काहीतरी नवीन…
श्याम तारे
जनतेला जेव्हा पोलिसांच्या सहाय्याची गरज आणि अपेक्षा असते तेव्हा त्यांना पोलीस ठाण्याला फोन करावा लागतो आणि घटनेची माहिती द्यावी लागते. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कार्यवाही सुरु होते आणि ते घटनास्थळी पोचतात असा आपला आजवरचा अनुभव आहे. मात्र आता पोलीसंना एका प्रकारच्या आकाशवाणीनेच शहरात कुठेही घडणाऱ्या घटनेची माहिती क्षणार्धात पोचू शकेल. ही आकाशवाणी म्हणजे ‘ड्रोन’ यंत्रणा आहे. घटनेचा पहिला प्रतिसाद हीच यंत्रणा देऊ शकणार आहे आणि एका दृष्टीने पोलिसांच्या हाती हे एक उपयोगी शस्त्र ठरणार आहे. कारण पोलीस पोचण्याच्या अगोदर त्यांना घटनेची माहिती मिळू शकेल. पोलीस दलात साधारणपणे आवश्यकतेपेक्षा कमीच कर्मचारी असतात असे मानले जाते. त्यानुळे तर अशा ‘ड्रोन’ यंत्रणेची गरज आहेच.
त्या अगोदर ‘ड्रोन’ म्हणजे काय हे समजावून घेऊ या.
‘ड्रोन’ हे आकाशात भ्रमण करू शकणारे लहान किंवा मध्यम आकाराचे मानवरहित वाहन असते. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे हे वाहन स्वयंचलित असू शकते किंवा ते दूरस्थ पद्धतीने नियंत्रित केले जाऊ शकते. ‘ड्रोन’ आपली आकाश भरारी नियंत्रित रीतीने आणि सातत्याने करू शकतात. ‘ड्रोन’ मध्ये यंत्रमानव (रोबो) आणि विमानविद्या (एरोनॉटिक्स) यांचा संगम असतो. त्यांना जमिनीवरून नियंत्रित केले जाऊ शकते किंवा ते स्वयंचलित पद्धतीने नेमून दिलेले गस्त घालण्याचे काम करू शकतात.
भारतातील दक्षिणेच्या एका महानगरात शहरभर गस्त घालण्यासाठी अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित केली गेली आहे. ही यंत्रणा स्वयंचलित आहे, स्मार्ट आहे आणि कार्यक्षम सुद्धा आहे असे दिसून आले आहे. ‘ड्रोन’ च्या माध्यमातून गस्त घालण्यासाठी ‘ड्रोन’ ला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिली जाते. त्यासोबतच या यंत्रणेत कॅमेरा, उष्णता संवेदक आणि संवाद यासाठी तरतूद केलेली असते. यामुळे संदेशाची देवाण घेवाण शक्य होते. महत्वाचे म्हणजे हे सगळे तत्क्षणी होते. उदाहरण म्हणून क्रिकेट मधला झेल जगात कुठेही घेतला गेला तरी तो आपल्याला त्याच क्षणी दिसतो याचे देता येईल.
पोलिसांसाठी देशातील ही पहिली यंत्रणा महा-चेन्नई शहर पोलिसासाठी गेल्या वर्षी २९ जून २०२३ रोजी सुरु केली गेली. पोलिसांची मदतनीस म्हणून सुरु करण्यात आलेल्या या ‘ड्रोन’ यंत्रणेत सध्या काही ‘ड्रोन’ सामील केले गेले असून ते आपापल्या भागातील ५ ते १० किलोमीटर्स च्या कक्षेत आपली कामगिरी करू शकतात. एका इमारतीत या यंत्रणेचा नियंत्रण कक्ष आहे आणि प्रशिक्षित पोलीस कर्मचारी येथील काम बघत आहेत.
यामध्ये कामगिरीनुसार तीन प्रकारचे ड्रोन उपयोगात आणले जातात. यातील एक म्हणजे गस्त घालणे, दुसरा वजनी सामान उचलण्याची कामगिरी करू शकतो तर तिसरा प्रकार दूरच्या अंतरावरून गस्त घालू शकेल असा असतो. साधारण कोणत्या कामासाठी ही यंत्रणा उपयोगात आणली जाऊ शकते ते सांगताना एक अधिकारी म्हणाले की रात्रीच्या वेळी आम्हाला एखाद्या जागी काही कामगिरी करायचे असेल तर पोलीस पाठवावे लागतात आणि साहजिकच त्यांच्याकडे प्रक्स्श झोत टाकणारी साधने असावी लागतात.
यामुळे उपद्रव करणारांना दिवे बघून किंवा वाहनाचे आवाज ऐकून पळून जाणे शक्य होते. ड्रोन मुळे त्यांना अशी संधीच मिळत नाही. कारण ड्रोन संपूर्ण घटना स्थळामधील लहान सहान वस्तूही बघू आणि कळवू शकतो. खरे तर पोलिसांना आवश्यक असलेली सगळी माहिती मिळत असल्याने एकाकी जागांवर अधिक सजगपणे लक्ष ठेवले जाऊ शकते. पोलिसांकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे एक महत्वाचे काम असते आणि अशा वेळी काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून संपूर्ण मैदानावर लक्ष ठेवावे लागते. हे काम तर ड्रोन अतिशय उत्तम रीतीने करू शकतात.
प्रसन्न फीचर्स
