…अखेर नवी मुंबई महापालिकेने घेतली एमआयएमच्या तक्रारीची दखल
एमआयएमचे हाजी शाहनवाज खान यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
नवी मुंबई : अद्याप पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल, हे लक्षात घेऊन सतर्कता राखावी तसेच नवी मुंबई परिसरातील गटारे, नाले, रस्त्यांवरील खड्डे, झाडांच्या फांद्यांची छाटणी, पथदिव्यांची दुरुस्ती, मलनिःसारण वाहिन्यांची दुरुस्ती आणि गटारांवरील झाकणे बसविण्याबाबत एआयएमआयएमने आवाज उठविला होता. या गंभीर प्रश्नाला नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या कामाच्या जोरावर उत्तर देवून एआयएमआयएमच्या मागणीची दखल घेतली असल्याचे पत्र एआयएमआयएमचे नवी मुंबई प्रभारी हाजी शाहनवाज खान यांना दिले आहे.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्राकडेसुद्धा विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले आहेत. एआयएमआयएमच्या मागणीनंतर आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत नाले व गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजूनही काही झोपड्या शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पहाणी करावी व अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले.
यावर्षी पूर्वापार पद्धतीने नाल्यांमधील प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नालेसफाई करण्यात आली असून आगामी काळात नाल्यांची गाळ काढून सखोल सफाई करण्याबाबत नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच धारण तलावांच्या सफाईबाबतही आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच आपत्कालीन निवाऱ्याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने व इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करण्याबाबत तसेच सिडकोकडे यासाठी जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. एआयएमआयएमच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर एआयएमआयएमचे नवी मुंबई प्रभारी तथा कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी पालिकेचे आभार मानले आहेत.
00000
