अशोक गायकवाड

 

 

रायगड : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एक रुपयात विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली आहे.
खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिक नुकसानीला आर्थिक संरक्षण होण्यासाठी प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ असुन त्याअनुषंगाने शासनचे पिकविमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरु केले आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.खरीप हंगामास सुरुवात झाली असुन या विमा योजनेत भात, नाचणी आदी पिके समाविष्ट आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पिक पाहणी मध्ये करावी. या वर्षी भात पिकामध्ये महसुल मंडळ मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमांट सेंसीग तंत्रज्ञानाचा वापर करुन येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपुर्वी / लावणीपुर्वी नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान यासाठी विमा संरक्षण असणार आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस आधी संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड व पिक पेरणीचे स्वयंघोषणा पत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfy.gov.in या पोर्टलच्या सहाय्याने योजनेत सहभाग घेऊ शकता.पिक विमा अर्ज भरताना शेतकरी यांच्या कडून १ रु. प्रति अर्ज याशिवाय सेंटर कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. असे आढळल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधुन आपली तक्रार नोंद करावी.
टोल फ्री क्र.१४५९९/१४४४७, तक्रार नोंद क्र.०११- ४९७५४९२३/०११- ४९७५४९२४, व्हॉटस्ॲप क्र. ९०८२६९८१४२ योजनेच्या अधिक माहितीसाठी स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वंदना शिंदे यांनी कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *