्रा यांनी प्रेरणादायी क्रांतीगीतं सादर करून सर्वांची मने जिंकली. वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके, अन्नसुरक्षा अभियानचे कार्यकर्ते विशाल जाधव आणि भारत जोडो अभियानच्या वरिष्ठ कार्यकर्त्या गुड्डी एस. एल., आणि घर बचाओ घरं बनाओ आंदोलनच्या संयोजिका पूनम कनौजिया यांनी समारोप सत्रात श्रमिक जनता संघाच्या मागण्यांना पाठींबा जाहीर केला. कल्याण युनिटचे प्रमुख आणि युनियनचे सचिव सुनील कंद यांच्या नेतृत्वाखाली शिबीर आणि अधिवेशन यशस्वी होण्यासाठी बापू ओव्हाळ, समीर दरेकर, शाम गायकवाड, हरेश ढमाले, सुनील दिवेकर, अजय भोसले, रुपेश जाधव, राधा किसन पांजगे, सुनिल भालेराव, दत्तात्रय जाधव आणि संदिप थूल आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.

नालेसफाईची बहुतांशी कामे पूर्ण

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  केली पाहणी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित, आपत्कालीन हेल्पलाईन क्र. ८६५७८८७१०१ ठाणे (०३) : ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली…

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा तलावात बुडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथील पाझर तलावात जान्हवी देवीदास कडू, या 11 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवार 1 जुन रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मोखाडा पोलिसांनी शोधमोहीम राबवली. मात्र रात्री उशीरापर्यंत जान्हवीचा तपास लागला नाही. अखेर, दुसर्या दिवशी तालुक्यातील घोसाळी येथील तरुणांच्या मदतीने जान्हवीचा मृतदेह हाती लागला आहे. या घटनेची मोखाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत मोखाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी देवीदास कडु  (11), व तिची  मैत्रीण मनु किसन बोढेरे (12)  या दोघी डोल्हारा येथील बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी जान्हवी हीस पाण्याचा अंदाज आला नाही तसेच जान्हवी हिस पोहता येत नसल्याने ती खोल पाण्यात जावुन बुडुन मृत्यू पावली आहे. या घटनेची खबर जान्हवी चे मामा किशोर खोडे यांनी मोखाडा पोलिसांना दिली आहे‌. जान्हवीच्या मृत्यू बाबत माझा कोणावर संशय नसुन काही एक तक्रार नसल्याची खबर खोडे यांनी दिली आहे‌. मोखाड्यातील साहसी तरुणांची मदत मृत जान्हवीचा तपास उशीरा पर्यंत लागत नसल्याने पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  (एन्ा.डी.आर.एफ.) यांना पाचारण केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी मोखाड्याजवळील घोसाळी येथील वामन जाणू माळी, जगन सक्रू माळी, नाना सक्रू धोंडगा, शिवराम वसंत दिघा, दिनकर झिपर मुरथडे आणि रावजी लक्ष्मण दिघा या सर्वानी धाडसी व अथक प्रयत्न करून जान्हवीचा मृतदेह शोधून काढला. त्यांच्या सत्कार्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांनी कौतुक केले असून मोखाडा पोलिसांना तपास कामात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत. पालकांनी पाल्यांची काळजी घ्यावी उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने आपली पाल्ये आजोळी जावून सुट्टीचा मनमुराद आनंद उपभोगत असतात. मात्र त्यातून अनेक दुर्घटना घडत असतात आणि त्यायोगे आपल्या जीवलगांची जीवीत हानी आपल्याला पाहवी लागते. ही कधीही भरून न निघणारी हानी असल्याने पालकांनी आप आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच खबरदारीच्या दृष्टीने त्यांचे योग्य ते समूपदेशन करण्याचे आवाहन मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप गिते यांनी केले आहे.

नवी मुंबई, ठाणे परिसरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

मुंबई : ठाणे, नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही दुपारी १२.३० नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई, सांताक्रूझ, बोरिवली परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, राज्यातील काही भागात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं

मंत्रालयासमोरची घटना मुंबई : मुंबईतल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. रस्तोगी यांची मुलगी वकिलीचं शिक्षण घेत होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. लिपी रस्तोगी ही LLB करत होती. वयाच्या २७ व्या वर्षी तिने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं आहे. त्याआधी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे असंही कळतं आहे मात्र त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे. या मुलीची आई राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगीने आत्महत्या केली. ज्या इमारतीत लिपी आणि तिच्या आई वडिलांसह राहात होती तिथे आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली, ज्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

महिन्यापासून शहापूर परिसरातून जीओचे नेटवर्क गायब

कल्याण: गेल्या महिन्यापासून शहापूर तालुक्यातील अनेक गाव हद्दीतील जीओ मोबाईलचे नेटवर्क गायब असल्याने या भागातील नोकरदार वर्ग सर्वाधिक हैराण झाला आहे. साठगाव, शेणवे, मळेगाव, मुसई, कुल्हे परिसरात हा प्रकार सर्वाधिक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. जीओ मोबाईलवर काॅल आला तर तो अचानक बोलताना कट होतो. नेटवर्क येण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांना गावाबाहेर उंच टेकडीवर जावे लागते. तेथे चुकून नेटवर्क असेल तर मोबाईल लागतो. अन्यथा नेटवर्क कधी येईल या प्रतिक्षेत ग्रामस्थांना थांबावे लागते. अलीकडे सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होतात. शेतकऱ्यांना बँँकेचे व्यवहार करताना मोबाईलचा वापर करावा लागतो. आता शेतीविषयक बी-बियाणे, शासन सुविधांचा लाभ ऑनलाईन माध्यमातून घेण्यासाठी मोबाईलचा वापर प्रभावीपणे केला जातो. बँकेतील बहुतांशी व्यवहार, ओटीपी, गॅस अनुदान, दुकानात ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल नेटवर्क नसल्याने ग्राहक, दुकानदार त्रस्त आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. ग्रामीण भागातील अनेक उच्चशिक्षित नोकरदार घरात बसून कार्यालयीन कामकाज करतात. त्यांची जीओ नेटवर्क नसल्याने सर्वाधिक कोंडी झाली आहे. आता गावागावामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. गावांमधील बहुतांशी व्यवहार मोबाईलवर अवलंबून असतात. लहान मोठे व्यवासायिक, त्यांना संपर्क करण्यासाठी मोबाईल महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातील बीएसएनएलचे नेटवर्क मागील सहा वर्षापूर्वी बंद पडत गेल्यानंतर गावांमध्ये जीओचा मोबाईल घेण्याची स्पर्धा लागली. सुरूवातीच्या काळात गावात जीओचे मोबाईल नेटवर्क पूर्ण क्षमतेने होते. पण गेल्या काही दिवसांपासून शहापूर परिसरातील शेणवे भागात जीओचे नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक ग्रामस्थ, वित्तीय संस्थांनी यासंदर्भात जीओच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आहे. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

पर्यावरण दिनी ठामपा लावणार पोखरण रोडवर बकुळाची १ हजार झाडे तर नागला बंदर चौपाटीवर ५०० झाडे !

५ जून रोजी ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ संकल्प – संदीप माळवी अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे तर ठाणे महापालिका पोखरण रोडवर बकुळाची १ हजार झाडे तर नागला बंदर चौपाटीवर मियावाकी पध्दतीने ५०० झाडे लावण्यात येणार असल्याची  माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने,  ठाणे महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने,५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५.०० वाजता ‘ करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, स्टॅण्ड अप कॉमेडी, कविता, पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्र्.१ आणि नागला बंदर चौपाटी अशा दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यात बकुळाची १००० झाडे लावली जाणार आहेत. तर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने ५०० झाडे लावली जाणार आहेत. त्यात, पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे.महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

धनगर प्रतिष्ठानच्या वतीने धनगर रत्न पुरस्कार

ठाणे : धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे  यांच्या वतीने रविवारी “धनगर रत्न” पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार  तेजस्विनी गलांडे ( शासकीय ),गणेश कुरकुंडे ( पत्रकारिता),अनिकेत पडसे ( सामाजिक),अनिल झोरे ( शैक्षणिक ),अक्षय मासाळ ( क्रीडा ),डॉ स्मिता काळे-बंडगर ( वैद्यकीय ), भीमराव जानकर ( उद्योजक ),नागू आप्पा वीरकर  ( लेखक – साहित्यिक ),आकांक्षा शंकर वीरकर ( राजकीय ),सचिन तामखडे (कला ) राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,नवी मुंबई  (सामाजिक संस्था)  यांना प्रदान करण्यात आले.तर पुश अप्स मध्ये ग्रिनीज वल्ड रेकॉर्ड करणारे संजय देवकाते यांचा विशेष सन्मान करण्यात आला.ठाण्यातील पाचपाखाडी येथील  ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर,वसई विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,माजी नगरसेविका विशाखा खताळ,समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे,बाबासाहेब दगडे,संजय वाघमोडे,यशवंत सेना नवी मुंबई अध्यक्ष अभिजित कोकरे,समाजसेवक संदेश कवितके,संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्षा माधवी गणेश बारगीर आदीसह मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य इतके मोठे आहे कि सर्व समाजाने त्यांची पूजा केली पाहिजे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. समाजातील रत्न शोधून त्यांना पुरस्कराच्या माध्यमातून बळ देण्याचे काम धनगर प्रतिष्ठान करत आहे त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात केळकर यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.धनगर प्रतिष्ठान सतत समाजाच्या समस्या,प्रश्न सोडवण्यात पुढे असतात.त्यामुळे प्रतिष्ठान करत असलेल्या या सामाजिक कार्याला आमचे कायमचे पाठबळ असले असे सांगून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे सुशोभीकरणासाठी आमदार निधी लागला तर देऊ असे आश्वासन देखील केळकर यांनी दिले आहे.सरकारने समाजासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत या योजना समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन विविध शिबिरे आयोजित करण्यात येईल असे केळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन धनगर प्रतिष्ठानच्या वतीने माझाकडे केलेल्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरीव निधी देऊन भव्य स्मारक उभारू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,गणेश बारगीर,अविनाश लबडे,राजेश वारे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,अनिकेत पडसे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,सचिव गायत्री गुंड,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव सुजाता भांड,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लगार अर्चना वारे,मीना कवितके,शीतल डफळ,वंदना वारे,अमृता बुधे,सीमा कुरकुंडे,मनीषा शेळके,रंजना यमगर,स्मिता गावडे,शुभांगी उघाडे,रिचा कुलाळ आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.