अशोक गायकवाड
रायगड : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’योजनेची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निर्मला कुचिक,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे,जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी, अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी या योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच ग्रामपंचायत तसेच शहरांमध्ये योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी. संपूर्ण जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर, जिंगलद्वारे प्रचार व प्रसार करावा.प्रत्येक शनिवार चावडी वाचनचे आयोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ साठी ‘नारी शक्तिदूत’ अॅपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेचे नाव, जन्म दिनांक, संपूर्ण पत्ता आदी माहिती ‘आधारकार्ड’ नुसारच भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नारी शक्तिदूत’ अॅपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधारकार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे. आधारकार्डवरील जन्म दिनांक अॅपमध्ये नोंदवावा. आधारकार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरून जन्मदिनांक घेण्यात यावा. आधारकार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतत भरावी, अशी सूचना करण्यात आली आहे. आधारकार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असावे. तसेच बँक खाते आधारशी संलग्न असावे. गावपातळीवर ऑफलाइन अर्ज
नारी शक्तिदूत अॅपद्वारे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, गावपातळीवर अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत. दुसरीकडे, अर्ज भरण्यासाठी गर्दी वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर ऑफलाइन पद्धतीने पात्र लाभाथ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये वॉर्डनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी मिळणार प्रोत्साहन भत्ता ‘गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी, सेतू केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन अर्ज पूर्ण भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी, सेतू केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांना प्रतिअर्ज ५० रुपयांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता सरकारतर्फे देण्यात येणार आहे,’ असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी सांगितले.
00000