अनिल ठाणेकर
ठाणे : एकीकडे राज्यात ड्रग्ज व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश येत असताना ठाण्यातील कोठारी कम्पाउंडमधील अनधिकृत बार, हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथील स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात 293 प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले. ड्रग्स, पब्स, हुक्का पार्लर, रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारे बार, दारूची दुकाने, ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नत्ती, फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्या, जुन्या विहिरी आदी विविध विषय श्री.केळकर यांनी उपस्थित केले. ठाण्यात पानपट्टी, टपऱ्या आणि दुकानांतूनही एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनयुक्त पेये विकली जातात, ड्रग्ज विकले जाते. यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होत आहे. शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार, डान्स बार, हुक्का पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून त्यावर या आधी कारवाई करण्यात आली, परंतु ते आता पुन्हा लपून छपून सुरू आहेत. हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ आम्ही सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. शहरातील कोठारी कम्पाउंडमध्ये आजही हे अवैध व्यवसाय सुरू आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी कारवाई करण्यात आली, पण कोठारी कम्पाउंडमध्ये कारवाई करण्यात आली नाही. कारवाईबाबत दूजाभाव दाखवण्यात येत असल्याचा आरोप आ.केळकर यांनी केला. या प्रकरणी स्थानिक चितळसर पोलीस ठाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. शहरात वाइन शॉपला रात्री साडे दहा पर्यंत विक्री करण्याची मुभा आहे, परंतु अनेक शॉप हे रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असतात. तर काही हॉटेलमध्ये देखील बेकायदेशीरपणे वाइन शॉप चालवले जात आहेत. आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यावर कारवाई होत नसल्याचे श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. हुक्का पार्लर, बार, वाइन शॉप अशा अवैध व्यवसायांवर ठोस कारवाया होत नसल्याने ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही श्री.केळकर यांनी केला.
०००००