११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

स्वाती घोसाळकर

मुंबई   : आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा ट्रेलर म्हणून ज्या विधानपरिषदेच्या निवडणूकीकडे पाहिले जात आहे तेथे आता आरपारकी लढाई होणार हे आज स्पष्ट झाले. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी शुक्रवार, ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या  दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. एकूण ११ जागांसाठी आता १२ उमेदवार रिंगणात राहिल्याने १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या १२ जागांसाठी आमदार निवडणुकीत गुप्तपध्दतीने मतदान करतात, अशा स्थितीत घोडेबाजार  आणि क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते.

शिवसेनेचे ठाकरे गटाचे  उमेदवार मिलिंद नार्वेकर किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार समर्थक उमेदवार जयंत पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीकडून नऊ आणि विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीकडून, तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि परिणय फुके यांना तिकीट दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली  आहे, तर शिवसेनेने युबीटी मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांनी विद्यमान विधान परिषद सदस्य आणि शेतकरी आणि कामगार पक्षाचे (पीडब्ल्यूडी) नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *