स्वाती घोसाळकर

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणूकीतील मतदानावेळी पक्षाचा आदेश जुगारून गद्दारी करणाऱ्या क्राँग्रेसच्या ८ आमदांचा फैसला येत्या १९ जुलैला होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या यादिवशी होणार आहे. या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याचे सुत्रांची माहिती आहे.

नियोजित कार्यक्रमानुसार ही बैठक जागा वाटपाचा संदर्भातली निर्णय घेण्यासाठी होती. पण त्याचसोबत गद्दारांच्या निकाल या बैठकीत लावला जाणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे पक्षाने फ्रंट फुटवर आक्रमकपणे खेळावे अशी राज्यातील वरिष्ठ नेत्यांची मागणी असल्याचे या सुत्रांनी सांगितले.

या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणणीती आखली जाणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटली. यापैकी काही आमदारांनी भाजपला तर काहींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

फुटलेल्या आमदारांवर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल. विधानपरिषद निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहे. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे.आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *