अनिल ठाणेकर
ठाणे : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत. मह्मुंयुती सरकारकडून मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी १०५ कोटीचा निधी दिलाआहे.. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले, असा रोखठोक संवाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला.
शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषद ११ जागांसाठी महायुतीचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी होतील आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी होतील. महविकास आघाडीच्या तीन पैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असून शिवसेना (उबाठा) चे मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने ते विजयी होऊ शकतात. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होईल आणि हा पराभब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचा असेल. महायुतीच्या आमदारांची एकजूट पक्की आहे त्यामुळे घोडे बाजार होणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. भाजपाचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. महायुतीचे उमेदवार अधिकची मते मिळवून विजयी होतील, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत.२०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून ? २०१९ साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचे का ? बेसलेस आरोपांना मी काही फारसे महत्त्व देत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे फार लक्ष देऊ नये. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये स्वतःला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला २८८ उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा कळव्यातून तिकीट मागत नाही ना ? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे. काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने डॉ. जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. मी स्वतः पुढाकार घेऊन आव्हाड यांची भेट अजितदादा पवार यांच्याबरोबर करून द्यायला तयार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५५ कोटी रुपयांचा विकास निधी आला आहे. आव्हाड यांच्या सोबतच्या अनेक नगरसेवकांनी हा निधी घेतलेला आहे. आता पुन्हा ५० कोटीचा विकास निधी आलेला आहे. मी, नजीब मुल्ला आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार 50 कोटीचा विकास निधी आला आहे व तो खऱ्या विकासासाठी निधी वापरला जाईल. त्यामुळे निधी मिळाला नाही असं आव्हाड धादांत खोटे बोलत आहेत. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत १०५ कोटी रुपये मुंब्रा-कळव्या साठी निधी आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली.
अजितदादा यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धीविनायकाकडे साकडे घातले. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल याची खात्री आहे. महायुतीत कोणतेही मतभेद नाही. समन्वयाने सर्व निर्णय होतील. राजकीय प्रगल्भता असली पाहिजे. अनेक बहिणींना मदतीचा हात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळणार आहे. वैयक्तिक भाऊ बहीण या नात्याबद्दल बोलणे टाळले पाहिजे. महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले आहे, असेही प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
