वरळी हिट अँड रन प्रकरण :
मुंबई : मुंबईतील वरळीच्या परिसरात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली होती. या भीषण अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते. मात्र, या प्रकरणानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. यानंतर राजेश शाह यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मिहीर शाह याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह याने पलायन केलं होतं. रविवारपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी मिहीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबरोबरच आरोपी मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणांनीही मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.
दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईमधील वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा होता. दरम्यान, हा अपघात घडला त्यावेळी मिहीर शाह याने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती समोर आली होती. यानंतर मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप आहे.
00000
