मुंबई : काँग्रेसच्या सात आमदारांनी गद्दारी केल्याने मविआचे उमेदवार ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निव़डणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. त्यात भाजपाचे पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. माविआच्या काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले.

महायुतीतील भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या भावना गवळी (२४ मते) आणि कृपाल तुमाने (२५ मते) यांचा विजय झाला. शिवसेनेकडे ४६ मते होती. त्यात आणखी ३ मते शिवसेना उमेदवारांना मिळाली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना २३ मते आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते पक्की होती. त्यात त्यांना ५ अतिरिक्त मते मिळाली.
काँग्रेसकडे ३२ मते होती. त्यातील २५ मते प्रज्ञा सातव यांना मिळाली. काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते फुटल्याचा संशय आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. ठाकरे सेनेचे मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात २३ मतांसह नार्वेकर यांचा विजय झाला तर जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे उबाठाचे नार्वेकर हे दुसऱ्या पंसतीच्या मतांनी निवडून आले आहेत.

पंकजा मुंडे जिंकल्या

मुंबई : मराठा आरक्षण, भाजपामधिल अंतर्गत राजकारण आणि सतत डावलले जात असल्यामुळे जाहिरपणे व्यक्त होणारी नाराजी या सगळ्या पार्श्वभुमीवर अखेर भाजपा नेत्या पंकजा मुंडे विधान परिषदेची निवडणूक जिंकल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल ५ वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, २०१४च्या मोदी लाटेत विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत नवख्या बजरंग यांच्याकडून पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता. आज निवडणूकीत दगाफटका झाला असता तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभे राहीले असते.

पंकजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचं कुटुंब विधानभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना २६ मतं मिळाली.

गद्दारांसाठी ट्रॅप लावला, आता माफी नाही- पटोले

मुंबई : आम्ही या निवडणुकीत संशयित गद्दार काँग्रेस आमदारांसाठी ट्रॅप लावलेला होता. जे कुणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना माफी नाही, त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली जाईल”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसमधील सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे महायुतीचे सर्व आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसची सात मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडील मतांचा कोटा पाहता प्रत्येक पक्षाने प्रत्येकी १ असे एकूण केवळ ३ उमेदवार दिले होते. पण या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटल्यामुळे शरद पवार गटाचा पराभव झाला आहे.

विधानपरिषद निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी

महायुतीचे उमेदवार

भाजपा

पंकजा मुंडे – २६ (विजयी)

परिणय फुके – २६ (विजयी)

योगेश टिळेकर – २६ (विजयी)

अमित गोरखे – २६ (विजयी)

सदाभाऊ खोत – २६ (विजयी)

शिवसेना एकनाथ शिंदे गट

भावना गवळी – २४ (विजयी)

कृपाल तुमाने – २५ (विजयी)

राष्ट्रवादी अजित पवार गट

राजेश विटेकर – २३ (विजयी)

शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)

 

महाविकास आघाडीचे उमेदवार

काँग्रेस

प्रज्ञा सातव – २५ (विजयी)

शिवसेना उद्धव ठाकरे गट

मिलिंद नार्वेकर – २४ (विजयी)

राष्ट्रवादी शरद पवार गट

जयंत पाटील(शेकाप) – १२ (पराभूत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *