रमेश औताडे
मुंबई :
चायना देश पिन ते पियानो सारख्या वस्तू बनवतो. मात्र त्याचे मार्केटिंग करण्यात कुठेच कमी पडत नाही. म्हणून त्यांच्या वस्तू माफक दरात व सहज उपलब्ध होतात. आपण मराठी माणूस मार्केटिंग करताना लपून छपून करतो त्यामुळे आपले व्यवसाय मागे पडतात. मराठी माणसाचे उद्योग व्यवसाय कसे जगभर पोहचतील यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या ४४ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या संस्थेने एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर यांनी शुक्रवारी दिली.
गेल्या ४४ वर्षापासून मराठी मातृभाषा असणाऱ्या माणसाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी चेंबर सहकार्य करत आहे. संस्थेतर्फे १८ जुलै रोजी १३ महिन्याचा अभ्यासक्रम फक्त ३५०० रुपयात शिकवला जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी प्रत्येकी तीन तासांचे एक सत्र आयोजित केले जाणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर स्मारक सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे एकूण ३९ तासांचे मार्गदर्शन होईल.पहिल्या तुकडीत फक्त १०० जणांना प्रवेश मिळतील असे मनोहर पेडणेकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, मराठी माणसाने साता समुद्रापार उद्योग व्यवसायाचा झेंडा रोवला आहे. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने नाममात्र दरात मराठी माणसाला उद्योग व्यवसाय करण्याची खूप चांगली संधी दिली आहे. प्रत्येक वेळी भांडवल नाही असे म्हणून मराठी माणूस नाराज होतो. मात्र आहे त्या भांडवलात किंव्हा भांडवल नसतानाही व्यवसाय कसा करायचा यासाठी या कार्यशाळेचा मराठी माणसाला लाभ होणार आहे.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विवेक गद्रे, स्वप्नील राणे, निलेश कारंजे, राजन चौलकर, महेश बापट,मेहुल माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
000000
