माथेरान : माथेरान मध्ये सर्वांसाठी ई रिक्षाच्या माध्यमातून अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे.अनेक आव्हानांचा सामना करत,त्याचप्रमाणे काही लोकांचा वेळप्रसंगी विरोध पत्करून कोणत्याही परिस्थितीत माथेरानला विकासाकडे नेण्यासाठी ई रिक्षाच्या सुविधेला समस्त ई रिक्षा समर्थकांनी, ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्यामुळे आज सर्वजण या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा सहकुटुंब लाभ घेताना दिसत आहेत. परंतु पेमास्टर पार्क विभागात दूरवर राहणाऱ्या माळी कामगारांना या सेवेचा लाभ मिळत नाही. सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत तेथील रहिवाशांना ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे मग आमच्या पेमास्टर पार्क विभागातील भूमिपुत्रांना ही सेवा का पुरविली जात नाही. त्यासाठी पेमास्टर पार्क पर्यंत ई रिक्षा सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी तेथील रहिवाशांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना तीन वेळा लेखी निवेदने देऊनही आजपर्यंत काहीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे संतप्त रहिवाशांनी पुन्हा एकदा भर पावसात येऊन लेखी निवेदन सादर केले आहे.यावेळी शैलेंद्र दळवी, भालचंद्र सावंत, स्वाती कुमार, उषा पांगसे, प्राजक्ता सनगरे, राजश्री दळवी, रिया दळवी, लीला शिंदे, सुनीता दाभेकर,संगीता जाबरे, अनिता मोरे, गीता रांजणे, नंदकिशोर सनगरे, निलेश मढये, राकेश मालुसरे, पपू पारधी आदी उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार ई रिक्षा माथेरान शहरात कुठेही जाऊ शकते.परंतु सनियंत्रण समितीच्या सब कमिटीने ह्याबाबत ई रिक्षाची मार्गिका निश्चित केलेली नाही.पर्यटक आणि नागरिक यांची मागणी लक्षात घेता दूरवर वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांना, माळी कामगारांना ही सेवा मिळणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे रात्री अपरात्री सुध्दा नागरिक आणि पर्यटक दस्तुरी नाक्यावरून गावात येत असतात.मध्यंतरी दस्तुरी भागात बिबट्याचा वावर असल्याबाबत वनखात्याने सूचित केले होते त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत ई रिक्षाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी सुध्दा जोर धरू लागली आहे.
