ठाणे : खारटन रोडवरील लफाट चाळ धोकादायक झाल्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर राबोडी येथील गोदावरी सदन व रुस्तमजी कावेरी या इमारतीत करण्यात आले आहे. परंतु सद्यस्थितीत या कुटुंबियांना महापालिकेने घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्याने या कुटुंबियांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. लफाट चाळीचा पुनर्विकास होईपर्यत सद्यस्थितीत ही कुटुंबे ज्या ठिकाणी राहत आहेत ती घरे रिकामी करु नयेत तसेच लफाट चाळीचा पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा असे लेखी पत्र खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खारटन रोड येथे 1965 पासून अस्तित्वात असलेली लफाट धोकादायक झाल्यामुळे या ठिकाणी नागरी सहभागातून संबंधितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय मा. महासभेने घेतला आहे. त्यानुसार येथील नागरिकांचे तात्पुरत्या स्वरुपात राबोडी येथील गोदावरी सदन व रुस्तमजी कावेरी या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात संबंधित नागरिकांना महापालिकेकडून नोटीस देवून ते राहत असलेली घरे खाली करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित नागरिकांच्या विनंतीनुसार माजी उपमहापौर पल्लवी कदम यांनी या कुटुंबियांना पुनर्विकास इमारतीचे काम पूर्ण होईपर्यत दुसरीकडे स्थलांतरीत करु नये अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. त्यानुसार खासदार म्हस्के यांनी आयुक्तांना लेखी पत्र देवून सदर प्रकरणी तात्काळ लक्ष घालण्याबाबत कळविले आहे.
तथापि,लफाट चाळ येथील 60 कुटुंबियांचा स्थलांतरचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे पुनर्विकासाच्या कामास विलंब होत आहे. या 60 कुटुंबापैकी आज बंगाली मुखत्यार सौदे यांचे पुनर्वसन झाले असून खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते त्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली. उर्वरित कुटुंबाचे स्थलांतर लवकरच करुन पुनर्विकासाच्या कामास चालना द्यावी असेही खासदार यांनी नमूद केले.
00000