जग झपाट्याने बदलत आहे. आता पती-पत्नी दोघेही काम करत आहेत आणि आपले जीवन आरामात जगत आहेत; परंतु कधीकधी असेदेखील घडते की, पती पत्नीवर दबाव आणू लागतात. बायका नोकरी सोडतात आणि अशा परिस्थितीत त्यांचे नाते बिघडू लागते. अशाच एका प्रकरणाची चर्चा झाली.
एका महिलेने दावा केला की, तिच्या पतीने तिला नोकरी सोडून गृहिणी होण्यास सांगितले. ती त्याला तयार झाली; परंतु त्यासाठी तिने पतीसमोर अनोखी अट ठेवली. महिलेने सांगितले की, पतीने नोकरी सोडून घरी राहून घर आणि मुलांची काळजी घेण्यास सांगितले, तेव्हा तिने त्याच्याकडे कंपनीतील अर्धा हिस्सा मागितला. त्याला मी गृहिणी बनावे असे वाटत असेल तर त्याच्या कंपनीचा अर्धा भाग द्यावा.
ती आणि तिचा पती दोघेही 35 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. सध्या त्यांना दोन मुले असून ती महिला तिसऱ्या मुलालाही जन्म देणार आहे. महिलेच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. काहींनी महिलेची मागणी पूर्णपणे न्याय्य असल्याचे सांगितले, तर काहींनी तिच्यावर आरोपही केले. मात्र नंतर महिलेने असेही सांगितले की, तिच्या पतीने मागणी मान्य केली असून कंपनीतील तिला 49 टक्के हिस्सा दिला आहे.
विमानापेक्षा बैलगाडीने जाईन!
अनेक वेळा विमान कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आणि खाद्यपदार्थ प्रवाशांचे लक्ष्य बनतात. असाच काहीसा प्रकार टाटा समूहाच्या ‌‘एअर इंडिया‌’च्या बाबतीत घडला आहे. एका युजरने ‌‘सोशल मीडिया‌’च्या माध्यमातून एअर इंडियाच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि अस्वच्छतेकडे बोट दाखवले आहे. भविष्यात मी बैलगाडीतून प्रवास करेन; पण एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही, असे त्याने रागाने सांगितले. विमानाच्या आसनावर डाग आणि दुर्गंधी होती. पुण्यातील लेखक आदित्य कोंडावार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले, की ते नुकतेच ‌‘एअर इंडिया‌’च्या विमानाने बेंगळुरूहून पुण्याला आले. या काळात त्यांचा अनुभव खूपच वाईट होता. आसनावर डाग होते आणि फ्लाइटमध्ये एक विचित्र वास येत होता. तसेच विमानाला तीन तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. ते म्हणाले, की मी कधीही एअर इंडिया कवा एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवास करणार नाही. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, की तुम्ही मला खूप महत्त्वाचा धडा शिकवला आहे. भविष्यात मी एअर इंडिया ग्रुपच्या कोणत्याही फ्लाइटमधून जाणार नाही. शंभर टक्के जास्त पैसे द्यायलाही तयार आहे; पण मला वेळेवर उड्डाण करणाऱ्या विमाननेच जायचे आहे. गरज पडल्यास मी बैलगाडीनेही प्रवास करेन; पण एअर इंडियाने जाणार नाही.
या घटनेनंतर ‌‘एअर इंडिया एक्सप्रेस‌’ने त्यांची माफी मागितली आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे लिहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *