ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात’ आतापर्यंत २७,३३७ झाडे लावण्यात आली असून एक लाख झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात’, कृषी दिनाचे औचित्य साधून सोमवारी सकाळी बाळकूम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या समारंभात, महापालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (उद्यान) सचिन पवार, उपायुक्त (परिमंडळ ३) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील, उपकेंद्रांचे संचालक अद्वैत वैद्य, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपणाची सुरवात ही महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या ‘ताम्हण’ या झाडाच्या रोपणाने करण्यात आली. याप्रसंगी ताम्हण या वृक्षाचे वैशिष्ट्य व महत्त्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितले. या परिसरात एकूण ३०० झाडे लावण्यात आली. त्यात, ताम्हणसोबतच, बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, महोगनी, बांबू आदींचा समावेश आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत, रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केले. कृषी दिनाच्या औचित्याने आज मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात वृक्षारोपण करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सहभागातून येत्या १५ ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या हरित ठाणे अभियानास लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आयुक्त राव यांनी केले. उपकेंद्राच्या परिसराचे रुपडे पालटून टाकण्याची गरज असून त्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. त्यांना महापालिका सर्वतोपरी मदत करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बदलांसाठी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी महापालिका मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री देईल. त्यात परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही श्रमदानाच्या माध्यमातून सहभाग घ्यावा. म्हणजे त्यांच्यात स्वच्छतेचे संस्कार रुजतील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. याप्रसंगी, मुख्यमंत्री हरित ठाणे या अभियानाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी स्वागत केले. तसेच, उप केंद्र परिसरातील उपक्रमांची माहिती दिली.
ठाणे महापालिकेने ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कॅडबरी नाका येथे वृक्षारोपण करून ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’ची सुरवात करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय तसेच खाजगी जागांवर १५ ऑगस्टपर्यंत एक लक्ष स्थानिक प्रजाती, विशेषतः बांबू लागवड करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत २७,३३७ झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित झाडांच्या रोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार ही झाडे लावली जात आहेत. दरम्यान, कृषी दिनाचे औचित्य साधून ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’चा संदेश घरोघरी नेण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळांच्या परिरसात छोटेखानी वृक्षदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील १२९ म.न.पा. शाळा, ७० खाजगी शाळा व ०५ महाविद्यालये अशा एकूण २०४ शाळा व महाविद्यालयातील सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपआपल्या परिसरामध्ये वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपण केले. त्यांनी ५४०० वृक्षरोपांची लागवड केली. विविध ठिकाणी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांसह महापालिकेच्य़ा उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम आणि मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान सहभागी झाले होते. यावेळी, विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा या घोषणेचा गजर केला. झाडांच्या कुंड्या, फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी शाळांच्या परिसरात वृक्षदिंडी काढली. वृक्ष दिंडी आणि वृक्षरोपणासाठी रोपे, खत तसेच वृक्ष संवर्धन घोषणांचे फलक हे साहित्य सर्व शाळांना वृक्ष प्राधिकरणातर्फे देण्यात आले होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *