माथेरान : उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखासकरून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील क्षीण अन थकवा दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानला पसंती देतात.त्यासाठी आपल्या मुलाबाळांना,घरातील वयस्कर मंडळींना सोबत घेऊन लवाजम्यासह येत असतात. परंतु येथील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पार्किंग साठी जागा उपलब्ध नसल्याने घाटरस्त्यात मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने तासनतास पर्यटकांना मोटार गाडीतच अडकून राहावे लागत आहे.त्यातच पावसाळ्यात हा केवळ सात किलोमीटरचा वीस मिनिटांचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे वेळप्रसंगी तीन ते चार तासाचा बनला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रशासन या वाहतूक कोंडीचे दुष्टचक्र केव्हा दूर करणार या विवंचनेत पर्यटक दिसत आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माथेरान मध्ये सद्यस्थितीत दस्तुरी नाक्यापासून ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत ई रिक्षाची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे हे नाकारताच येत नाही.आबालवृद्ध पर्यटकांना याच माध्यमातून सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास करणे अगदी सहज शक्य झाले आहे त्यामुळेच वयस्कर मंडळी सुध्दा आवर्जून इकडे यायला उत्सुक दिसत आहेत.
अनेक वर्षांपासून दस्तुरी पार्किंग येथील एमपी ९३ हा प्लॉट रिक्त असून तो अद्यापही नगरपरिषदेच्या अखत्यारीत आलेला नाही. हा प्लॉट उपलब्ध होण्यासाठी खऱ्या अर्थाने तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून पार्किंग साठी उपलब्ध करून दिल्यास पार्किंगची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे.त्यामुळे साहजिकच आजतागायत होत असणारी नेरळ माथेरान घाटरस्त्यातील वाहतूक कोंडी आपसूकच दूर होणार आहे.याकामी स्थानिक पातळीवरील आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी राजकीय श्रेयवाद बाजूला सारून व्होट बँकेचा विचार न करता एकोप्याने हा प्रश्न मार्गी लागू शकतो असे स्थानिक बोलत आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *