मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ – “तंबाखूला नाही म्हणा”. यात धुम्रपानविरोधी कार्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. “जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्ताने मंत्रालयात सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला. व्यसनांचे विदारक रुप प्रकट करणारे कटआऊट, बँनर्स, पोस्टर्स प्रदर्शनी याचे उदघाटन यावेळी प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उप सचिव रविंद्र गोरवे, कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ तांबवेकर, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल मडामे हे उपस्थित होते. प्रमोद जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यसन आणि वाढते प्रमाण यांना आळा घालण्यासाठी प्रचार, प्रसार, प्रबोधनाची त्रिसुत्री अवलंबून युवा पिढीचे तंबाखूजन्य पदार्थापासुन आपण रक्षण करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन थांबविले नाही तर सन 2020 ते 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखू पासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला नाही का ? म्हणून या आयोजनात सर्वांनी सहभागी व्हावे व स्वतःला तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी 2011 साली व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे. 2020 महाराष्ट्र राज्याचे साठावे वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने व्यसनमुक्त महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या 100 मीटर पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये मोहीम राबविण्यात येईल व याठिकाणी तंबाखूमुक्ती ची शपथ मंडळाच्या संघटकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याचे चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी मांडले. वाढते व्यसनांचे प्रमाण आणि त्यात अडकत झालेली तरुणाई यांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि शरीराची होणारी परवड लक्षात घेऊन या मुलांना परावृत्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात ही प्रदर्शनी, व्यसनमुक्ती सापसिडी बघण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मुंबईकर यांचे लक्ष वेधुन घेऊन सर्वांना तंबाखूला नाही म्हणा असे संदेश देत होते. सदर कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्तालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन, किन्नर मॉ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत तंबाखू मतलब खल्लास तंबाखू मुक्त महाराष्ट्र चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी दिली. सदर कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने कार्यकारीणी सदस्य प्रिया पाटील, दिपक पाटील, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील, मुंबई शहर संघटक विवेक साळवी, व मुंबई उपनगर संघटिका दिशा कळंबे, स्वयंसेवक चेतना सावंत या सर्वांनी उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रम प्रसंगी व्यसनमुक्ती सापसिडी चे पण आयोजन करण्यात आले होते याचा आंनद सर्वांनी घेतला. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे आभार नशाबंदी मंडळाचे सदस्य प्रिया पाटील यांनी मानले. तसेच संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल मडामे, चिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले.