मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्यात मुंबई दौऱ्यावरयेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्त ते मुंबईत येणार आहेत. मोदींच्या दौऱ्यातून महायुती विधानसभा निवडणुकीचं रणशिंग
फुंकण्याची शक्यता आहे.

गोरेगाव मुलुंड भुयारी मार्ग हा 6300 कोटींचा प्रकल्प आहे. तर बोरिवली ठाणे भुयारी मार्ग हा 8400 कोटींचा प्रकल्प आहे. तसेच ऑरेंज गेट ते ग्रँट रोड या उन्नत मार्गाचे भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प 1170 कोटींचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असून, गोरेगाव येथील नेस्को सेंटर इथे हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी विमानतळ ते गोरेगाव पर्यंत विशेष सुरक्षा आणि मोदींच्या स्वागताची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच धक्का बसला होता. राज्यात 48 पैकी 40 प्लस 45 प्लस अशा जागांचा दावा महायुतीनं केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. 48 जागांपैकी 17 जागांवरच महायुतीचे उमेदवार विजयी झाले. बाकी 31 जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राज्यात अनेक जाहीर सभा घेतल्या होत्या. तरीदेखील जनतेनं भाजपच्या विरोधात मतदान केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. सध्या वेगानं राजकीय घडोमडी घडत आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत राज्यात महायुतीचा पराभव करायचाच आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणणार असल्याचा दावा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *