उत्तर प्रदेश : हाथरसमध्ये प्रसिध्द भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १०७ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती आहे. या चेंगराचेंगरीत शेकडो जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हाथरसमध्ये भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. हे लोक मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, एटा येथील असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या जास्त आहे आणि अद्यापही अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.

सत्संग मंडपातील उष्णतेमुळे लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुघर्टनेत आतापर्यंत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका पोहोचण्यास बराच विलंब झाला. स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या हॉस्पिटल आणि एटा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, “जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत  उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचे प्राथमिक लक्ष आहे. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत कऱण्यात येत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *