अनिल ठाणेकर
ठाणे : अर्थसंकल्पावर भाष्य करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आणि मल प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून ठाणेकरांच्या पैशांची लूट होत असल्याचा आरोप त्यांनी पुराव्यानिशी करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
ठाणे महापालिकेत पाणी पुरवठा विभागात जलकुंभ परिचलनासाठी ५१३ कंत्राटी कर्मचारी, पिसे टेमघर प्रकल्पात १२६ तसेच पंपिंग मशिनरी, डेटा ऑपरेटिंग, जलवाहिनी देखभाल आदी कामांसाठी अनेक कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना किमान ३१ हजार रुपये मासिक पगार अपेक्षित असताना त्यांना १२ ते १५ हजार रुपये पगार दिला जात आहे. गेली पाच वर्षे ही लूट सुरू असून गेली दहा वर्षे त्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कमही संबंधित कंत्राटदारांनी भरलेली नाही. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार होत असून नगर विकास विभागाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. कोपरी विभागात पीपीपी तत्त्वावर मलप्रक्रिया केंद्राला २०१९ साली ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीने व्ही.ए.टेक या कंपनीला मंजुरी दिली. मात्र प्रत्यक्ष बिल मात्र कोपरी बायो टेक या नावाने देण्यात आले. देखभाल दुरुस्तीचे काडीमात्र काम झाले नसताना खोटी देयके देण्यात आली. विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांचे आदेश नसताना दोन कोटींचे बिल अदा करण्यात आले. विनाकामाचा पैसा ठाणेकरांच्या कररुपी पैशातून लुटला जात असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. याकामी जन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी केला. अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही केळकर यांनी उपस्थित केला. आजही ठाण्यात अनधिकृत बांधकामे सुरू असून अधिकाऱ्यांकडून प्रती चौरस फूट दराने पैसे घेतले जात असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. अनधिकृत इमारतींच्या बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्याने अशा इमारती कोसळून माणसे मरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अधिकाऱ्यांवर आणि बांधकामधारकांवर कारवाई करण्यात येत नसल्याचे केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याचबरोबर केळकर यांनी धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे हक्क, फेरीवाला धोरण, वृक्ष छाटणी, वेदर शेड आदी मुद्दे मांडले. तसेच कोलशेत येथील मुख्य नाल्यासह इतर नाल्यांच्या बांधणीसाठी निधी देण्याची मागणीही केली. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. दर महिन्याला मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होत आहेत. महापालिकेतील सर्वच विभागांत ५० टक्के पदे रिक्त असल्याने कामांमध्ये दिरंगाई होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याची मागणी संजय केळकर यांनी केली.
