Month: June 2024

मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडा – जिल्हाधिकारी संजय यादव

निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून अशोक गायकवाड मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी,आढावा घेताना दिल्या. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी शनिवार,(दि.१ जून २०२४) रोजी शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे,पोलीस उपायुक्त संजय लाटकर, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे स्ट्राँग रूम संचालक तथा समन्वय अधिकारी अभिजीत घोरपडे,तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था,माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, आपत्कालीन कंट्रोल रूमची पाहणी करून चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहील यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. मतमोजणी केंद्राच्या परिसरातील स्वच्छता आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. मतमोजणी केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, चौकशी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उपलब्ध असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत संबंधितांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत

लाखो नागरिकांना दूषित पाणी उल्हासनगर : शहरातील खेमानी नाल्याचे सांडपाणी ओव्हरफ्लॉ होऊन उल्हास नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित असल्याची ओरड सुरू झाली. उल्हास नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे. उल्हासनगर संच्युरी कंपनी जवळून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करते. नेमके त्याच ठिकाणी शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीतील पाणी प्रदूषित होते. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा लाखो नागरिकाला होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्यावर, महापालिकेने खेमानी नाल्याचे पाणी विहिरीत अडविले जाते. अडविले पाणी पंपिंग करून शांतीनगर मलनिस्सारण केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून नदी खाडीत सोडले जाते. यावर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. नाल्याचे सांडपाणी अडवलेल्या ठिकाणी तुंबून ओव्हरफ्लॉ होत नदी पात्रात जात असल्याचे चित्र आहे. यावर महापालिकेने त्वरित कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थेकडून होत आहे. शहरातील खेमानी नाल्या प्रमाणे, म्हारळगावातून येणारा सांडपाणी नाला खेमानी नाल्यापुर्वी उल्हास नदीला मिळून नदीचे पाणी प्रदूषित करीत आहे. त्या नाल्याचे पाणी अडवून, त्यावर प्रक्रिया करून नदी ऐवजी नदी खाडीत पंपिंगद्वारे सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खेमानी नाल्याचे पाणी ज्याठिकाणी अडविले आहे. त्याठिकाणी नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी एक लोखंडी जाळी बसविली आहे. त्या जाळीला कचरा अडकुन पाणी ओव्हरफ्लॉ होऊन नदीत जात असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. महापालिका कोट्यावधी रुपये खर्चून ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

साहित्यिकांनी सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने लिहावे – कृष्णात खोत

ठाणे : लेखक आणि कवींनी कुठल्याही काळात सत्तेच्या नव्हे, तर सत्याच्या बाजूने असले पाहिजे. सत्याचे लेखन हाच त्यांचा धर्म, तीच त्यांची जात असली पाहिजे. आत्मविस्थापनाच्या सद्ध्याच्या दुर्दैवी काळात तर लिहिणाऱ्या हातांनी निर्भयपणे लिहीत रहायला हवे. स्वतःला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारत रहायला हवेत असे स्पष्ट मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनाचे दुसरे पुष्प कै. वा. अ. रेगे साहित्य पुरस्काराच्या वितरणाने गुंफले गेले. शनिवारी वा. अ. रेगे सभागृहात खोत यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले. सत्तेचे ढोंग फाडण्याचे काम च्हित्यिक करत असतो. कोणताही साहित्यिक हा लोकशाही वादी असतो त्यात जास्त लोकशाही वादी हा कादंबरीकार असतो कारण तो अल्पमतवादी असतो. तो एकट्या माणसाचे सत्य घेऊन लढत असतो. लिहीणारा माणूस हा नेहमी शेवटच्या हबाकावर बसलेलेा असतो. सामान्यांचा आवाज पोहोचवण्याची ताकद लेखकात असते. राजाला लेखकाची भिती वाटत असते. सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व लेखक, कवीने करावे तेव्हाच सामान्य माणसांचा चेहरा वाचता येतो. लेखकाने सभ्यतेकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. जेत्यांचा इतिहास लिहीताना पराजितांच्या इतिहासाकडे देखील बाकराने पहावे. मानवता, करुणा याकडे देखील लेखकाचे लक्ष हवे. धर्म म्हणजेच सत्य यापलिकडे काही नाही अशी त्याची भूमिका असावी. धर्म हा उंबराच्या आत आणि उंबराच्या बाहेर आल्यावरमानवतेचा, भूतदयेचा धर्म लेखकाने पाळावा. मुंगीलाही जगण्याचा अधिकार आहे यावर लेखकाचा विश्वास असला पाहिजे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे प्र.संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, २०२४ पासून ज्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात त्या साहित्यकृतींचा समावेश शासनाच्या ग्रंथालयात केला जाणार आहे. शासकीय ग्रंथालये देखील आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत. ४७ लाख शासनमान्य ग्रंथ शासनाकडे असून त्यापैकी ३० लाख ग्रथांची नोंदणी ई प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, १०० हून अधिक वर्षे झालेल्या पुस्तकांचे शासनाच्या माध्यमातून डिजीटायझेशन करुन ती पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुरूवातीला विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ललित गटात वैभव साटम लिखीत भावकी अन गावकी तर ललितेतर गटात रुपाली मोकाशी लिखीत श्रीस्थानकाचे शीलेहार यांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय साहित्य पुरक्साराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डावीकडून ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, दा.कृ. सोमण, ठाणेकर, गाडेकर, खोत, विश्वस्त मकरंद रेगे, हेमंत काणे आणि विनायक गोखले आदी उपस्थित होते. वृंदा दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

गुजरातमधील पर्यटक बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर

बोर्डी : राज्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव आणि नारगोल समुद्रकिनारी प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ आता बोर्डी या निसर्गरम्य समुद्रकिनारी, तसेच येथील वॉटरपार्कमध्ये वाढला आहे. आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने कोणत्याही वेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गुजरात प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील बहुसंख्य पर्यटन केंद्रावर पर्यटकांना जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. गुजरात राज्यातील वापी, सुरत, तसेच अन्य शहरांमध्ये प्रचंड तापमान वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळावा, म्हणून त्या भागातील ग्रामस्थ पर्यटनाचा व थोडाफार थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी उंबरगाव, नारगोल, तसेच अन्य समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पर्यटनाचा ओघ वाढला होता; मात्र १ जूनपासून गुजरात प्रशासनाने राज्यातील पर्यटकांवर समुद्रकिनारी जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. हे नागरिक बोर्डी परिसरातील वॉटरपार्क, तसेच समुद्रकिनारी गार्डनमध्ये फिरण्यासाठी येत असल्यामुळे बोर्डी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

‘राजावाडी’च्या शवविच्छेदन केंद्राचे काम पूर्ण

मृतांच्या नातेवाईकांसाठी पाणपोई व इतर सुविधा घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः घाटकोपर येथील राज्य सरकारच्या अखत्यारीतील राजावाडी शवविच्छेदन केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राची मोडकळीस आलेली इमारत, शवविच्छेदन सुरू असताना नातेवाईकांना बसायला नसलेली जागा, पाणपोई आदी सुविधा आता निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर या केंद्राला आता नवी झळाळी मिळाली आहे. पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळील हे शवविच्छेदन केंद्र फारच जुने होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मोडकळीस आलेली इमारत, छत कोसळण्याचे प्रकार, मृतांच्या नातेवाईकांची आसन व्यवस्‍था, पिण्याचे पाणी, अस्‍वच्छता, कमी मनुष्यबळ अशा तक्रारींत वाढ झाली होती. याची दखल घेत केंद्राचे मुख्याधिकारी, पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील यांनी या ठिकाणी पाहणी करून राज्याचे वैद्यकीय उपसंचालक यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता. दररोज ४० मृतदेहांची चिकित्सा घाटकोपरच्या या केंद्रावर नवी मुंबई, मुंबई उपनगरे तसेच ठाण्यापासून ते अगदी रेल्वेच्या हद्दीतील मृतांचे शवविच्छेदन केले जाते. रोज हा आकडा सरासरी ३५ ते ४० इतका असतो. मात्र त्या तुलनेत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना याचा त्रास होत होता. याची दखल घेत डॉ. पाटील यांनी पोलिस सर्जन म्हणून नागपाडा येथे पदभार घेतल्यानंतर कमी वेळेत या केंद्राचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब उद्या उमेदवारी दाखल करणार मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब हे उद्या सोमवारी, ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईतील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस लोकसभा उमेदवार भूषण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता अनिल परब हे कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी दाखल करतील. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. उमेदवारी दाखल  करतेवेळी तीन हजार शिवसैनिक, युवसैनिक तसेच पदवीधर मतदार यांची उपस्थिती राहणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी ८ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून अनिल परब यांच्या नावाची घोषणा मागच्या आठवड्यात केली. महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नसल्यामुळे परब यांनी निवडणुकीत विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, ‘गेली तीस वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मतदार नोंदणी आणि प्रचार यामध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे. यावेळीसुद्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून माझा विजय विक्रमी मताधिक्यांनी  निश्चित आहे.’ २००४ तसेच २०१२ आणि २०१८ असे तीन वेळा अनिल परब हे विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिलेले आहेत. यावेळी प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. या मतदार संघात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित होणार आहे. ज्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे, त्या मतदारसंघातील चार विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

६ आणि ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद

करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये मुंबई : महानगरपालिकेने शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या व जीर्ण जलवाहिनींच्या बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परिणामी, जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा ६ जून रोजी रात्री ९.४५ वाजल्यापासून ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीकामासाठी १७ तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या दुरुस्ती कामादरम्यान जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवून गुलाम निर्माण होतील-राजरत्न आंबेडकर

अशोक गायकवाड रायगड : लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागले असून देशाची वाटचाल हुकूमशाही च्या दिशेने होत आहे.अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका येथे सालाबादप्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन दि. ३१ मे व १ जून २०२४ असा दोन दिवसीय भव्य दिव्य असा भिम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भिम महोत्सव निमित्ताने वैचारीक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. प्रमुख वक्ते, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब डॉ. आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भिम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला चारशे पार जायचं आहे कारण की त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत. ३७० चा आकडा टू थर्ड हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचे आहे. २०१४ पासून नरेंद्र मोदी आणी भाजप चा हा अजेंडा उघड झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देशावर राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे अशी ऑफीसियल स्टेटमेंट केली आहे. यावरून त्यांचं मिशन स्पष्ट होत आहे. अभ्यासक्रमात, पाठय पुस्तकात मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले आहे. आंबेडकर म्हणाले की बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांचे विधान आहे की शिक्षण हे वर्णव्यवस्थेला जातीयतेला उखडून फेकतील अशा लोकांचं झालं पाहिजे. जे लोक मनुस्मृती व वर्णव्यवस्था लागू करतील ते लोक ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आयुक्षभर प्रयत्न करतील. मनुस्मृती पाठ्यपुस्तकात लागू केली जाते कारण मनुस्मृती चे समर्थक या देशात तयार होतील. बाबासाहेब डॉ. आंबेडकर म्हणायचे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील, आज परिस्थिती पहा मनुस्मृती लागू करून मनुस्मृती चे समर्थक वाढवले जातात, आता धर्म धिष्टीत शिक्षण लहान पणापासूनच गुलामी एन्जॉय करणारी पिढी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पूर्वीच्या शैक्षणिक क्षेत्रात आय ए एस, आय पी एस, आय आर एस, आय एफ एस, डॉक्टर, इंजिनियर, वकील बाहेर पडायचे आत्ताच्या शिक्षण प्रणालीतून आर एस एस (राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे) कार्यकर्ते बाहेर पडतील . असे आंबेडकर म्हणाले. आम्ही विद्यार्थी दशेत असताना प्रशासन, महाविद्यालयाच्या विरोधात आमचे भांडायचे मुद्दे होते की आम्हाला पुस्तक मिळत नाहीत, लेक्चर होत नाहीत, तर आत्ताचे मुद्दे हे आहेत की हिजाब घालायचा की नाही, की भगवे घालायचे की नाही हे मुद्दे पुढे आलेत, यातूनच मनुस्मृती चे समर्थन करणारे कार्यकर्ते घराघरात निर्माण होतील अशी चिंता आंबेडकर यांनी व्यक्त केली. भारताची लोकशाही धोक्यात आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशानी जाहीर केल. लोकशाहीचे चार स्तंभ न्यायपालिका, कार्यपालिका, संसद, प्रसार माध्यमावार (आर एस एस) राष्ट्रीय स्वयं संघानेने कब्जा केला आहे. एकही टीव्ही चैनल आमचे मुद्दे मांडणारे नाही. संसदेत चारशे पार चा नारा लावून संविधान बदलविण्याचे, हुकूमशाही लादण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून दबाव तंत्रातून विरोधक संपवले जात आहेत. भाजपचा वन नेशन वन पॉलिटिशन चा प्लॅन आहे. असा गंभीर आरोप राजरत्न आंबेडकर यांनी केला. आंबेडकर जयंतीत कोट्यवधी चा खर्च होतो, याबरोबरच आम्ही हक्काच्या आपल्या बँका, शैक्षणिक संस्था, धम्म केंद्र उभे करण्यासाठी येत्या – काळात चळवळ गतिमान – केली पाहिजे असे आवाहन आंबेडकर यांनी केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनुस्मृती चे समर्थन करून संविधान विरोधी भूमिका दर्शवली, मनुस्मृती नुसार येणारी स्त्री गुलामी त्या स्वीकारतील का असा सवाल राजरत्न – आंबेडकर यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर दिलेला ५८ टक्के हा मतांचा आकडा वाढला आहे, तो कसा वाढला हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला, याच उत्तर निवडणूक आयोगाला देता आले नाही. अविकसित देशात ई व्ही एम मशीनचा वापर केला जातं आहे, मात्र विकसित देशात मशीनचा वापर न करता तिथे बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या जातात. इतर देशात आज बॅलेट पेपर वर मतदान, आणी दुसऱ्या दिवशी निकाल दिला जातो. मात्र इथे इव्हीएम वर मत घेऊन मशीन सेक्टर मध्ये बंद ठेवून नंतर निकाल दिला जातो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी देशातील एकत्रित येऊन काळा कायदा उलथून लावला तसेच मतदारांनी एकत्र येऊन इव्हीएम मशीन उलथून लावली तरच लोकशाही मजबूत होईल असे आंबेडकर म्हणाले. बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी सांगितलं होते की आपण जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. बौद्ध म्हणून पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री हे आय एम बुद्धा नावाने परदेशात जाऊन बौद्ध म्हणून पैसे उकळत असल्याचा आरोप राजरत्न आंबेडकर यांनी केला. आम्ही खरे बौद्ध विविध जातीत न विखरता जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. आज आम्ही भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून बौद्ध राष्ट्रातून आपले अधिकार आणत आहोत. वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धीष्ट ही १३८ देशाच्या संघटनेत आपली संस्था पुनर्जीवीत करून आज जगाच्या पटलावर आम्ही बौद्धाच्या समस्या मांडत आहोत. इतर देशात बौद्ध धम्म हा पुतळे, मुर्त्या, आणि विहारात नसून बुद्ध तत्वज्ञान त्यांनी अंगीकारले आहे. बुद्ध तत्वज्ञान जीवनात अंगीकारले तरच आमची संघटन शक्ती वाढून प्रगती होईल. असे आंबेडकर म्हणाले. गड किल्ल्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी, अधिकार संभाजी राजे यांना दिले आहेत, त्याप्रमाणे या देशातील बौद्ध लेण्या, स्तूप संवर्धन जतन करण्याची जबाबदारी बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध संस्थेला द्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. या भीम महोत्सव २०२४ या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, जिवक गायकवाड, किशोर द्वारकनाथ गायकवाड, अंकुश सुरवसे, विजय गायकवाड, गणेश कांबळे, अशोक गायकवाड (सावेळे), अलकाताई सोनवणे, सुरेखाताई कांबळे, नितीन सोनावणे, जगदीश शिंदे, निलेश गायकवाड, अक्षता गायकवाड, अध्यक्ष एड.शैलेश पवार, दौलत ब्राम्हणे, के के गाडे, मनोहर ढोले, रमेश खैरे, गणपत गायकवाड, बबन रामा गायकवाड, सिद्धार्थ सदावर्ते, संतोष सोनावणे (कडाव), एड. सुमित साबळे, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. वैभव गणेश गायकवाड, सूरज पंडीत, उमेश गायकवाड, सचिन मारुती भालेराव, योगेश मारुती गायकवाड, जितरत्न जाधव,सचिन गायकवाड, सुनिल गायकवाड, संतोष आडसुळे, पप्पु वाघमारे, चेतन विनायक गायकवाड, प्रेमनाथ जाधव, विश्वनाथ बडेकर, आदींसह भीम महोत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, भिम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई स्वच्छता मोहिमेत

१५७ मेट्रिक टन राडारोडा व ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन मुंबई : महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांतील विविध ठिकाणी शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यातून सुमारे १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, जवळपास २८३ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. मुंबईत गेल्या २८ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, सुमारे २८३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर, फायरेक्स यंत्र, मिस्टींग यंत्र आणि अन्य अद्ययावत यंत्रणासह तब्बल १ हजार ३३२ कामगार व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली. पालिकेच्या ए विभागातील बोरा बाजार, सर फिरोजशाह मेहता मार्ग, पेरी नरिमन मार्ग, डी विभागात नाना चौक, ताडदेव सर्कल, जावजी दादाजी मार्ग, जी दक्षिण विभागात धोबीघाट, सुदाम काळू अहिरे मार्ग, जी उत्तर विभागात शाहूनगर, धारावी, एच पूर्व विभागात सांताक्रुज येथे इंडियन ऑईल कंपनी प्रवेशद्वार ते हनुमान टेकडी परिसर, के पूर्व विभागात प्रभाग ८३ मधील झोपडपट्टी व आसपासचा परिसर, के पश्चिम विभागात वेसावे येथील मत्स्य पालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, एल विभागात साकीनाका येथील एस. जे. स्टुडिओ ते खैरानी मार्ग, एम पूर्व विभागात सोनापूर मार्ग, पी दक्षिण विभागात महात्मा गांधी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, पी उत्तर विभागात मालाड पश्चिम येथील जोड रस्ता, आर दक्षिण विभागात कांदिवली पूर्व येथे आकुर्ली मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, आर मध्य विभागात अमरकांत झा मार्ग, ब्रह्मा विष्णू महेश मार्ग, शिंपोली मार्ग, मल्हारराव कुलकर्णी मार्ग, टी विभागात मुलुंड आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्षाची स्थापना – तहसिलदार डॉ. शीतल रसाळ

अशोक गायकवाड रायगड : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनेच्या अनुषंगाने नवीन प्रशासकीय भवन, कर्जत, जि. रायगड येथे नियत्रंण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तरी कर्जत तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही आपत्ती…