आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश !
अनिल ठाणेकर
मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
विधानसभेमध्ये आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा केली, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विधानभवनमध्ये मुख्यमंत्री श्री शिंदे व आमदार श्री केळकर यांचा सत्कार करण्यात आला. विधानसभेत केलेल्या घोषणेप्रमाणे हे कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वीत करावे अशी मागणी करण्यात आली. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण अनेक दिवस मागणी करत आहात.आमदार श्री केळकर यांनी अनेकदा हा प्रश्न विधानसभेत मांडला आहे.लवकरच अगदी विधानसभा निवडणूक पूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करु. आमदार संजय केळकर यांनी यावेळी सांगितले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना या ही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे वृत्तपत्रे विक्री त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी करण्यात येत आहे.आपण अधिवेशनात याबाबत घोषणा केली आहे. तरी आपण केलेल्या घोषणेची पुर्तता करावी. वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करावे. श्री पाटणकर यांनी सांगितले, अभ्यास समितीने सुचवल्या प्रमाणे, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात, शिष्यवृत्ती मिळावी, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात सवलती मेळाव्यात, वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी आरोग्याच्या खर्चाबाबत मदत मिळावी, उतार वयात वृत्तपत्र विक्रेत्यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळावी, वृत्तपत्र विक्रेत्यांना घरबांधणीसाठी जागा व निधी मिळावा यासह विविध योजनांचा सहभाग वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या मार्फत करावा. तशी शिफारस संघटनेने अभ्यास समितीच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे. सरकारने या अभ्यास समितीच्या अहवालाचा स्वीकार करून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी तात्काळ स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे. कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांची स्थिती व कल्याणकारी मंडळाची गरज याबाबत निवेदन देण्यात केले.
00000