या देशात हिंदू समाज हाच हिंसक असून त्यामुळे देशात अशांतता निर्माण होते अशा आशयाचे विधान ज्येष्ठ काँग्रेसी नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्या सुरुवातीला भाषण करताना केले आहे. त्यांच्या या विधानामुळे देशभरातील हिंदू समाज अस्वस्थ झाला असून त्याचे पडसाद आज काही ठिकाणी उमटतानाही दिसत आहेत. आज संसदेत या चर्चेचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गांधींच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींचे हे विधान बालबुद्धीचे असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील पंतप्रधानांनी केली आहे. आता हे प्रकरण कोणते वळण घेते हे आज सांगणे कठीण आहे. मात्र त्यामुळे काही काळ तरी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे नक्की.
आज भारतातील १४० कोटी जनतेपैकी जवळजवळ ६० ते ६५ टक्के जनता ही हिंदू आहे. मात्र हा हिंदू समाज विविध जाती-जमातींमध्ये विभागलेला आहे. असे असले तरी हा हिंदू समाज आजवर सहिष्णू म्हणूनच ओळखला गेला आहे. हा समाज कधीही आक्रमणकारी नव्हता आणि स्वतःहून संघर्ष ओढवून घेणे किंवा अगदी सोप्या भाषेत भांडणे विकत घेणे हे या समाजाला कधीच जमले नाही. मात्र कुणी संघर्ष केला तर त्याला तितक्याच सक्षमपणे उत्तर देण्याची क्षमताही या समाजात निश्चित राहिलेली आहे.
अगदी प्राचीन काळापासूनचा इतिहास बघितला तर हिंदूंच्या सहिष्णुतेची अनेक उदाहरणे देता येतील. अगदी पौराणिक काळात बघायचे झाले तर सत्ययुगात प्रभू रामचंद्र वनवासाला गेले असताना त्यांनी स्वतःहून कोणावरही आक्रमण केले नव्हते. मात्र ज्यावेळी सीतामाईला रावणाने पळवून नेले त्यावेळी वानरांची फौज सोबत घेऊन त्यांनी लंकेवर आक्रमण केले आणि रावणाचा वध करत सीतामाईला सोडवून आणले. सीतामाईला सोबत आणल्यावर लंका ते आपल्या ताब्यात सहज ठेवू शकले असते. मात्र त्यांनी तसे न करता तिथे रावणाचा भाऊ बिभीषण याचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या हाती राज्य सोपवून ते अयोध्येला रवाना झाले होते.
नंतरच्या काळात भगवान कृष्णाच्या संदर्भातही अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिशुपालाचे शंभर अपराध होईपर्यंती त्यांनी कधीच शिशुपालाला हातही लावला नव्हता. महाभारतातील धर्मयुद्धात भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या बाजूने लढायला उभे राहिले. अर्जुनाचे सारथ्य त्यांनी केले. अर्जुनाला गीताही सांगितली .मात्र धर्मयुद्ध जिंकल्यावर भगवान श्रीकृष्ण सहजगत्या बाजूला झाले होते. काही काळ राज्य केल्यावर पांडव देखील सर्व काही सोडून स्वर्गाच्या वाटेने निघाले होते, अशाही नोंदी सापडतात.
अगदी अलीकडल्या काळातील उदाहरण घ्यायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे देता येईल. कल्याणमधील रयतेला कल्याणचा सुभेदार छळतो आहे म्हणून महाराजांनी त्याचा बंदोबस्त करायला आपले सैन्य पाठवले. त्या सैन्याने बंदोबस्त केल्यावर कल्याणच्या सुभेदाराची देखणी तरुण सून सोबत आणली होती. त्या वेळेच्या प्रथा परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज त्या देखण्या सुनेला आपल्या राणीवशात सहभागी करून घेऊ शकले. असते मात्र महाराजांनी तसे न करता तिला साडीचोळी देऊन आणि खणा नारळांनी ओटी भरत तिचा सन्मान केला होता आणि सन्मानाने मेण्यात बसवून तिला तिच्या घरी परत पाठवले होते.
ही काही मोजकी उदाहरणे सांगितली तरी हिंदू समाज हा कधीच आक्रमक संघर्षशील किंवा हिंसक नव्हता असा ठाम निष्कर्ष काढता येतो. अगदी अलीकडल्या काळात म्हणजेच गेल्या सुमारे २०० वर्षात या देशात हिंदू मुस्लिमांचे जे काही दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जर खोलात जाऊन वास्तव तपासले तर हिंदूंनी दंग्याची सुरुवात केली असे वास्तव कुठेही दिसत नाही.
या देशात प्राचीन काळापासून हिंदूंची वेगवेगळी राज्य राज्यकारभार करीत होती. साधारणपणे इसवी सनानंतरच्या सातव्या आठव्या शतकापासून इथे उत्तरेकडून यवनांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. या टोळ्या नंतर इथेच राहून राज्य करू लागल्या .त्यातून हळूहळू मोगल साम्राज्य निर्माण झाले. या मोगलांच्या अत्याचारामुळे त्रासलेल्या हिंदू राजांनी त्यांच्याशी संघर्ष सुरू केला होता. त्यात महाराणा प्रतापही होते तर छत्रपती शिवाजी महाराजही होते. या राजांनी संघर्ष केला तो स्वसंरक्षणार्थ आणि आपल्या रयतेच्या हितासाठी. आकारण परक्यांची लुटालुट करणे हे त्यावेळी देखील या हिंदू राजांना मान्य नव्हते असे इतिहास सांगतो.
या मुस्लिमांनी इथे राज्य करताना इथल्या राज्यांमध्ये दुही कशी निर्माण होईल हाच प्रयत्न केला. तोच प्रयत्न नंतर या देशात आधी व्यापारासाठी आलेल्या आणि नंतर राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी देखील केला. त्यांनीही या देशातील विभिन्न जाती-जमातींना एकमेकांत भांडत ठेवले आणि त्या संघर्षाचा फायदा घेत संपूर्ण देशावर आपले साम्राज्य स्थापन केले. ते साम्राज्य जवळजवळ १५० वर्ष चालले.
१९४७ मध्ये इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले. त्यावेळी या देशाचे त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान असे दोन भाग केले. त्यात हिंदुस्थान मध्ये हिंदूंनी राहावे आणि पाकिस्तान मध्ये मुस्लिमांनी राहावे असे अपेक्षित होते. इंग्रज गेल्यावर हिंदुस्थानची सत्ता ही काँग्रेसकडे आली. त्यावेळी काँग्रेसचे सर्वेसर्वा पं. जवाहरलाल नेहरू हे होते. नेहरू हे देखील इंग्रज धारजिणेच होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांचीच डिव्हाइड अँड रुल ही पॉलिसी वापरली. त्यांनी या देशातील हिंदू समाज असंघटित कसा राहील हाच कायम प्रयत्न केला. तोच प्रयत्न पुढे त्यांच्या कन्या इंदिरा गांधी,नातू राजीव गांधी यांनीही केला, आणि आता त्यांचा पणतू राहुल गांधी हे देखील हाच प्रयत्न करत आहेत.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे असे अपेक्षित असताना पं. नेहरू आणि महात्मा गांधी यांनी अनेक मुसलमानांना भारतातच ठेवून घेतले. मुसलमान हे जरी अल्पसंख्यांक होते तरी ते संघटित होते. त्यामुळे त्यांची एक गठ्ठा मते जो कोणी त्यांच्या बाजूने उभा राहील त्याला मिळायची. हेच हेरून नेहरूंनी हिंदूंकडे दुर्लक्ष करत त्यांना गृहीत धरत मुस्लिमांचे लांगुलचालन करणे सुरू केले. त्यांना भरपूर सवलती दिल्या, आणि हिंदूंकडे दुर्लक्ष करत त्यांना कायम टिकेचे धनी बनवले.
जसे गांधी नेहरू यांनी हिंदू समाजाला टीकेचे धनी बनवले, तसेच या देशात असलेल्या डाव्या विचारसरणीच्या कथित पुरोगाम्यांनीही हिंदूंवर कायम टीका करून त्यांना दुय्यम कसे बनवता येईल हाच प्रयत्न केला. या डाव्या मंडळींचा देशातील वैचारिक क्षेत्रावर दीर्घकाळापासून प्रभाव होता. त्यामुळे चित्रपट नाटक साहित्य सांस्कृतिक क्षेत्र या सर्वांच्या माध्यमातून हिंदूंना कमी कसे दाखवता येईल आणि त्यांच्यावर टीका कशी करता येईल, तसेच त्यांच्या भांडणे कशी लागतील, हाच प्रयत्न या मंडळींनी केला, आणि काँग्रेसने कायम त्यांना साथ दिली. हिंदू संघटित नसल्यामुळेच वर्षानुवर्षे काँग्रेसचे फावले. आजही तसेच फावते आहे. त्यामुळेच आजही काँग्रेस हिंदू समाजाला गृहीत धरून चालते आहे. यावेळी देखील तेच झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित इंडी आघाडीने काही खोटे समज गैरसमज पसरवून देशातील मुस्लिमांना आणि दलितांना संघटित केले, आणि त्या जोरावर त्यांनी आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न केला. नाही म्हणायला २०१४आणि २०१९ पेक्षा त्यांना थोड्या जागा जास्त मिळाल्या. त्यामुळे राहुल गांधी सध्या हवेत आहेत. आता हिंदू समाज आपले काहीही बिघडवू शकत नाही अशा अवस्थेत ते आले आहेत. आणि त्यामुळेच ते हिंदूंवर हिंसक असल्याचे आरोप करत देशात तणावाचे वातावरण निर्माण केला आहे. जो समाज आजवर कायम पापभिरू आणि सहिष्णू म्हणून ओळखला गेला आहे त्या हिंदू समाजावर अशा प्रकारे खोटे आरोप राहुल गांधी यांनी करावे हे नरेंद्र मोदी यांच्या मते कदाचित बालबुद्धीचे लक्षण असेलही, मात्र देशातील प्रबुद्ध नागरिकांच्या मते हा आंतरराष्ट्रीय कट देखील असू शकतो .लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पीछेहाटीची मिमांसा करताना बित्तंबातमीने या मुद्याकडे देखील लक्ष वेधले होते याची वाचकांना आठवण होईलच. या देशात सत्ता कुणाची असावी हे या देशातील मतदारच ठरवणार आहेत. मात्र सत्तेत कोणीही असला तरी त्याने सर्व समाजांचा योग्य तो आदर केला पाहिजे, आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आज राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस हिंदू समाजाला गृहीत धरून त्यांच्यावर बेजबाबदार आरोप करत आहेत ही बाब निश्चितच निंदनीय म्हणावी लागेल. या देशातील समस्त राष्ट्रवादी हिंदू समाजाने या मुद्द्यावर विचार करावा, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.
