५९ लाखांची वीजचोरी उघड; ६० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 

 

कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे. गत जून महिन्यात उपविभागातील मांडा, गावेली, कोन आणि खडावली शाखा कार्यालयांतर्गत १४७ जणांवर धडक कारवाई करून ५९ लाख २४ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा उपविभागात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. या मोहिमेत मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत ५० जणांकडे १८ लाख ५३ हजार ५१० रुपये, कोनगाव शाखा परिसरातील ४३ जणांकडे २८ लाख ७८ हजार १६० रुपये, गोवेली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत २८ जणांकडे ९ लाख ५१ हजार ५३० रुपये आणि खडावली शाखा परिसरातील २६ जणांकडे २ लाख ४० हजार ८८० रुपयांची वीजचोरी आढळून आली. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत‍ नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंते तुकाराम घोडविंदे व अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंते अलंकार म्हात्रे आणि सचिन पवार यांच्या चमुने ही कामगिरी केली. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कोणतीही युक्ती वापरून वीजचोरी करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
00000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *