स्वाती घोसाळकर
मुंबई : मुंबईच्या क्रिकेट पंढरीत आज जग जिंकणारे क्रिकेटच देव अवतरले. या देवाचे दर्शन घेण्यासाठी अवघी मुंबई आज रस्त्यावर लोटली. अजि म्या देव पाहिल्याच्या थाटात क्रिकेटच्या या भक्तांनी आपल्या दैवतांचे दर्शन घेतले. टि२० क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्याची मनोभावे मागितलेले दान पुर्ण झाल्याचे समाधान या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर दिसत होते.
मरीन लाईन्सच्या समुद्र किनारील फेसाळणाऱ्या लाटांचे वैभव ल्यालेल्या सागरालाही हेवा वाटाव इतकी अलोट गर्दी क्रिकेटच्या दैवताच्या दर्शनासाठी लोटली होती. अवघ्या एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी क्रिकेटपटूंच्या या बसला तब्बल अडीच तास लागले. त्यानंतर वानखेडेवर या जगजेत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘क्रिकेट का राजा कौन है…रोहीत भाई रोहीत भाई’ या गर्जनांनी अवघा मरीनलाईनचा सागर किनारा दुमदुमला होता. अबालवृद्ध, गरीब श्रीमंत, हिंदु मुस्लिम शिख इसाई सगळ्यांनीच आज आपल्यातील भेदाभेद विसरून क्रिकेटच्या या वीरांना सलामी देण्यासाठी एकच गर्दी केली होती. रोहीत शर्मा आणि संघ प्रशिक्षक राहुल द्रविड हाती तिरंगा घेऊन समस्त क्रिकेट शौकीनांची मानवंदना स्वीकारत होता. मावळणाऱ्या सुर्यासोबतच क्रिकेटमधिल भारतीय ताकदीचा नवा सुर्य वानखेडेवर उगवत होता. पुढील कित्येक दशके मर्मंबंधाच्या आठवणीत जपून ठेवण्यासाठी.
रोहित शर्माचा आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार !
भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्मासहीत चार क्रिकेटपटूंचा उद्या शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली आहे. सकाळी ६ वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा सत्कार केला आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.
