हाथरस : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरस पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. अलीगढ येथील पिलखाना येथे हाथरस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी राहुल गांधी पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दुर्घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही राहुल गांधी म्हणाले. मंगळवारी हाथरस येथे भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात १२१ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
राहुल गांधी यांचा ताफा सकाळी साडेसात वाजता पिलखान्यात पोहोचला. त्यानंतर राहुल गांधी यांनी हाथरसच्या फुलरई येथे सत्संग कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेत प्रशासनाची उणीव जाणवली आहे तसेच अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. यासोबत काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी आहे आम्ही तुम्हाला मदत करु असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
