कॅम्लिनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई : कॅम्लिन ब्रँडची निर्मिती करून चित्रकलेच्या जगतात रंगांची अनोखी उधळण करणारे `कॅम्लिन फाईन सायन्सेस`चे संस्थापक व `कोकुयो कॅम्लिन`चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अबाल वृध्दांच्या आयुष्यात आपल्या कॅम्लिन ब्रँडच्या माध्यमातून रंगांची जादू पेरणाऱ्या दांडेकरांच्या जाण्याने आज त्यांच्या सप्तरंगी आयुष्याचा कधीही न पुसला जाणारा अवघा रंगची एक झाला.

दांडेकर यांच्या पश्चात त्यांच्या मागे मुलगा आशिष व मुलगी अनघा असा परिवार आहे.सुभाष दांडेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दांडेकर परिवारातील सदस्य, `कॅम्लिन` समुहातील कर्मचारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते. सामाजिक भान, कलेची जाण व उद्यमशीलता अंगी बाळगणा-या सुभाष दांडेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. सुभाष दांडेकर यांच्या सामाजिक दायित्त्वाच्या भूमिकेमुळे ते शुश्रुषा सिटिझन्स को-ऑप रुग्णालयाशी जोडले गेले. विविध सामाजिक संस्था तसेच `सिकाॅम`सारख्या अनेक उद्योग संघटनांचे ते मार्गदर्शक बनले. `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री`चे ते माजी अध्यक्ष होते. संबंधित क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र”, “लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” अशा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *