उल्हासनगर शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात
सुनिल इंगळे
उल्हासनगर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिक बनवणाऱ्या कारखाने आणि त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर उल्हासनगर मनपा प्रशासन, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. प्लास्टिकमुळे ठिकठिकाणी नाले तुंबलेले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे दिसून येत आहे .
उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्मिती केली जात असून त्याची विक्रीही खुलेआमपणे केली जात आहे या संदर्भात शहरातील अनेक सामाजिक संघटनांच्या मनपा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उल्हासनगर मनपा आयुक्त अजीज शेख, आयुक्त यांच्या मार्गदर्शखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, तसेच प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख व प्रदूषण मंडळाचे अधिकारी सीमा दळवी व राजेश नदगावकर यांच्या सयुक्त विद्यमानाने उल्हासनगर शहरात कॅम्प नं. 02 व कॅम्प नं. 03 मधील पेलूमल कंपाऊंड येथील एकल प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेऊन मंगळवारी अचानक पणे धाड टाकून कारवाई करण्यात आली.
या कारवाई दरम्यान सदर कंपन्यांचा 365 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून 10,000 रु. दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदार व अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध 5000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे.
पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक पिशव्या अडकून तुंबण्याच्या घटना शहरात होत आहेत या संदर्भात मनपा आयुक्त अजीज शेख आयुक्त यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुषगाने स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्या अस्वच्छता करणाऱ्या 251 व्यक्तींविरुद्ध 98, 550/- व एकल प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्री करणाऱ्या विक्रीते विरुद्ध 55000 हजार रु. व 502 kg जप्ती 10 व्यक्तींविरुद्ध एकूण 1,48,550 /- रु. दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे .
शहरातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, नाले यांची विषेश सफाई व स्वच्छता करुन नागरीकांना स्वच्छतेबाबत संदेश देवुन जनजागृती केली जात आहे. नागरीकांना शिस्त लागावी या करीता अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरीकांना सूचना/नोटीसा देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या आशा नागरिकांविरुद्ध ही कार्यवाही सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांनी दिली आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
०००००
