काहीतरी नवीन…
श्याम तारे
आजच्या आपल्या सुशिक्षित आणि सुधारलेल्या जगात पुस्तके धोकादायक समजली जात नाहीत हे आपले नशीबच म्हणायला हवे. पण आज असे आढळले आहे की काही पुस्तकांमध्ये काही इतके धोकादायक घटक असतात की ही पुस्तके सार्वजनिक ग्रंथालयात, पुस्तकांच्या दुकानात किंवा चक्क आपल्या घरातही ठेवू नये इतकी घातक असतात.
अमेरिकेतील विंटर्थर संग्रहालय आणि ग्रंथालय तसेच डेलावेअर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विषारी पुस्तक प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे आणि या प्रकल्पात अशा पुस्तकांची एक सूची तयार केली जात आहे. अशा पुस्तकांमध्ये काय लिहिले आहे किंवा कोणत्या प्रकारचा मजकूर आहे याच्याशी प्रकल्पाचा संबंध नसून या पुस्तकांच्या भौतिक घटकांशी म्हणजे मुख्यत्वेकरून मुखपृष्ठांवरील रंगांशी त्याचा संबंध आहे.
फ्रेंच राष्ट्रीय ग्रंथालयातील दोन पुस्तके एका कारणासाठी बाहेर काढली गेली. कारण होते ते असे की या दोन्ही पुस्तकांची चमकदार मुखपृष्ठे हिरव्या कापडाची होती आणि त्यात ‘आर्सेनिक’ हा विषारी पदार्थ असल्याचा संशय होता. संशय मनात येण्याचे कारण देखील तसेच होते. जुन्या काळातील पुस्तकबांधणीच्या उद्योगात याचे मूळ होते. १९व्या शतकात पुस्तके मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागली आणि त्यामुळे पुस्तक बांधणीसाठी खर्चिक असे चामडी बांधणीचे आवरण उपयोगात आणण्याऐवजी या काळात परवडेल अशी कापडी बांधणी केली जाऊ लागली. वाचकांना आकर्षित करण्यासाठी ही कापडी बांधणी चमकदार अशा रंगांची असायची.
हिरवा, पिवळा आणि लाल हे यातील अधिक लोकप्रिय रंग होते. एक रंग होता तो शील यांचा हिरवा म्हाणून ओळखला जायचा. कार्ल विल्हेल्म शील हे जर्मन स्वीडिश रसायन तज्ञ होते आणि त्यांनी इसवी सन १७७५ च्या दरम्यान तांबे आणि आर्सेनिक यापासून हा हिरवा रंग तयार केला होता. हा रंग केवळ उत्पादन करायला स्वस्त होता म्हणून नव्हे तर हा रंग यापूर्वीच्या शतकभरात वापरल्या जाणाऱ्या कॉपर कार्बोनेटच्या हिरव्या रंगापेक्षा अधिक चमकदार होता.
शील यांनी तयार केलेला हा हिरवा रंग काही काळातच बाजारातून दूर झाला याचे एक कारण त्याचा विषारीपणा हे होते. याउलट याच वेळी शील यांनी तयार केलेले इतर रंग मात्र टिकावू होते आणि त्यामुळे त्यांचा वापर सुरु झाला. मात्र दरम्यानच्या काळात ज्या पुस्तकांना आर्सेनिक असलेल्या सुरुवातीच्या हिरव्या रंगाची कापडी आवरणे होती ती पुस्तके मात्र विषारी ठरली. इतकेच नव्हे तर या रंगाचे विघटन अतिशय लवकर होत असे आणि त्यामधून विषारी आर्सेनिकचा प्रसार होत असे. उत्सवाच्या वेळी मुले हिरव्या रंगाच्या मेणबत्त्या पेटवीत असत आणि त्यांच्या धुरामुळे मुलांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. दागिन्यांना असा हिरवा रंग देणाऱ्या कामगारांना हिरव्या रंगाच्या उलट्या सुरु झाल्या होत्या. एकूणच चक्क पेहरावाच्या कपड्यांपासून हिरवा रंग जणू बाद झाला होता.
आर्सेनिक हे विषच नेपोलियनचा घात करणारे होते असे दिसून आले. त्याला हिरवा रंग अतिशय प्रिय होता. पण हिरवाच कशाला लाल रंग देखील मर्क्युरी सल्फाईड या पाऱ्याच्या संयुगातून तयार झाला आहे. काही हजार वर्षी हा रंग जगभर चालला आणि आता त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. पुस्तकांच्या आतील मुखपृष्ठाच्या भागावर लाल रंगकाम करणारे कलाकार विषबाधेने ग्रस्त झाले होते. पिवळ्या रंगातील लेड क्रोमेट हा घटक व्हिन्सेंट व्हॅन गॉग या चित्रकाराचा आवडता रंग होता असे मानले जाते. त्यांनी सूर्यफुलाच्या चित्रात याचा उपयोग केलेला दिसतो. याच लेड क्रोमेट घटकामुळे अनेक नवे रंग तयार होऊ शकले.
जस्त आणि क्रोमियम हे दोन्हीही विषारी आहेतच परंतु पुस्कांसाठी पिवळ्या रंगाचा वापर फारसा धोकादायक नसतो असे मानले जाते याचे कारण असे की लेड क्रोमेट का घटक सहजपणे पाण्यात विरघळत नाही आणि तो शोषून घ्यायलाही कठीण आहे.
मग हिरव्या रंगाचे मुखपृष्ठ असलेली पुस्तके हातातच घ्यायची नाहीत का? तर असे नाही. आज या बाबतीत भरपूर संशोधन झाले आहे आणि रंग हे त्या मानाने कमी घातक आणि विषारी केले गेले आहेत. केवळ १९व्या शतकातील पुस्तकांचा आपण अभ्यास करणार असाल किंवा अशी पुस्तके हाताळणार असाल तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हिरव्या मुखपृष्ठाचे फारच जुने पुस्तक हाताळायचे असेल तर हातमोजे घालावेत आणि काम झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत असे सांगितले गेले आहे.
पुस्तकांच्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पात आणखी जी माहिती दिली गेली आहे ती अशी की ‘आर्सेनिक’ ची लागण असलेल्या अशा एकूण २३८ आवृत्या जगभर आढळून आल्या आहेत. भारतात त्यापैकी एखादी देखील नसावी अशे अपेक्षा करावी आणि ‘आपले राखावे, दुसऱ्याला यश द्यावे यानुसार वागावे… आणखी काय…
प्रसन्न फीचर्स
